सीताराम येचुरी(संसद सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट) -नुकताच शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या ८४ व्या हौतात्म्य दिनानिमित्त हुसैनीवाला येथे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एक स्मृती समारंभ झाला. त्यासंबंधीच्या पानभर पसरलेल्या बहुरंगी जाहिराती राष्ट्रीय वृत्तपत्रांमधून झळकल्या. विरोधाभासाचे हे एक उत्तम उदाहरण मानावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा असलेले मोदी सरकार धार्मिक विद्वेषाचे विष पसरवून देशातील वातावरण प्रदूषित करीत आहेत. त्यातूनच अल्पसंख्याकांची श्रद्धास्थाने व धार्मिक स्थळे यांच्यावर हल्ले होत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे नवी मुंबई येथे चर्चवर झालेला हल्ला आणि त्यापाठोपाठ पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्हयात कॉन्व्हेन्ट आॅफ जीझस येधे एका सत्तर वर्षे वयाच्या जोगिणीवर झालेला बलात्कार.स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींंच्या हत्त्येनंतर सरकारतर्फे माध्यमांना दिलेल्या निवेदनात रा. स्व. संघावर बंदी घालताना असे म्हटले होते की, ‘संघाच्या हरकतपात्र आणि विघातक कारवाया अव्याहतपणे चालू आहेत आणि संघप्रणीत आणि संघप्रेरित हिंसेने आजवर अनेक बळी घेतले आहेत. गांधीजींसारखा महत्त्वाचा मोहराही आज त्या हिंसेचा बळी ठरला आहे.’नुकत्याच १४ मार्च ते १६ मार्च २०१५ या काळात नागपूर येथे भरलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत धार्मिक अजेंडा पुढे रेटण्यासाठी बहुआयामी पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरले. या बैठकीस भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व विहिंपचे प्रमुख प्रवीण तोगडिया हजर होते.संघाच्या मते सर्व भारतीय हे राष्ट्रीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि जनुकीयदृष्ट्या हिंदूच आहेत. माध्यमांच्या बातम्यांनुसार संघप्रमुख असे म्हणाले की, ब्रिटिशांनी भारतात चौदाव्या शतकापासूनच धर्मांतरे करण्यास सुरुवात केली होती आणि आता जर काही लोकांना हिंदू धर्मांत परत यावयाचे असेल तर स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली पाहिजे. याउलट भारतातील राष्ट्रीय ख्रिश्चन संघटनेने १८ मार्च २०१५ रोजी एका निवेदनाद्वारे असे जाहीर केले आहे की, भारतातील ख्रिश्चनांना भारतातील प्राचीन आणि समृद्ध अशा सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक विविधतेचा अभिमान आहे. भारताची विविधता आणि अनेकता हीच खरी सांस्कृतिक ओळख आहे. सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध राष्ट्र ही अशक्यप्राय गोष्ट आहे.याच संघ कार्यकारिणीने जम्मू-काश्मीरमध्ये बीजेपीने आघाडी सरकार स्थापन करताना दाखवलेल्या निर्लज्ज संधिसाधूपणाचेही समर्थन केले आहे. परंतु त्यांच्या सहसचिवाने असेही म्हटले आहे की, संघाची कलम ३७० विषयीची भूमिका कायम असून, तिच्याबाबत तडजोड होणार नाही. आम्ही परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहोत आणि परिस्थिती सुधारली नाही तर काय करायचे ते आम्ही पाहू. या विधानात दडलेली गर्भित धमकी कुणाच्याही लक्षात येईल अशीच आहे. आणि म्हणूनच ज्या भगतसिंगाने स्वत:ला नि:संदिग्धपणे नास्तिक म्हणवून घेतले आणि ज्याने भारतात सर्व नास्तिक आणि विविध धर्मीय लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदावेत यासाठी प्रचार केला, त्या भगतसिंगाचा हौतात्म्य दिन पंतप्रधान मोदी व संघ यांनी पाळावा, हा विरोधाभास आहे.१९३०-३१ मध्ये लाहोर सेंट्रल जेलमधे त्याच्याबरोबर तुरुंगात असलेल्या एका स्वातंत्र्ययोद्ध्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना भगतसिंग म्हणतो की, तो एखाद्या वीराप्रमाणे शेवटपर्यंत ताठ मानेने राहील, अगदी फाशी जातानासुद्धा! त्याचे हौतात्म्य भारतीयांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या त्याच्या ध्येयापासून वेगळे करता येणार नाही. ‘इन्किलाब झिंदाबाद’ हा नारा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला देणारा शहीद भगतसिंगच होता हे विसरता येणार नाही.पंतप्रधान मोदींनी हा हौतात्म्य दिन पाळणं हे अजून एका कारणाने विरोधाभासात्मक आहे. अधूनमधून पंतप्रधानांच्या कार्यालयातून पंतप्रधानांनी ट्विटरवर जरी सहिष्णुतेचे आवाहन केले तरी आतापर्यंत पंतप्रधानांनी संसदेला याबाबतीत कोणतीही कारवाई करण्याबाबत ठोस आश्वासन देण्यास सपशेल नकार दिला आहे. धार्मिक सहिष्णुता ही आवश्यक आहेच; तथापि, धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी ती पुरेशी नाही. हे ध्येय गाठायचे असेल तर सर्व धर्मांच्या लोकांना समानतेने वागवले जाण्याची घटनात्मक हमी तंतोतंत पाळली गेली पाहिजे. परंतु मोदी सरकारचा हा दुहेरी कार्यक्रम आहे, की एका बाजूला धर्माच्या नावाने ध्रुवीकरण करणाऱ्यांना गोंजारायचे व दुसऱ्या बाजूने बेदरकारपणे अशा आर्थिक सुधारणा पुढे रेटायच्या, ज्यामुळे एतद्देशीय तसेच परकीय गुंतवणूकदारांचा भरपूर फायदा होईल. परंतु यामुळे देशातील सामान्य जनता भरडली जाईल आणि देशातील साधनसंपत्तीचीही बेसुमार लूट होईल त्याचे काय?
जातीय विद्वेषाचे प्रदूषणकर्ते मोदी सरकार
By admin | Updated: April 2, 2015 23:15 IST