हरीष गुप्ता,
नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
संसद अधिवेशन चालू असताना रोजच्या रोज काही ना काही नाट्य तेथे रंगत असते. मात्र संसद भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी एक दुसरे नाटक हल्ली रंगताना दिसते. ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’चे अत्याधुनिक महागडे जिम आणि स्पामध्ये सर्व पक्षांचे खासदार बाष्प स्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश करून घेऊन घाम गाळत आहेत. या ठिकाणी वजन कमी करून शरीर सुडौल करणारे उपचारही केले जातात. भाजपच्या कंगना राणावत कधी तेथे दिसतात, तर कधी तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसीसुद्धा ‘डीटॉक्स’ करून घेण्यासाठी स्पामध्ये जातात. या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची यादी मोठी असून, सर्वपक्षीय आहे. संसदेच्या सभागृहात एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या खासदारांची येथे मात्र तंद्री लागलेली असते.
बदाम तेलाचे मालिश, वेगवेगळ्या लांबीच्या बांबूच्या काठ्या गरम करून शरीराला केले जाणारे मर्दन, पोटावरील चरबी कमी करणे, शरीराची कांती वाढवणारी कर्मे इत्यादी गोष्टी येथे उपलब्ध असून त्यासाठी साधारणत: २ ते ५ हजारांदरम्यान शुल्क आकारले जाते. येथील कर्मचारी पंचतारांकित दर्जाचे, सतर्कता बाळगणारे असून क्लबमध्ये कोण कोण येते हे बाहेर न सांगण्याच्या सक्त सूचना त्यांना आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असते तेव्हा येथे गर्दी होते. अनेक खासदार आपल्या अर्धांगिनींनाही घेऊन येतात, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सभागृहात परस्परांशी भांडण्यात तोंडाची वाफ दवडणारे सर्वपक्षीय खासदार येथे मात्र एकाच वाफेचा शेक घेतात. क्लबच्या जिममध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश नाही. ते खासदार आणि त्यांच्या नातलगांसाठीच आहे. परंतु सलून आणि स्पाच्या बाबतीत असे नाही. खासदाराने शिफारस केलेल्या व्यक्तींना तिथे प्रवेश मिळतो. एकूण काय, संसदेत अधिवेशनादरम्यान सभागृहात‘डिटॉक्स’ होवो-न होवो, खासदारांच्या व्यक्तिगत ‘डिटॉक्स’ची सोय झालेली आहे!
योगी यांची राष्ट्रीय प्रतिमा निर्मिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रादेशिक राजकारणाच्या पलीकडे जाणारी आपली प्रतिमा हळूहळू तयार करताना दिसतात. या प्रयत्नाच्या केंद्रस्थानी सध्या आहे ‘अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हे त्यांच्या जीवनावर आधारित ताजे पुस्तक. त्यावर आधारित ‘द माँक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या नावाचा चित्रपटही येतो आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट यावर्षीच प्रदर्शित होईल. रवींद्र गौतम यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, अनंत जोशी त्यात काम करत आहेत. उत्तराखंडमधील एका खेड्यात जन्मलेल्या मुलाचा आध्यात्मिक प्रवास आणि राजकीय उदय कसा झाला; सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशसारख्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत तो कसा पोहोचला हे या चित्रपटाचे कथासूत्र आहे.. अखिल भारतीय पातळीवर प्रभाव पाडू शकेल, असे नेतृत्व म्हणून योगींना सादर करण्यात आले आहे.
हिंदुत्वाचा विचार आणि कणखर प्रशासन याचे मिश्रण असलेला नेता अशी योगी यांची प्रतिमा तयार केली जात आहे. एकंदर शैली आणि कारभार या बाबतीत योगी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सातत्याने तुलना होत असते. भाजपच्या सत्ता संरचनेत मोदी यांचे नैसर्गिक उत्तराधिकारी म्हणून योगी यांचे चित्र रंगवले जाते. ‘दि एक्सडेंटल प्राइम मिनिस्टर’ किंवा ‘इमर्जन्सी’ यासारख्या आधी निघालेल्या राजकीय चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर ‘अजेय’ हे चरित्र अचूक वेळ साधून काळजीपूर्वक सिद्ध केले गेले आहे. आगामी निवडणुकांच्या काळात उत्तर प्रदेशच्या बाहेर योगी यांचा प्रभाव पसरवण्याची ही अत्यंत हिशेबी अशी चाल आहे. हल्ली राष्ट्रीय माध्यमांत योगी खूपदा दिसतात, त्यामागेही हीच गणिते आहेत.
पंतप्रधान असतील तेथे मार्ग निघणारच बऱ्याच काळापासून भिजत पडलेला एक प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजना आणली आहे. केंद्र सरकारमध्ये शेकडोंच्या संख्येने असलेले अतिरिक्त तांत्रिक कर्मचारी अभियंते आणि तज्ज्ञ यापुढे बिगरतांत्रिक कामाला लावले जातील, अशी ही योजना आहे. केंद्रातील बिगर तांत्रिक रिक्त पदांवर या अतिरिक्त तांत्रिक अधिकाऱ्यांची सोय लावली जाईल. मोदी यांनी निर्णायक हस्तक्षेप केल्यामुळे हा बदल घडू शकला. अतिरिक्त तांत्रिक कर्मचाऱ्यांना बिगरतांत्रिक रिक्त पदांवर नेमण्याचे हे धोरण असून त्यांची सेवाज्येष्ठता आणि पात्रता याची बूज त्यात राखली जाणार आहे. कोणताही कर्मचारी कामाशिवाय बसून राहणार नाही हे यातून पाहिले जाईल. ‘किमान सरकार, कमाल कारभार’ या मोदींच्या सूत्राशी हे मिळतेजुळते आहे. harish.gupta@lokmat.com