शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मुखर्जींचे बौद्धिक, अन् संघाचे पापक्षालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:30 IST

वैचारिक मतभिन्नतेची तटबंदी ओलांडून रा.स्व.संघाच्या संवाद प्रक्रियेला प्रतिसाद देत, काँग्रेसजनांच्या विरोधाला न जुमानता भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरच्या रेशीमबागेत गेले, ते सर्वार्थाने योग्यच झाले.

- सुरेश भटेवरा( संपादक, दिल्ली लोकमत)वैचारिक मतभिन्नतेची तटबंदी ओलांडून रा.स्व.संघाच्या संवाद प्रक्रियेला प्रतिसाद देत, काँग्रेसजनांच्या विरोधाला न जुमानता भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरच्या रेशीमबागेत गेले, ते सर्वार्थाने योग्यच झाले. संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाचा विशेष अभ्यास पूर्ण केलेल्या अन् भगव्या तेजाने तळपणाऱ्या ७०९ स्वयंसेवकांना समारोपाचे विशेष बौद्धिक त्यांनी ऐकवले. भारतीय संस्कृतीच्या मौल्यवान पैलूंचा असा साक्षात्कार मुखर्जींनी या स्वयंसेवकांना त्यात घडवला, की संघाच्या बंदिस्त विचारसरणीचे काही झरोके बहुदा प्रथमच उघडले गेले. उदारमतवाद, सहिष्णुता अन् सामाजिक सौहार्दतेचे प्रसन्न प्रकाशकिरण त्यातून आत डोकावले. प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या मनात बहुदा एक प्रश्न यावेळी जरूर उपस्थित झाला असेल की ज्या विचारधारेचा आजवर आपण पुरस्कार केला ती भारतीय समाजव्यवस्थेला संकुचित व्याख्येत जखडणारी तर नाही?विशेष आश्चर्याची बाब म्हणजे संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपात, प्रणव मुखर्जी अन् सरसंघचालक मोहनराव भागवत एकाच सुरात बोलत होते. संघाचा राष्ट्रवाद अन् हिंदू राष्ट्राची संकल्पना खोडून काढताना मुखर्जी म्हणाले ‘देशभक्ती कुठल्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. ७ धर्म, १२२ भाषा व १६०० बोलीभाषांसह आर्य, द्रविड अन् मंगोल अशा तीन भिन्न संस्कृतीचे लोक भारतात एकाच झेंड्याखाली राहतात. स्वत:ला अभिमानाने भारतीय मानतात. अशा विविधतेने नटलेल्या देशात सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता व बहुलतेचा पुरस्कार करणारी राज्यघटनाच आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. सहजीवनाचे सामर्थ्य त्यातूनच आपल्याला मिळते. धर्म, प्रांत अन् जातींच्या अस्मिता तसेच परस्परांचा द्वेष आणि असहिष्णुतेने आपली राष्ट्रीय ओळखच धुळीला मिळत असते.’ मुखर्जींच्या भाषणाआधी परंपरा मोडून अगोदर संबोधित करताना, सरसंघचालक भागवतही याच सुरात म्हणाले, ‘भारतातले सर्व समाज एकत्र जोडले जावेत, हाच संघाचा खरा संकल्प आहे. कोणतीही विचारसरणी संघाला निषिध्द नाही. सर्वांना सोबत नेण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, कारण सर्व भारतीयांचे पूर्वज एकच आहेत. हवे आहेत फक्त वातावरण बदलणारे असे लोक, ज्यांच्यात भारताचे भवितव्य घडवण्याची क्षमता आहे. परस्पर संवादातूनच एक सुंदर समाज घडत असतो. लोक प्रामाणिक असले तर मतभिन्नता कधीही आडवी येत नाही. प्रणव मुखर्जींसारख्या विद्वान व अनुभवसंपन्न नेत्याला याच हेतूने आम्ही इथे बोलावले आहे’.‘देश व देशभक्ती काय असते हे समजावून सांगायला मी इथे आलो आहे’, अशी थेट सुरुवात करीत, संघाला ज्यांचा कायम तिरस्कार वाटत आला, अशा पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’च्या वचनांसह, प्रणव मुखर्जींनी आपल्या भाषणात सरदार पटेल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, आदींच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येचे दाखले दिले. प्रशिक्षित स्वयंसेवकांना संघाच्या मुख्यालयातच चार खडे बोल ऐकवले. देशात सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करीत, ‘राजाची खुशी कायम जनतेच्या सौहार्दपूर्ण कल्याणात व प्रसन्नतेतच असते’, असा सूचक शेरा ऐकवीत पंतप्रधानांना राजधर्म पालनाचा सल्लाही प्रणवदांनी सुनावला. मुखर्जींची मर्मभेदी विधाने ऐकणे ही नि:संशय संघाच्या ९३ वर्षांच्या इतिहासाला व परंपरेला छेद देणारी अभूतपूर्व घटना होती. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला भागवतांनी मुखर्जींचे जाणीवपूर्वक घडवलेले हे बौद्धिक, हा योगायोग निश्चितच नसावा. अन्यथा आपल्या भाषणात ‘सरकारे बहुत कुछ जरूर कर सकती है, लेकीन सब कुछ नही’ असे अनेकार्थाने गर्भित विधान भागवतांनी सुनावलेच नसते.संघपरिवाराच्या आकांक्षेनुसार भाजपची केंद्रात स्वबळावर सत्ता, तब्बल ७० वर्षांनंतर आली. पंतप्रधानपदी मोदी अन् पक्षाध्यक्षपदी शहा यांना मोठ्या थाटामाटाने विराजमान केल्यानंतरही, संघाला अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक बदलाला देशात प्राधान्य मिळाले नाही. उलट मोदींच्या तथाकथित ‘न्यू इंडिया’ने त्याची जागा घेतली. सत्तेचे सारे केंद्रीकरण पंतप्रधान कार्यालयात झाले तर अनपेक्षित व विचित्र तडजोडी करीत भाजपचे रूपांतर निवडणूक जिंकण्याच्या मशीनमध्ये झाले. परिवर्तनाचा हा प्रयोग संघाला नक्कीच अपेक्षित नसावा. असंख्य स्वयंसेवकांचा त्यात निश्चितच कोंडमारा अन् हिरमोडही झाला असणार. संघाला या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी, व्यापक विचारांची नवी दिशा ऐकवण्याच्या हेतूने, अखेर सरसंघचालकांनी जाणीवपूर्वक मुखर्जींना संघाच्या मुख्यालयाचे निमंत्रण धाडले असावे. आपल्यापेक्षा काँग्रेस विचारसरणीच्या सोनारानेच पंतप्रधानांचे कान टोचलेले बरे, असा मुत्सद्दी विचारही भागवतांच्या मनात असावा. माजी राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनासारखेच मुखर्जींचे भाषण होते. संघाच्या ७०९ स्वयंसेवकांपुरता नव्हे तर मार्मिक स्वरूपाचा संवाद त्यातून साधला गेला. भारतीय जनतेच्या सामुदायिक शहाणपणाची कल्पना तमाम स्वयंसेवकांना आली. एकप्रकारे संघाचे पापक्षालनच झाले. संघाच्या संकुचित विचारांचे व्यापक रुंदीकरण या निमित्ताने देशाला अपेक्षित आहे. अर्थात मुखर्जींच्या बौद्धिकातून संघाच्या विचारसरणीत नेमके कोणते परिवर्तन घडेल, याचा अंदाज करणे आज अवघड आहे.प्रणव मुखर्जींच्या भाषणातून असे काही घडेल, याचा अंदाज कन्या शर्मिष्ठेसह अन्य काँग्रेसजनांनाही आला नव्हता. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी कायम रा.स्व. संघाला आरोपीच्या पिंजºयात उभे करीत असतात. आपल्या नेत्याचा हा रोख पाहून काही उतावळया काँग्रेसजनांनी मुखर्जींच्या भाषणाआधीच प्रतिक्रिया देण्याची घाई केली. संवादाऐवजी विसंवाद निर्माण करणाºयाच या प्रतिक्रिया होत्या. मुखर्जींच्या भाषणानंतर मात्र काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास सोडला अन् भाषणाआधी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आपली चूकच झाली, हे काँग्रेसने कबूल केले.भारतासमोर अनेक कठीण समस्यांचा डोंगर आज उभा आहे. कृषिप्रधान देशात शेतकºयांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. कोट्यवधी तरुणांच्या बेरोजगारीपुढे जॉबलेस ग्रोथ आहे तर सार्वजनिक उद्योग अन् बँका दुरवस्थेत पोहोचल्या आहेत. समस्यांची यादी लांबलचक आहे. एकछत्री अमलाचे कोणतेही एकटे सरकार या समस्या सोडवू शकत नाही. ‘सबका साथ सबका विकास’ अशी ठेवणीतली फुटकळ घोषवाक्ये ऐकवून प्रश्न सुटत नसतात. याची जाणीव संघालाही झाली असावी. देशात सौहार्दाचे व सहिष्णुतेचे वातावरण त्यासाठी आवश्यक असते. मतभिन्नता कायम ठेवूनही संवाद साधता येतो, हे सत्य मुखर्जींचे बौद्धिक संघाच्या मुख्यालयात आयोजित करून भागवतांनी सिध्द केले. देशव्यापी संवाद तर त्यातून घडलाच जोडीला पंतप्रधानांच्या एकसुरी राजसत्तेला राजधर्माचा सल्ला देण्याचे मोठे कामही झाले. या लक्षवेधी प्रयत्नाबद्दल सरसंघचालक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.

टॅग्स :Pranab Mukherjee at RSS Tritia Varshराष्ट्रीय स्वयंसेवक संघ तृतीय वर्ष समारंभात प्रणब मुखर्जी