विजय दर्डा ,लोकमत पत्र समूहाचे चेअरमन - आपण सर्वांनी नव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त आपण परस्परांना शुभेच्छाही दिल्या. येणारे वर्ष मावळत्या वर्षाहून कितीतरी चांगले असेल, ही मनापासूनची इच्छा या शुभेच्छा संदेशांमधील सामायिक धागा होता. ही चांगल्याची आंस केवळ आपल्या व्यक्तिगत जीवनापुरती मर्यादित नसते. खरे तर जगभर सर्व परिस्थितींमध्ये आणि खास करून आपल्या देशात व शेजारी देशांनाही हे लागू होते. लोकांच्या पातळीवर पाकिस्तानचे नागरिक अगदी आपल्यासारखेच आहेत, पण समस्या पूर्णपणे वेगळ््या पातळीवर आहे, हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे त्यांना वैयक्तिक तसेच सामुदायिक पातळीवर वर्ष २०१५ च्या शुभेच्छा देताना पाकिस्तानने देश म्हणून बदलायला हवे, अशी आपली मनापासूनची इच्छा आहे. हे स्थित्यंतर पाकिस्तानला दीर्घ काळापासून हुलकावणी देत आहे व आता त्याचे परिणाम तेथील नागरिकांना भोगावे लागत आहेत. पेशावरमधील शाळेवरील अतिरेकी हल्ल्यासारखी दुर्घटना कुठेही घडावी, असे कोणालाही वाटणार नाही व त्या घटनेचे नुसते स्मरण झाले तरी मन दु:ख आणि उद्वेगाने भरून जाते.सामान्य पाकिस्तानी नागरिकांना आपल्या आप्तस्वकियांच्या निर्घृण हत्येमुळे सोसावे लागलेले हे अतीव दु:ख टळू शकले असते या विचाराने मनातील खंत व अगतिकता अधिकच तीव्र होते. या विषयावर बोलताना राजनैतिक मुत्सद्देगिरीत किंवा एरवी आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये वापरली जाते त्या भाषेचा वापर करण्याची ही वेळ नव्हे. ही वेळ सडेतोडपणे मन मोकळे करण्याची आहे. पेशावर हत्याकांड व त्यासारख्या अन्य घटना हा भारत आणि अफगाणिस्तानशी असलेल्या व्दिपक्षीय संबंधांच्या संदर्भात पाकिस्तान परकीय धोरणाचे एक अंग म्हणून दहशतवादाचा जो वापर करीत आले, त्याचा परिपाक आहे. पाकिस्तानने जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ओसामा-बिन लादेन यास आपल्या लष्करी अकादमीच्या आवारात आश्रय दिला. पाकिस्तानने आपल्या कल्पनेतील शत्रुंविरुद्ध ज्या गटांना पाठबळ दिले तेच आता पाकिस्तानच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत, हे वास्तव आता समोर येत आहे.पेशावर हत्याकांडानंतर पाकिस्तानात उठलेले काहूर व दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची एकमुखाने झालेली मागणी यास कमी लेखता येणार नाही. पण एवढेच पुरेसे नाही. पाकिस्तानी नेत्यांच्या मनोवृत्तीत मोठा बदल होण्याची आणि हा बदल तेथील लष्करामध्ये, नोकरशाहीमध्ये, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आणि विचारवंतांमध्येही झिरपण्याची गरज आहे. ६७ वर्षे हा खूपच प्रदीर्घ कालखंड आहे हे त्या सर्वांनी मान्य करायला हवे. आपल्या सर्व समस्यांचे खापर इतरांवर फोडणे हा आयुष्यातील सर्वात सोपा मार्ग असतो हे आपण सर्वांनाच माहित आहे. पाकिस्तान आपल्या समस्यांचे खापर भारत आणि अमेरिकेवर फोडतोे. पेशावर हत्याकांडांसाठीही भारताला जबाबदार धरणारे सूर पाकिस्तानमधील काही जणांनी काढले तेव्हा हीच मनोवृत्ती प्रगट झाली. बंदुका व अण्वस्त्रांची भाषा सोडून शाळा, आरोग्यसेवा व मानवी हक्कांची भाषा बोलून विकासाचा मार्ग अनुसरावा ही संपूर्ण जगाची इच्छा आहे, याची तेथील नेते दखलही घ्यायला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित केले हा खरे तर भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या दृष्टीने मजबूत आधाराचा दगड ठरायला हवा होता. मोदींसारक्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्याने मैत्रीचा हात पुढे केला होता. पण त्याच पंतप्रधानांनी नंतर सार्क देशांच्या शिखर परिषदेच्या वेळी शरीफ यांना औपचारिक ‘हाय-हॅलो’ही करू नये व हस्तांदोलन करणेही टाळावे हे पुरेसे बोलके आहे.केवळ मजा म्हणून चवबदल करणे लोकांना नेहमीच आवडते. उर्दूमध्ये त्याला ‘जायका बदलना’ म्हणतात. पाकिस्तानने गेली ६७ वर्षे अशी चव बदलाची परकीय नीती स्वीकारून भारताशी वैर पत्करले आहे. जम्मू-काश्मीरमधील ताज्या निवडणूका हा सीमावादावर तोडगा आहे, असे कोणाचेच म्हणणे नाही. पण या निवडणुकीत मतदारांनी घेतलेला भरघोस सहभाग दुर्लक्षितही करता येणार नाही. काश्मीरच्या जनतेला या हिंसाचार व रक्तपाताच्या जीवनाचा उबग आला आहे. अशा वेळी भारताला शांततेची भाषा कळत नाही, असे पाकिस्तानच्या मंत्र्यांनी म्हणावे हे खरेच कीव करण्यासारखे आहे. आपल्या शेजाऱ्याच्या मनोवृत्तीत बदल झाला नाही तर २०१५ हे वर्ष पाकिस्तान आणि भारतासाठीही काही वेगळे असणार नाही. ‘तुम्हारी गोलियां खत्म हो जायेंगी, हमारी छातीयां नही होंगी’ या पेशावर हत्याकांडानंतर एका पाकिस्तानी युवकाने काढलेल्या उद््गारांची यावेळी आठवण होते. त्या तरुणाचा आवाज पाकिस्तानच्याही कानावर जाईल, अशी आशा करू या.हा लेख संपविण्यापूर्वी आणखी एक गोष्ट नमदू करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पूर्वसुरी डॉ. मनमोहन सिंग यांच्यात फरक काय, असा विचार हल्ली लोकांच्या मनात येतो. या संदर्भात मला दिल्लीत भेटलेल्या भिलाई येथील आठव्या इयत्तेतील आदिभाव मीनल गुप्ता या विद्यार्थ्याचे शब्द आठवतात. जगाकडे चाणाक्षपणे पाहणारा हा विद्यार्थी म्हणतो, ‘माझ्यादृष्टीने दोघांमधील फरक अगदी साधा आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी महात्मा गांधींच्या पुतळ््यापुढे आदरांजली वाहिली तेव्हा पायातील बूटही काढले नव्हते व ते श्रद्धेने थोडेसे झुकले होते. याउलट, मोदीजींनी पायातील पादत्राणे काढून गांधीजींच्या पायांना स्पर्श केला.’ लोक कोणाहीबद्दल कसा व कशावरून काय समज करून घेतात हे यावरून दिसते.
नव्या वर्षात पाकिस्तानला बदलावेच लागेल
By admin | Updated: January 5, 2015 02:02 IST