- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)आयुष्यभर अनेक जण निरलस वृत्तीने काम करीत असतात. ‘कीर्ती प्रेरणा’ त्यामागे असतेच असे नाही. तरीही वाटेवरच्या सावलीसारखा एखादा मोठा सन्मान, पुरस्कार प्राप्त झाला, तर मानवी स्वभावानुसार कोणालाही त्याचे अप्रूप वाटल्याशिवाय राहात नाही. भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्म पुरस्कार तर देशातला सर्वाेच्च नागरी सन्मान समजला जातो. ६७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ११२ मान्यवराना यंदाही हे पुरस्कार जाहीर झाले. पण त्यामागील कवित्व अद्याप संपलेले नाही.भारतात १९५४ सालापासून सुरु झालेले े पद्म पुरस्कार नेमके कोणाला द्यावेत, याचे विशिष्ट नियम अथवा पध्दती ठरलेली नाही. विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची शिफारस, राज्य सरकारे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करतात. संमतीवजा अर्जही त्यासाठी इच्छुक पुरस्कारार्थींकडून भरून घेतले जातात. पुरस्कार जाहीर होईपर्यंत त्यात कमालीची गुप्तता पाळली जाते. पद्म सन्मान प्राप्त करण्यासाठी लोक तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्नही करतात. त्याचा एक किस्सा जानेवारीच्या सुरूवातीलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून साऱ्या देशाला समजला. गडकरी म्हणाले, ‘पद्मभूषण पुरस्काराच्या शिफारशीसाठी मध्यंतरी विख्यात अभिनेत्री आशा पारेख माझ्याकडे आल्या. काही वर्षांपूर्वी त्यांना पद्मश्री मिळाली होती. आता त्यांना पद्मभूषण हवा होता. लिफ्ट नादुरूस्त असल्याने त्या १२ मजले चढून माझ्याकडे आल्या. त्याचे मला वाईट वाटले’. आशा पारेख यांचे नाव यंदाच्या यादीत नाही! भारत मूलत: एक संवेदनशील देश आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या काही अप्रिय घटना गेल्या ४/५ महिन्यात इथे घडल्या. देशात सहिष्णुता शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न त्यातून उभा राहिला. असहिष्णुतेच्या घटनांचा प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यासाठी, देशातले मान्यवर लेखक, साहित्यिक, कलावंत, इतिहासकार, वैज्ञानिक आदी मैदानात उतरले. आपल्याला पूर्वी मिळालेले पुरस्कार त्यांनी परत केले. ‘पुरस्कार वापसी’चे हे शस्त्र मोदी सरकारच्या वर्मावर घाव घालणारे ठरले. आॅक्टोबर महिन्यात या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा आपली सरकारनिष्ठा दाखवून देण्यासाठी, पुरस्कार वापसी मोहिमेच्या विरोधात अभिनेते अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनापर्यंत एक मोर्चा निघाला. मोर्चात दिग्दर्शक निर्माते मधुर भांडारकर, पार्श्वगायिका मालिनी अवस्थीही उत्साहाने सहभागी झाल्या. पद्म पुरस्काराच्या ताज्या यादीत या तिघांचाही समावेश आहे! याला योगायोग म्हणावे काय? अनुपम खेर श्रेष्ठ दर्जाचे अभिनेते आहेत, याबाबत शंका नाही. तथापि आपल्या फटकळ स्वभावानुसार त्यांनी २६ जानेवारी २0१0 रोजी पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कलावंतांच्या पात्रतेवर शंका घेणारा एक संदेश ट्विट केला होता. त्यात ते म्हणतात, ‘पुरस्कार हा देशातल्या व्यवस्थेने अक्षरश: चेष्टेचा विषय बनवला आहे. कोणत्याही पुरस्कारात आता प्रामाणिकतेचा लवलेशही दिसत नाही. मग तो पुरस्कार चित्रपट क्षेत्रातला असो की पद्म पुरस्कार’! खेर यांनी ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली तेव्हा अभिनेत्री रेखा, आमीरखान, सैफ अलीखान, ए.आर.रहेमान, जोहरा सहगल आदी कलावंतांना पद्म सन्मान प्राप्त झाला होता. खरं तर त्यापूर्वी वाजपेयी सरकारच्या कालखंडात अनुपम खेर यांनाही पद्मश्रीने गौरवण्यात आले होते. तथापि पद्मभूषण मिळवण्यासाठी मोदी सरकार येईपर्र्यंत त्यांना वाट पाहावी लागली. या दोन्ही घटनांमागे राजकीय वरदहस्तच कारणीभूत तर नसावा ना, याचा खुलासा बहुधा खेर स्वत:च अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यंदा पुरस्काराच्या यादीत नाव झळकताच, खेर यांना जणू आयुष्याचा ‘सारांश’च गवसला. तो व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर त्यांनी अनेक संदेश जारी केले. नव्या संदेशात ते म्हणतात, ‘पद्मभूषण जाहीर झाल्यामुळे मी अत्यंत खूष आहे, कारण अनेक वर्षांची मेहेनत फळाला आली आहे. कारकुनी करणाऱ्या काश्मीरी पंडिताच्या या मुलाने सुरूवातीचे दिवस प्लॅटफॉर्मवर काढले. त्यानंतर ४00 चित्रपटात काम केले.’ वगैरे वगैरे... पद्म पुरस्कारांची यादी न्याहाळताना त्यातील कोणते लोक सरकारचे निकटवर्ती आणि सरकारच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत, असा प्रश्न कोणाच्याही मनात आल्यावाचून राहात नाही. सरकार कोणाचेही असो, प्रत्येकवेळी पद्म पुरस्कारांबाबत असेच घडत असावे. पद्मविभूषण प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत यंदा जगमोहन यांचे नाव आहे. जम्मू काश्मीरमधे १९९0च्या बदनाम रक्तरंजित कालखंडात जगमोहन यांनी राज्यपालपद भूषवले होते. त्या स्मृती जाग्या झाल्यामुळे या पुरस्काराबाबत काश्मीरच्या भूमीत संतापदग्ध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसरे श्री श्री रविशंकर यांंना अध्यात्म आणि योग क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मभूषण जाहीर झाले आहे. गतवर्षी त्यांनी स्वत:च गृहमंत्री राजनाथसिंहांंना कळवले होते की हा सन्मान माझ्याऐवजी अन्य कोणाला प्रदान करा. यंदा मात्र तसे काही ते म्हणाले नाहीत. संपुआ सरकारच्या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उघड करणारे भारताचे माजी महालेखापाल विनोद राय यांना यंदाचा पद्मभूषण जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुरस्कारांच्या यादीच्या खोलातच शिरायचे झाले तर सरकारची मेहेरनजर असलेली अनेक नावे डोळयासमोर येतात. बिहारच्या ताज्या निवडणुकीत अजय देवगणने भाजपाचा प्रचार केला होता. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या पहिल्या गुगल हँगआऊटचे संचलनही त्यानेच केले होते. आता तो पद्मश्री देवगण बनेल. आपल्या गुणवत्तेनुसार गायक उदित नारायण पद्म पुरस्कारासाठी पात्र असले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘मोदी आनेवाला है’ हे गाणे त्यांनीच गायले होते. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चंदेरी पडदा गाजवणाऱ्या प्रियंका चोप्राला अतुल्य भारतची ब्रँड अँम्बॅसडर नियुक्त करून सरकारने एक पुरस्कार तर अगोदरच प्रदान केला होता. आता पद्म पुरस्काराचा सन्मानही तिला प्राप्त होणार आहे. यापैकी कोणाच्याही घोषित पुरस्काराला कमी लेखण्याचा हेतू नाही. सरकारच्या निर्णय प्रक्रियेविषयी मात्र शंका जरूर उपस्थित होते.पद्म पुरस्कार वस्तुत: देशाच्या सर्वाेच्च सन्मानाचा प्रतीक आहे. तो प्राप्त करणाऱ्यांची टवाळी करणे सर्वार्थाने वाईट. तरीही पद्म पुरस्काराची यादी जाहीर होताच, यापैकी अनेकांवर थेट कॉमेंटस तर काहींची जोरदार खिल्ली उडवणारे हजारो संदेश सोशल मीडिया आणि व्हॉटस् अॅपवर फिरू लागले. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की ज्या मान्यवरांना खरोखर आपल्या गुणवत्तेवर आणि केलेल्या कामाच्या कसोटीवर पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यांच्याकडेही या निमित्ताने विनाकारण संशयाने पाहिले जाते.