लोकशाहीतील सरकार भले लोकांचेच असले तरी लोकाना विश्वास आणि भरवसा मात्र सरकारपेक्षा न्यायालयांचाच का वाटतो याचा आणखी एक दाखला आता उपलब्ध झाला आहे. तमीळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी २०११मध्ये त्याच भाषेत एक कादंबरी लिहिली. पण तेव्हां काहीच झाले नाही. तीन वर्षांनी याच कादंबरीचे इंग्रजी भाषांतर ‘वन पार्ट आॅफ वुमन’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले व हलकल्लोळ माजला. कादंबरीत तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील एका निपुत्रिक जोडप्याचे कथानक चित्रीत करण्यात आले आहे. या जोडप्याला अपत्य व्हावे म्हणून त्याच्या घरचे लोकच त्यास अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या रथयात्रोत्सवात सहभागी होण्यास भाग पाडतात. त्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणे असे असते की, उत्सवाच्या रात्री कोणतेही (अनोळखी) स्त्री-पुरुष शय्यासोबत करु शकतात! मुरुगन यांनी कादंबरीच्या माध्यमातून केलेल्या या वर्णनापायी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत तामिळनाडूतील तिरुचेंगोड आणि कोंगूनाडू पट्ट्यातील लोकानी प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली. कादंबरीवर बंदी लागू करण्याची मागणी केली आणि मुरुगन यांना जीव नकोसा करुन टाकला. तितकेच नव्हे तर मुरुगन यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा खटलादेखील दाखल केला गेला. साहजिकच त्यामुळे व्यथित झालेल्या व मूलत: एक शिक्षक असलेल्या मुरुगन यांनी ‘मी मरण पावलो आहे’ असे स्वत:च जाहीर करुन टाकले. त्यांचे असे जाहीर करणे देशभर खळबळ माजवून गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तळमळणाऱ्या देशभरातील बव्हंशी लेखक-साहित्यिक-कार्यकर्ते यांनी मुरुगन यांना जीव नकोसा करणाऱ्यांना धारेवर धरले. सरकारने अर्थातच झुंडीसमोर हात टेकले वा शरणागती पत्करली. पण आता चेन्नई न्यायालयाने मुरुगन यांना पूर्णपणे दोषमुक्त केले आहे. एखाद्या लेखकाची कृती समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाला अश्लील, बीभत्स, अनैतिक किंवा धर्मभावना दुखावणारी वाटली म्हणजे संपूर्ण समाजाच्या नजरेत ती तशीच असू शकत नाही, असा निवाडा उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. मुरुगन यांच्या कादंबरीवर घेण्यात आलेला आक्षेप तर पूर्ण निराधार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचा हा निवाडा ऐकल्यानंतर मुरुगन यांनी आपण पुन्हा जिवंत होत असल्याचे आता जाहीर केले आहे. अर्थात या एका निकालाने देशभर पसरलेले आणि कोणत्याही कलाकृतीच्या विरोधात आक्षेप घेऊन बंदीची मागणी करणारे व त्याच्याच जोडीला हातात कायदा घेणारे सुधारतील असे नाही. पण त्यांना चपराक बसायला हरकत नाही.
मुरुगन पुन्हा ‘जिवंत’
By admin | Updated: July 8, 2016 04:37 IST