शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नितीन गडकरी : अभिनंदन व शुभेच्छा

By admin | Updated: May 27, 2017 00:02 IST

भूपृष्ठ आणि जलवाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री, नागपूरचे खासदार आणि विदर्भाचे सुपुत्र नितीन गडकरी हे आज वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत.

भूपृष्ठ आणि जलवाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री, नागपूरचे खासदार आणि विदर्भाचे सुपुत्र नितीन गडकरी हे आज वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत. धडाडी, जिद्द, निर्णयक्षमता, संघटनेवरील घट्ट पकड, दांडगा लोकसंग्रह आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती या गुणांनी त्यांचे नाव आजच देशाच्या पातळीवर घेतले जाऊ लागले आहे. महाराष्ट्र सरकारात बांधकाममंत्री असताना त्यांनी पुणे-मुंबई हा द्रुतगती महामार्ग ज्या वेगाने पूर्ण केला आणि साऱ्या राज्यात उड्डाणपूल उभे करून तेथील वाहतुकीची कोंडी ज्या तडफेने निकालात काढली त्याची प्रशंसा देशात तर झालीच; पण रतन टाटा आणि मुकेश अंबानींसारखी उद्योगक्षेत्रातील आघाडीची माणसे त्यासाठी त्यांचे जाहीर कौतुक करताना त्या काळात दिसली. हा देश रस्त्यांनी बांधून काढायचा तर ते काम गडकरीच करू शकतील, असे रतन टाटा अनेकदा म्हणाले. विकासासोबतच राजकारणावरची त्यांची पकड विलक्षण आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा विदर्भाचा प्रदेश त्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिकांसह त्यांनी ज्या तऱ्हेने भाजपाचा गड बनविला त्यातून त्यांचे संघटनचातुर्यही साऱ्यांच्या लक्षात आले. दिल्लीतील कारभार चोख राखून नागपूर ताब्यात ठेवणे, मोदींपासून भागवतांपर्यंतचे सारे पारिवारिक पुढारी प्रसन्न ठेवणे आणि शरद पवार ते उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक पातळीवरील सर्व कार्यकर्ते, माध्यमे आणि स्नेहीजन स्वत:शी जोडून ठेवणे ही त्यांना साध्य झालेली बाब इतरांना क्वचितच जमणारी आहे. वास्तव हे की नितीन गडकरी एव्हाना देशाचे पंतप्रधानच व्हायचे. लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात भाजपाने २००६ व २०११ ची निवडणूक गमावल्यानंतर संघाने पुढाकार घेऊन त्यांना त्यांची पदे सोडायला लावली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना नितीन गडकरी या तरुण नेत्याला त्याने पक्षाचे अध्यक्षपद त्याच्या सर्वाधिकारांसह दिले. मात्र पक्षातील दिल्लीस्थित दुढ्ढाचार्यांना त्यांचे अपुरे वय आणि त्यांच्यामुळे आपल्या वाट्याला येऊ शकणाऱ्या संधी कायमच्या गमावण्याची भीती वाटल्याने त्यांनी गडकरींविरुद्ध अगदी फुटकळ प्रकरणे उकरून काढून त्यांचाच गहजब केला. माध्यमांमध्ये अशा गहजबांची कंत्राटे घेतलेले लोक बरेच आहेत. शिवाय राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखी कोणत्याही यशस्वी माणसाविरुद्ध ऊर बडविणारी माणसेही देशात बरीच आहेत. या प्रकाराने संकोचलेल्या भाजपाच्या व संघाच्या नेत्यांनी गडकरी यांचे नाव पुढल्या कार्यकाळासाठी घेतले नाही. (वास्तव हे की गडकरी आणि पर्रीकर ही दोन तरुण नावेच तेव्हा संघाच्या विचारात होती.) गडकरींना मिळालेली संधी अशी हाताबाहेर गेल्याने भाजपाचे आताचे मोदी-शहा यांचे राजकारण पुढे आले. अडवाणी-जोशी मागे पडले, सुषमाबार्इंना त्यांचा पराभव दिसला आणि राज्यांची मुख्यमंत्रिपदे ओळीने तीनदा भूषविलेल्यांनाही गडकरींसाठी मागे ठेवण्याचे परिवाराचे राजकारण त्याचा इरादा स्पष्ट करणारेही होते. नंतरच्या काळात लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रात महत्त्वाचे मंत्रिपद भूषविणाऱ्या गडकरींनी आपल्या वेगवान कार्यशैलीने आणि तिच्या परिणामकारक अंमलबजावणीने साऱ्यांनाच दिपविले. साऱ्या देशात आज महामार्गांचे बांधकाम ज्या गतीने सुरू आहे ते पाहता हा देश रस्त्यांनी एकत्र करता येतो ही म्हण ते खरी करतील याविषयी कुणाच्या मनात संशय उरत नाही. मोदींच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे काम केल्यावर आणि शहांच्या अगोदर पक्षाचे अध्यक्षपद सांभाळल्यावर गडकरी यांना त्यांच्या आताच्या पदाहून मोठे पद मिळणे व त्यांचा समावेश मंत्रिमंडळाच्या कोअर कमिटीत होणे अपेक्षित होते. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हे पाचजण त्या समितीचे सभासद असतात. मोदींनी देशाचे संरक्षणमंत्रिपद आरंभी स्वत:कडे ठेवले. पुढे ते जेटलींना चालवायला दिले. नंतर त्यावर पर्रीकर आले आणि आता ते पुन्हा मोदी-जेटलींकडेच गेले आहे. एव्हाना ते महत्त्वाचे पद गडकरींकडे येणे उचित होते. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत प्रवेश मिळून देशाच्या एकूणच विकासकार्यात सहभागी होण्याचे व त्याला मार्गदर्शन करण्याचे अधिकार मिळाले असते. जाहीररीत्या त्यांची तारीफ करणे वेगळे आणि त्यांच्या कर्तबगारीचे फळ त्यांना योग्यवेळी देणे वेगळे. चांगल्या व स्वच्छ राजकारणाची व तशाच मानसिकतेची ती साक्ष ठरते. गडकरी यांनीही तेव्हाच्या टीकाकारांची टीका मनावर घेतल्याचे कधी दिसले नाही. एक प्रसन्नचित्त दिसणारा व जनतेशी सहज संवाद साधणारा कार्यकर्ता आणि नेता असेच त्यांचे चित्र साऱ्यांच्या मनात आज ठसले आहे. अशा प्रतिमांच्या नेत्यांची वाटचाल त्यांना नेहमीच यशाकडे व अधिक मोठ्या जबाबदाऱ्यांकडे नेणारी असते असेच आजवर आढळलेही आहे. गडकरी हे भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि मुरब्बी राजकारणी असले तरी ‘लोकमत’ परिवाराशी ते कमालीच्या आत्मीयतेने जुळले आहेत. हा स्नेह आणखी वाढावा आणि तसे होताना त्यांच्या वाट्याला आणखी मोठ्या सन्मानाची पदे यावी ही लोकमत परिवाराची इच्छा आहे. केवळ राजकीयच नव्हे, तर औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक व सेवेच्या सर्व क्षेत्रांत त्यांचा वावर व सद््भाव वाढावा, ही शुभेच्छा !