‘तुझं नी माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ ही आणि अशीच अवस्था शिवसेना आणि भाजपा यांच्यात पूर्वी होती, आज आहे आणि उद्याही राहील यात शंका नाही. पण तरीदेखील सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. एका परीने त्यांची सत्तासंगत हा नाईलाजाचा मामला आहे. पण तसे असले तरी महाराष्ट्रातील जनतेने आपले किमान पाच वर्षांसाठीचे का होईना स्वत:चे भवितव्य आपल्या हाती सुपूर्द केले आहे याचे भान दोहोंनी बाळगणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांच्या मनात कुठेतरी असणे गरजेचे असताना तसे दिसत मात्र नाही. शिवसेनेचा आणि तिच्या सैनिकांचा एकूणच खोडकर स्वभाव एव्हाना भाजपाच्याही पूर्ण लक्षात यायला हरकत नाही. असे असताना ‘अरे ला कारे’ करणे यात शोभा होतच असेल तर या दोन्ही पक्षांची नव्हे तर सरकारची आणि सरकार ज्यांच्यासाठी काम करते त्या जनतेची. अलीकडच्या काळात असे प्रकार वारंवार होत चालले आहेत आणि माध्यमांमधून ‘फडणवीस यांचा सेनेला टोला, सेनेला कानपिचक्या’ यासारखी वर्णने प्रसिद्ध होऊ लागली आहेत. जणू सरकार म्हणजे सवाल-जबाबाचा फडच आहे! परवाच एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सरकारचा रिमोट कन्ट््रोल त्यांच्या हाती असल्याची कानपिचकी म्हणे सेना नेत्यांच्या पुढ्यात दिली. तितकेच नव्हे तर सेनाप्रमुखांनी हा कन्ट्रोल म्हणे त्यांच्या हाती दिला आहे. मुळात मुख्यमंत्री राज्याचा एका परीने सर्वेसर्वा असतो पण त्याला वारंवार हे सांगत बसावे लागत नाही. दुसरे आणि अधिक महत्वाचे म्हणजे फडणवीसांच्या हाती असलेला तथाकथित कन्ट््रोल सेनाप्रमुखांनी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे आणि त्याचा वापर आपल्या भल्यासाठी केला जावा, सेनेला येताजाता ढुशा देण्यासाठी नव्हे, ही आणि केवळ हीच या राज्यातील जनतेची अपेक्षा आहे.
सरकार नव्हे फड?
By admin | Updated: January 26, 2016 02:35 IST