मोदी सरकारने आपल्या सत्ताकारणाचे १00 दिवस आता पूर्ण केले आहेत. या काळात जनतेच्या पदरात फारसे काही पडले नसले, तरी त्या सरकारने स्वत:विषयीच्या अपेक्षा मात्र चांगल्या उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करणे हे त्या सरकारसमोरचे आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात व विशेषत: पूर्व आशियाई देशांत मोदी सरकारने स्वत:विषयी एक चांगला विश्वास उत्पन्न केला आहे. यापुढे पाश्चात्त्य देशांतील त्याची कामगिरी आपल्याला पाहायची आहे. महागाई तशीच आहे, चलनफुगवटा कमी व्हायचा राहिला आहे आणि एवढय़ा काळात बेकारी हटविण्याच्या योजना आखणे सरकारला जमले नाही. त्याने नियोजन मंडळ रद्द केले, केंद्रातल्या इतरही अनेक संस्था इतिहासजमा करण्याचा त्याचा इरादा आहे. मात्र त्यामुळे निर्माण होणारी पोकळी ते कशी भरून काढणार याची स्पष्ट कल्पना जनतेला देणे त्याला जमले नाही. तथापि, सरकारात उत्साह आहे, भाजपात चेतना आहे आणि संघ परिवारात नको तेवढा उन्मादही आहे. या बळावर हा परिवार येत्या ऑक्टोबरात महाराष्ट्र व हरियाणासह इतर दोन राज्यांत होणार्या विधानसभांच्या निवडणुकांना सामोरा जाणार आहे. या तुलनेत काँग्रेस पक्ष अजून गळाठलेल्या अवस्थेत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून त्याला अद्याप सावरता आले नाही. या पराभवाला राहुल गांधी आणि त्यांचे नेतृत्व कितपत जबाबदार आहे, याची चर्चा एवढे दिवस त्या पक्षाने केली. त्यासाठी नेमलेल्या ए. के. अँन्टोनी समितीने राहुल गांधींना या जबाबदारीतून मुक्त केले असून, सार्या पक्षाचीच निराश कामगिरी त्या पराभवाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र, या धक्क्यातून त्या पक्षाला सावरायला हा अहवाल फारसा कामी आला नाही. पक्षाचे राज्याराज्यांतील नेते व कार्यकर्ते अद्याप हतबुद्ध व निराश आहेत. त्यांच्यात जोम टाकण्याचा कोणताही कार्यक्रम पक्षनेतृत्वाने त्यांच्यासमोर ठेवला नाही आणि राज्यातले नेतृत्वही येत्या आव्हानाला सामोरे जायला पुरेसे तयार झाले नाहीत. महाराष्ट्रात ऑक्टोबरात निवडणुका व्हायच्या आहेत. येत्या आठवड्यात कदाचित त्यांची घोषणा होऊन आचारसंहिताही लागू होईल; मात्र अजून पक्षाचे उमेदवार निश्चित नाहीत. त्याचा जाहीरनामा तयार नाही आणि जिल्ह्याजिल्ह्यांत घ्यावयाच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीही अजून कागदावरच राहिल्या आहेत. परवा मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचारप्रमुख नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. त्या वेळी ही निवडणूक आपण जिंकणारच असल्याचे या नेत्यांनी सांगितले. आतापर्यंत जाहीर झालेले लोकमताचे अंदाज मात्र या आशावादाला बळकटी देणारे नाहीत. भाजपा व शिवसेना यांच्यात युती झाल्यास तिला तोंड देणे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीला फार जड जाणार आहे. पण त्यांना आशा वाटावी अशा काही गोष्टी एवढय़ात घडल्या आहेत. महायुती नावाचे जे प्रकरण काही काळापूर्वी राज्यात उभे झाले, ते फारसे बळकट नसल्याचे दिवसेंदिवस उघड होऊ लागले आहे. रिपब्लिकन पक्ष दूर गेला आहे. स्वाभिमानीमध्ये संशय आहे आणि इतरांच्या मनातही आपल्या वाट्याला या युतीत फारशा जागा येतील, अशी आशा आता उरली नाही. त्यातून भाजपा आपल्याला ऐनवेळी तोंडघशी पाडेल व राज ठाकरे यांच्या मनसेशी मैत्री करील अशी धास्ती शिवसेनेच्या मनात आहे. भाजपाला मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्याच वेळी तिकडे शिवसेनेने उद्धव ठाकरे हेच उद्याचे मुख्यमंत्री अशी घोषणा केली आहे. या परस्परविरोधी घोषणा आणि महायुतीतील संशयाचे वातावरण ही काँग्रेसला आशेची बाजू आहे. मात्र, तेवढय़ा बळावर आपण महाराष्ट्र जिंकू अशा भ्रमात काँग्रेसनेही राहण्याचे कारण नाही. त्याही पक्षाचे राष्ट्रवादीशी फार जुळत असल्याचे चित्र दिसत नाही. राष्ट्रवादीचे पुढारी दरदिवशी नव्या अटी आणि तेढी पुढे करतात. काँग्रेसचे लोक त्यांची दरवेळी दखल घेतातच असे नाही; पण यातून निर्माण होणारे चित्र काँग्रेसजनांची निराशा करणारे ठरते हे विसरता येत नाही. अशा काहीशा आव्हानात्मक व काहीशा निराशाजनक स्थितीत काँग्रेसला या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यात राणे त्यांच्या पद्धतीनुसार जिवाच्या आकांताने लढतील, पृथ्वीराज चव्हाणही सारी ताकद पणाला लावतील. अशोक चव्हाणही त्यांच्या सार्मथ्यानिशी पुढे येतील. माणिकराव ठाकर्यांकडून यातली कोणतीही अपेक्षा नाही आणि सुशीलकुमार शिंद्यांना कामाला लावणे आणि पुढे करणे आवश्यक आहे. नेते कामाला लागले आणि कार्यकर्त्यांत उत्साह संचारला; तरच काँग्रेसला चांगली कामगिरी करणे जमणार आहे.
मरगळ झटकणे गरजेचे
By admin | Updated: September 4, 2014 12:50 IST