शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मिली ‘भगत’

By admin | Updated: August 31, 2016 04:40 IST

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते.

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते. एका ठिकाणी बोलताना नानाने मुद्दा उपस्थित केला की, महाराष्ट्रातील श्रीमंत देवस्थानांनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला हे माहीतच आहे. नानाच्या या आवाहनाची आठवण तुळजापूर येथील भवानी मातेच्या दानपेटी घोटाळ्याच्या सीआयडी अहवालानंतर आली. हा गाजलेला देवस्थान घोटाळा आहे. असुरांचे निर्दालन करणारी भवानी घोटाळेबाजांच्या कोंडाळ्यात अडकली. प्रवीण गेडाम या जिल्हाधिकाऱ्याने हा घोटाळा बाहेर काढला. या घोटाळ्याचा तपास अहवाल सांगतो की, ३९ किलो सोने आणि ६ क्विंटल ८ किलो चांदी एवढा ऐवज गडप केला गेला आहे. बाजारभावाने याचे मूल्यांकन ७ कोटी १९ लाख रुपये होते.आपल्याकडे माणसाचे जीवनमान उंचावते की नाही हा प्रश्न असला तरी कोणत्याही देवस्थानांची श्रीमंती झपाट्याने वाढताना दिसते. म्हणूनच अशी देवस्थाने ताब्यात राहावीत असा धनदांडग्यांचा प्रयत्न असतो. सरकारचे नियंत्रण असणाऱ्या सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या व्यवस्थापन समित्यांवर वर्णी लागण्यासाठी तर साठमारी सुरू असते, म्हणजे श्रीमंत देवस्थानांच्या कमिटीवर जाण्यासाठी सारेच राजकीय भगत उतावीळ असतात. तुळजाभवानी मंदिरातील घोटाळ्यात सीआयडीने ११ आयएएस अधिकारी, ९ उपविभागीय अधिकारी, ९ तहसीलदार, ८ माजी नगराध्यक्ष, १० ठेकेदार, १४ कारभारी आणि १ आमदार अशा ६२ जणांवर ठपका ठेवला आहे. १९९१ ते २००९ या काळातील दानपेटी घोटाळ्याची सुरुवात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या निर्णयानंतर झाली. दानपेटीचा लिलाव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदिराचे उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा उद्देश होता, पण रिंग पद्धतीने लिलाव सुरू झाले आणि सर्व संमतीने ते चालले. मंदिराचे उत्पन्न वाढण्याऐवजी या कोंडाळ्याचे वाढले. कारण येथे तर भगतांचीच मिलीभगत झाली होती.तुळजाभवानीच्या केवळ दानपेटीवरच डल्ला मारला गेला नाही, तर इनामी जमिनीसुद्धा अशाच घशात घातल्या आहेत. या देवस्थानाची उस्मानाबाद, बीड, सोलापूर आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये ३८५५ एकर जमीन आहे. यातील ११७१ एकर वाकोजी बुवा मठाला, १९४१ एकर भारतीबुवा मठ, ६९१ एकर प्रकाशनाथ मठ, ५२ एकर हमरोजी बुवा मठ अशी दिली आहे. या मठांच्या महंत, पुजाऱ्यांनी भक्तांना मोफत सेवा, भोजन द्यावे, मंदिराची झाडझुड, नंदादीप आदी व्यवस्थेसाठी निजामाने दिली होती. इनामी जमीन विकता येत नाही, तिला कुळ लागत नाही आणि ती हस्तांतरितही करता येत नाही, असा कायदा असताना २६३ एकर जमिनीचे फेरफार करण्यात आले. ६३ एकर जमिनीला कुळ लागले. काही जमिनी खालसा झाल्या, कारण येथेही मिलीभगत. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी सेवेकऱ्यांवर ठपका ठेवला. हे प्रकरण आता औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेले. परवा याच्या चौकशीची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात झाली. हे तुळजाभवानीचे प्रकरण महाराष्ट्रात वानगीसारखे आहे. या राज्यात असे देवस्थान नसेल ज्याचा तंटा न्यायालयात गेला नाही. श्रद्धेच्या मांडलेल्या बाजाराचा हा नमुना राज्यभर पाहायला मिळतो. याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यमांची कोंडी करण्यासाठी धर्ममार्तंड पुढे येतात, हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्र निमूटपणे पाहत असतो. श्रीमंत देवस्थाने, मठ ही केवळ भक्तीची ठिकाणे राहिली नाहीत. पैशापाठोपाठ येथे हितसंबंध आले, रुजले आणि त्याच्या गाठी तयार झाल्या. त्याला राजकीय खतपाणी मिळाले. अशा शक्तिपीठांचा आणि धर्ममार्तंडाचा निवडणुकीत राजकीय पक्षाकडून होणारा वापर आपण पाहतोच. कारण येथेही राजकीय नेते आणि मठाधीशांची मिलीभगत असते. ईश्वराला काय पाहिजे दोन हात आणि तिसरे मस्तक, असे समजणाऱ्यांचा काळ संपला. आता भगत-भोप्यांचा कल्लोळ तेवढा उरला.- सुधीर महाजन