भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. एखाद्या सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्काराचा आनंद साहित्य, लेखन या प्रक्रियेशी फारसा संबंध नसणाऱ्या मराठी माणसांनीही मनमुराद उपभोगावा हे नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच अनुभवायला मिळाले. मराठी मनाचे सांस्कृतिक एकजीनसीपण समोर आणणाऱ्या फारच थोड्या घटना इतिहासात घडलेल्या आहेत. ज्ञानपीठ हे निमित्त घडले नसते तरी भालचंद्र नेमाडे हा मराठी अस्मितेचा मानबिंदू कायम राहिला असताच. नेमाडे मानतात त्याप्रमाणे साहित्य लेखन ही सांस्कृतिक हस्तक्षेपाची, जबाबदारीने करावयाची कृती आहे. समाजसंस्कृती, जगणं आणि लेखन या तीनही घटकांच्या अभिन्नत्वाचा पुरस्कार नेमाडेंनी वारंवार केला आहे. देशीयतेचा पुरस्कार करताना, देशी याचा अर्थ त्या-त्या भूमीशी जोडलेले असणे, प्रत्येक मानवी समूहाची आपली स्वत:ची संस्कृती असणे, माणसाला किंवा साहित्याला आपल्या भूमीवरच, आपल्या भाषिक समूहातच डौलाने उभे राहता येते, अशी किती तरी विधाने नेमाडे यांनी केलेली आहेत. पण त्यासोबत, बाहेरील प्रभाव आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला देशीकरण म्हणतात, असंही ते म्हणतात. यातून देशीवादाची व्याप्ती लक्षात येते. नेमाडेंनी त्यांचा देशीवाद बहुजन जाणिवेच्या अंगाने मांडून मराठी समीक्षेला एक नवा आयाम दिला आहे. एकोणीसशे पंचाऐंशीनंतरची मराठी साहित्य समीक्षा सतत नेमाड्यांच्या लेखनाभोवती फिरत राहिली आहे. हे त्यांच्या टोकाच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागते. सर्जनात्मक, समीक्षणात्मक आणि वैचारिक लेखनाच्या पातळीवर नेमाडे हे कोणाला इच्छा असूनही टाळता न येणारे अपरिहार्य लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य लेखनाचा अर्धशतकाचा प्रवास पूर्ण झाला आहे. कोसला (१९६३) ते हिंदू (२०११) अशा या प्रदीर्घ कालखंडाच्या पोटात नेमाडे यांची समीक्षा, कादंबरी लेखन, कविता, संशोधनात्मक लेखन, संपादने असा पसारा पांगलेला आहे. एखाद्या लेखकाचा अतिशय परिपक्व असा अर्धशतकाचा एवढा लक्षवेधी आणि पृथगात्म प्रवास अपवादालाच पाहायला मिळतो. त्यांच्या लेखनाने या समग्र काळाला कवेत घेऊन प्रभावित केले आहे. अनुभवाला आणि भाषेला थेटपणानं भिडण्यापासून, आपल्या मुळांचा शोध घेणं ही प्रक्रिया लेखनाच्या पातळीवर स्वत:सह, आपल्या भूतभविष्यवर्तमानासह उत्खनन करून समोर ठेवणे, हे नेमाड्यांनी त्यांच्यानंतर येणाऱ्या समग्र लेखक कलावंतांसाठी करून ठेवलेले मोठे ऐतिहासिक काम आहे. दु:खाचा अंकुश असो सदा मनावर, चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत, लक्षात राहात नाहीत बिचारी, असं म्हणणारा हा थोर लेखक ज्ञानपीठाचा भरीव आनंद मनात साठवूनही म्हणूनच कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत तोलता येत नाही. या चौकटीला समृद्ध करून मराठी मनाला आणि एकूणच बिनचेहऱ्याला त्याची ओळख करून देणारा हा सांगवीचा पांडुरंग कधीचाच चिरंजीव झाला आहे.