अरविंद सावंत, खासदार
आम्ही चळवळीतील माणसे दुसऱ्यांच्या न्यायासाठी झगडत असताना स्वतःच्या कुटुंबावरच सगळ्यात जास्त अन्याय करतो. कुटुंबाने तो मानला तर अन्याय असतो. पण, आपला माणूस चांगले काम करीत असल्याचा आनंद होऊन कुठल्याही अपेक्षा न बाळगता कुटुंब जेव्हा सोबत उभे राहते तेव्हा चळवळीचा सार्थ परिणाम झाल्याचे समाधान मिळते. माझ्या यशामध्ये पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिने घराची जबाबदारी घेतल्यामुळेच माझा प्रवास चांगला होत आहे. पक्षासाठी झटताना पत्नी, मुलांकडे फार लक्ष देता आले नाही ही खंत आहे. पण, असे म्हणतात, 'शांततेला एक सोनेरी किनार असते. त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही,' असे आमच्या बाबतीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शिवडीमध्ये ३१ डिसेंबर १९५१ ला माझा जन्म झाला. चार बहिणी, तीन भाऊ अशी आम्ही सात भावंडे. वडील गणपत सावंत मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते. आई आशालता सावंत हिनेच सर्वांचे पालनपोषण केले. ती जातपातविरहित होती. कधीही आमच्या मित्र, मैत्रिणींची जात तिने विचारली नाही. पण, ती कडक शिस्तीची होती. अभ्यासात हयगय केलेली तिला चालत नसे. वडिलांचाही धाक होता. विधान परिषदेत आमदार आणि आता तीन वेळा खासदार झाल्यानंतरही घरातली साफसफाई किंवा छोटी-मोठी कामे करतो. बाहेरून आल्यानंतर कपडे, चप्पल नीट ठेवतो. आई, वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांच्या शिकवणीमुळे बडेजाव मग तो घरातील असो वा संघटनेत मला आवडत नाही.
कोकणी असल्याने शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आवडते. कष्टात दिवस काढल्यामुळे विशिष्ट ब्रँडचे असावेत असा बडेजाव नाही. शिवडीच्या चेतन टेलरकडून कपडे शिवतो. कलरही सगळे चालतात. पण, त्यात ऑफ व्हाईट, ब्ल्यू, ग्रे हे कलर आवडीचे. सेल लागला असेल तर तिथेही खरेदी करतो.
आमचे ते अव्यक्त प्रेम
लग्नाला ४२ वर्षे झाली. कधी स्वतंत्र फिरायला गेलो नाही. पत्नीला ठरवून कार्यक्रमाला, नाटकाला, सिनेमाला नेले नाही. पण तिने कधीच तक्रार केली नाही. मुलांचा अभ्यास घेणे, कुटुंबाचा सांभाळ हे सर्व पत्नीने केले. मुलांची अॅडमिशन आणि ती पास झाली की नाही इतकेच मी पाहिले. मुलांकडे, तिच्याकडे कधी लक्ष दिले नाही. वर्षातून एकदा मित्रांसोबत टूरला न्यायचे. कधी आमदार -खासदारांच्या टूरमध्ये नेले तर तेवढाच तिला माझा सहवास. त्यातही ती आनंद मानायची. पण, कुठे सभा, मीटिंग आहे याची तिला माहिती असते. मित्रांकडे काळजीने जेवणाची चौकशी करते. ९२ च्या आजारामध्ये मी जातो की वाचतो अशी परिस्थिती होती. तिने सगळी काळजी घेतली. आमचे एकमेकांवर अव्यक्त प्रेम आहे...
वृत्तपत्रे हीच विश्वासार्ह
मला वाचनाची प्रचंड आवड आहे. सकाळी ७ ते ८ वाजता उठून रात्री झोपायला साधारण दीड वाजतात. सकाळी वर्तमानपत्रे वाचल्याशिवाय दिवस पुढे जात नाही. काही वर्तमानपत्रांमधील स्तंभ लेख आणि रविवारच्या पुरवण्या वेळ काढून आवर्जून वाचतो. लोक सोशल मीडियात गुंतले आहेत. पण, वर्तमानपत्र हाच खरा विश्वासार्ह माहितीचा दुवा आहे.
वक्तृत्वाचे बाळकडू
शाळेत महापालिका शाळेत शिक्षण घेताना नकळत संस्कार झाले. नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम शाळेत होत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषांतून भाषणे होत. ८वी ते ११वीपर्यंत चार वर्षे इंग्रजीतून भाषण केले. त्यामुळे पाठांतर झाले, भाषा सुधारली, वक्तृत्व आले. त्याचा पुढे उपयोग झाला. मुलामुलींची संयुक्त शाळा, त्या सर्वांशी कौटुंबिक नाते तयार झाले.
शब्दांकन : महेश पवार