शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नफेखोरीचा हा प्रमाद केवळ मॅगीचा नाही

By admin | Updated: June 7, 2015 23:59 IST

गेल्या आठवडाभरात जागतिक पातळीवरील एका मोठ्या ब्रॅण्डने गुडघे टेकले. अशा मोठ्या ब्रॅण्डच्या पतनाने काही आनंद होत नाही.

विजय दर्डा
 
गेल्या आठवडाभरात जागतिक पातळीवरील एका मोठ्या ब्रॅण्डने गुडघे टेकले. अशा मोठ्या ब्रॅण्डच्या पतनाने काही आनंद होत नाही. पाकीटबंद खाद्यपदार्थांचे उत्पादन करणारी बलाढ्य नेस्ले कंपनी गाळात गेली आहे. मॅगी नूडल्स हा याच कंपनीचा एक अतिशय लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. या कंपनीची जागतिक उलाढाल ९२ अब्ज डॉलरची असून, तिचा वार्षिक नफा १४ अब्ज डॉलर आहे. या कंपनीची भारतातील उलाढाल सुमारे ९,८०० कोटी रुपयांची असून, त्यात मॅगी नूडल्सचा वाटा २२ टक्के आहे. असे असूनही कंपनीच्या वर्ष २०१४ च्या जागतिक पातळीवरील वार्षिक अहवालात याचा स्वतंत्रपणे उल्लेखही आढळत नाही.
पण हो, या वार्षिक अहवालात मॅगी ओट्सचा स्वतंत्रपणे उल्लेख आहे आणि आपले हे नवे उत्पादन भारतातील शहरी बाजारात झपाट्याने लोकप्रिय होत आहे याचा या बहुराष्ट्रीय कंपनीस मोठा अभिमानही आहे. या कंपनीची विक्रीची टॅगलाइन ‘गूड फूड, गूड लाइफ’ अशी आहे. गेली १५० वर्षे ही कंपनी धूमधडाक्यात व्यापार करीत आहे. जगाचा या कंपनीवर नक्कीच विश्वास आहे, अन्यथा ती एवढी जागतिक मातब्बर कंपनी झालीच नसती. मुख्य म्हणजे, भारताने आणि भारतातील आयांनी या कंपनीच्या मॅगीवर भरभरून विश्वास टाकला. पण आता तोच विश्वास गडगडून कोसळला आहे. नफा कमावण्यासाठी एखाद्या छोट्या व्यापाऱ्याप्रमाणेच नेस्ले या बलाढ्य कंपनीस अपप्रचार वा भेसळीचे वावडे नाही हे आता सिद्ध झाले आहे. नफ्याच्या हव्यासापायी कोणताही विधिनिषेध न पाळण्याच्या बाबतीत नेस्ले कंपनी दोषी ठरली आहे. मुलांचे आरोग्यसंपन्न संगोपन करण्यात पालकांना मदत करण्याच्या स्वत:च दिलेल्या वचनाशी या कंपनीने प्रतारणा केली आहे. नेस्ले कंपनीच्या या अवघ्या दोन मिनिटांत तयार होणाऱ्या नाश्त्याच्या पदार्थाची बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी ‘टेस्टी भी, हेल्दी भी’ अशी भलामण करणारी मोठी जाहिरातबाजी केली. परिणामी मुलांना भुकेच्या वेळी चटकन काय करून द्यायचे या विवंचनेत असलेल्या देशभरातील नोकरदार आयांचा हा अव्वल पसंतीचा नाश्त्याचा पदार्थ झाला. पण या मॅगी नूडल्समध्ये शिसे व चटकदार चवीसाठी वापरले जाणारे एमएसजी यांचे प्रमाण नियमाने ठरवून दिलेल्या प्रमाणाच्या आठपट जास्त असल्याचे विविध राज्यांमधील प्रयोगशाळांनी केलेल्या चाचण्यांमध्ये आढळून आले आहे. अन्नातील शिसे म्हणजे दुसऱ्या अर्थाने ‘स्लो पॉयझनिंग’च असते. अशा प्रकारे मुलांना एखाद्या पदार्थाची आवड लावून त्यातून त्यांना हळूहळू विष खायला घालणे हे मुलांचे सुदृढतेने संगोपन करण्याशी कसे काय मेळ खाते?
नफ्यासाठी अनिर्बंध हाव सुटणे हा नेस्ले कंपनीचा मुख्य प्रमाद आहे. अडचणीत आल्यावर उद्धटपणे वागण्याने या प्रमादाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. मॅगी नूडल्सचे पहिले नमुने मार्च २०१४ मध्ये घेऊन त्यांची तपासणी केली गेली. त्यात काहीतरी गैर आढळल्याचे अहवाल नम्रतेने मान्य करण्याऐवजी नेस्ले कंपनीने अशा काही आविर्भावात प्रतिवाद सुरु केला की जणू काही या चाचण्यांचे निष्कर्षच संशयास्पद आहेत किंवा अनाठायी गोंधळ निर्माण केला जात आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणक प्राधिकरण (एफएसएसएआय) मॅगीची सर्व नऊ प्रकारची उत्पादने बाजारातून काढून घेण्याचा आदेश देणार आहे, याची कल्पना आल्यावर कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बुल्के यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही त्यांचा घोषा ‘मॅगी पूर्णपणे सुरक्षित आहे,’ असाच होता. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आग्रा येथील एक अन्न निरीक्षक संजयसिंग यांनी वर्षभर मोठे परिश्रम घेऊन मॅगी नूडल्सचा खोटेपणा जगापुढे आणला आहे. नेस्लेसारख्या बलाढ्य कंपनीच्या अशा अत्यंत लोकप्रिय ब्रॅण्डवर सबळ पुराव्याशिवाय असा ठपका ठेवण्याचे धार्ष्ट्य त्यांनी नक्कीच केले नसते. ज्यांचे नाव या ब्रॅण्डला दिले आहे त्या ज्युलियस मॅगी या १९ व्या शतकातील स्विस इसमाने आपले नाव असे वादाच्या भोवऱ्यात सापडेल, असे कधी स्वप्नातही पाहिले नसेल. पण ‘कॉर्पोरोक्रसी’ने त्यांचे नावही डागाळून टाकले.
या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॉर्पोरेट बॉस आपण जणू जगावर राज्य करीत आहोत अशा आविर्भावात वावरत असतात. वास्तवात बऱ्याच वेळा ते तसे करतही असतात. आपले कधी काही चुकतच नाही व कधी चुकलेच तरी ते चुटकीसरशी सुधारूनही घेता येते, अशीही या कॉर्पोरेट बॉसेसची ठाम धारणा असते. बऱ्याच वेळा यात त्यांना यशही येते. म्हणूनच या बड्या कंपन्यांना ‘इन्स्पेक्टर राज’विषयी मनापासून नफरत वाटते ती काही उगीच नाही. पण शेवटी हे लक्षात घ्यायला हवे की, एका साध्या अन्न निरीक्षकाने नेस्लेच्या या बलाढ्य ब्रॅण्डला जमिनीवर आणले. पण भेसळ, नफ्याचा हव्यास किंवा उद्दामपणा हे काही फक्त नेस्लेचे दोष नाहीत; संपूर्ण बाजारपेठेसच या अवगुणांची लागण झाल्याचे दिसते. अन्नात भेसळ करणे हा खुनाचा प्रयत्न करण्याएवढा गंभीर गुन्हा मानला जायला हवा. अशा गुन्ह्यासाठी जरब बसेल अशी शिक्षा देण्याची व्यवस्था करावी लागेल. ही शिक्षा गुन्ह्याच्या तुलनेत जाणीवपूर्वक व्यस्त प्रमाणात ठेवावी लागेल, अन्यथा जुजबी दंड आणि किरकोळ कारावास अशा शिक्षेने नेस्लेसारखी मातब्बर कंपनी थोडीच ताळ्यावर येणार आहे? कंपनीतील एखाद्या खालच्या पातळीवरील भारतीय अधिकाऱ्यावर खापर फोडून कंपनी मोकळी होईल. अशा प्रकारच्या कॉर्पोरेट गुन्हेगारीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. उद्योगस्नेही धोरणे राबविण्याच्या उत्साहात याचेही भान ठेवावे लागेल. आम्ही जागतिकीकरणात सामील व्हायला तयार आहोत; पण भारतीयांकडे केवळ ग्राहक म्हणून पाहणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, असा स्पष्ट संदेश द्यावा लागेल. मॅगी वादाने प्रदूषण व पर्यावरण ऱ्हासाचे मुद्देही समोर आले आहेत. यात गल्लत करून चालणार नाही. बाजारात आणलेले उत्पादन सर्वोत्तम असणे ही नेस्लेचीच जबाबदारी आहे. हा कोणी बाजारबुणगा नाही. ९२ अब्ज डॉलरचा व्यापार करणारी ही कंपनी आहे. केवळ माधुरी दीक्षित सांगते म्हणून नाही, तर मॅगी सुरक्षित आहे या कंपनीने दिलेल्या ग्वाहीमुळेच या आया आपल्या मुलांना मॅगी खायला देत असतात. हा विश्वास उडाला तर नेस्ले आणि कोपऱ्यावरचा कोणी विक्रेता यांच्यात काहीच फरक राहणार नाही. आरोग्यसंपन्न भावी पिढीसाठी केवळ मॅगीच नव्हे, तर हरतऱ्हेच्या भेसळयुक्त उत्पादनांपासून बचाव करावा लागेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
मॅगीवरून होत असलेल्या या वादामुळे व्यापारी उत्पादनांची सेलिब्रिटींनी जाहिरातबाजी करण्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या जाहिरातबाजीत ब्रॅण्ड व सेलिब्रिटी परस्परांना पूरक असतात. ब्रॅण्डमध्ये काही उणेदुणे आढळले तर त्याचा दोष जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला देता येणार नाही, असे वादासाठी म्हटले जाऊ शकते. पण ज्याचा थेट जीवनमरणाशी संबंध आहे अशा अन्नपदार्थांची जाहिरात करताना त्या उत्पादनाच्या दर्जाविषयी खात्री करून घेण्याची जबाबदारी सेलिब्रिटींना नाकारता येणार नाही. या दोन्हींची सांगड घातल्याखेरीज मूळ प्रश्नाची सोडवणूक होणार नाही. मॅगी पुन्हा बाजारात येण्याचे धमकावत असताना याची खात्री करणे अधिकच गरजेचे आहे.
 
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
(lokmatedit@gmail.com)