शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

लोन ॲपवरून कर्ज ?- ते तुमचा गळा आवळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 08:09 IST

कसल्याही कागदपत्रांविना काही मिनिटांत माेठमोठी कर्जे देणाऱ्या ॲपच्या जाहिराती गरजूंना भरीस पाडतात आणि सुरू होतो वसुलीसाठीचा निर्घृण छळ!

- रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकारपाच - सहा वर्षांपासून झालेला अल्पावधीत कर्ज देणाऱ्या डिजिटल ॲपचा सुळसुळाट आणि त्यानंतर कर्जवसुलीसाठी रिकव्हरी एजंटांनी घातलेला धुडगूस सर्वांना ठाऊक आहे. कर्ज बुडवीचं वैयक्तिक प्रकरण म्हणून तपास यंत्रणांनी या प्रकारांकडे फारसं गंभीरपणे न पाहणं आता भलतंच महाग पडत चाललं आहे. या एजंटांच्या छळसत्रामुळे कर्जदारांनी मृत्यूला कवटाळण्याच्या देशभरात घडलेल्या घटना थरकाप उडवणाऱ्या आहेत. आतापर्यंत आत्महत्यांच्या साठ प्रकरणांमध्ये रिकव्हरी एजंटनी केलेला अनन्वित मानसिक छळ आणि टोकाची बदनामी हे कारण असल्याचं उघड झालंय. पण, कारण उघड न झालेल्या अशा आणखी घटना कैक पटीत असण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांपूर्वी भोपाळ येथे एका तरुण दाम्पत्याने आपला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीसह स्वतःचं जीवन संपवलं. या इसमाने लिहिलेल्या चार पानी सुसाइड नोटमध्ये रिकव्हरी एजंटांनी केलेल्या बदनामीसत्राचा तपशीलवार उल्लेख आहे. ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपनीने त्याला  कर्जाच्या जाळ्यात अडकवून नंतर कर्जवसुलीसाठी प्रचंड दबाव आणल्याचं त्यातून उघडकीस आलं. लोन ॲपद्वारे घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न करता आल्याने होणारी बदनामी असह्य होऊन अशा आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. कोची येथेही अशाच प्रकारे एका दांपत्याने दोन लहान मुलांचे गळे दाबून नंतर आत्महत्या केली. बंगळुरू येथे लोन ॲपवरून कर्ज घेतलेल्या इंजिनिअरिंगच्या बावीस वर्षीय विद्यार्थ्यानेही आई -वडिलांची माफी मागणारं पत्र लिहून त्यांना अलविदा केला. अशाच प्रकरणातून तामिळनाडू, आंध्र प्रदेशात घडलेल्या आत्महत्या कमालीच्या हादरवून गेल्या. अनेक ॲपकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आजीचे दागिने विकून करता यावी यासाठी एका मुलीने तिच्या आजीची हत्या केल्याचा आरोप आहे. अशाप्रकारे आतापर्यंत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

कर्जवसुलीसाठी बेकायदेशीर कृत्य करून कर्जधारकाला सळो की पळो करून सोडायचे प्रकार पूर्वीपासून घडत आहेत. बँकांनी दाखलेबाज गुंडांना रिकव्हरी एजंट म्हणून नेमल्याचं अनेकदा उघड झालंय. पण आता कर्ज देतानाच कर्जदाराचा मोबाइल हॅक करून त्यातील डेटाचा गैरवापर करून रिकव्हरीसाठी बदनामी  करण्याचा अतिशय क्रूर मार्ग हे रिकव्हरी एजंट अवलंबत असल्याने कर्जदार आत्महत्या करत आहेत.

कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता अथवा सिबील स्कोअरची नोंद न घेता अवघ्या तीस मिनिटांत दोन हजारांपासून लाखो रुपयांची कर्जे देणाऱ्या ॲपच्या जाहिराती गरजूंना कर्ज घेण्यास भरीस पाडतात. कर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रं न मागता केवळ आपल्या कंपनीचं ॲप डाऊनलोड करण्यास सांगितलं जातं. ते ॲप डाऊनलोड होताक्षणीच मोबाइल हॅक होत कर्जदाराच्या साऱ्या नाड्या लोन कंपनीच्या हातात गेलेल्या असतात.  मोबाइलमधील सगळे संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओसह सारं नियंत्रण त्या कंपनीकडे जातं आणि त्याचाच गैरफायदा घेतला जातो.

अव्वाच्या सव्वा व्याज आकारल्याने ठरलेल्या मुदतीत हप्ते भरणं शक्य न झाल्यास फोन कॉलचा ससेमिरा सुरू होतो. जणू काही कंपनी हप्ते थकण्याचीच वाट पहात असते. कर्जदार अडचणीत असल्याची खात्री पटली की, व्याजदर वाढवून त्याला आणखीच हैराण केलं जातं. रिकव्हरी एजंटाकडून दिवसाला तीस - चाळीसहून अधिक फोन कॉल येऊ लागतात. सुरुवातीचा नरमाईचा  सूर नंतर वेगाने बदलत जातो.  अर्वाच्य शिवीगाळ सुरू होते. घरच्या महिलांबाबत अनुद्गार काढले जातात. अवमान आणि अवहेलना करण्याची परिसीमा होते. तरीही कर्जदार हप्ता देत नसेल तर हॅक केलेल्या मोबाइलचा आधार घेत पुढचा भयानक टप्पा सुरू होतो. दोन - तीन दिवसांचा कालावधी देऊन त्यानंतर मोबाइलमधील कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी, सहकारी यांच्या संपर्क क्रमांकावर फोन करून त्यांचाही छळ करण्याची धमकी देत ती प्रत्यक्षातही उतरवली जाते. पुढची पायरी असते ती त्याच क्रमांकांवर कर्जदाराचे मॉर्फ केलेले नग्नावस्थेतील फोटो पाठवण्याची. या प्रकरणात आजवर झालेल्या आत्महत्यांपैकी अनेक आत्महत्यांमागे हेच कारण आहे.

ही बहुतेक लोन ॲप्स चीन, कंबोडिया, हाँगकाँग येथून चालवण्यात येतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणा हतबल आहेत. ॲप कंपन्या विदेशी असल्या तरी रिकव्हरीसाठी त्यांनी एजंट मात्र स्थानिकच पकडले आहेत. कर्जदाराची निर्भत्सना आणि अवहेलना करून हे प्रशिक्षित रिकव्हरी एजंट त्यांना निर्घृणपणे ब्लॅकमेल करतात. या छळसत्राला कंटाळलेल्या कर्जदारांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्गच ते ठेवत नाहीत. कर्जदाराने आत्महत्या केल्यानंतरही त्याच्या संपर्कातील व्यक्तींना त्यांचा कर्जाशी संबंध नसतानाही कर्जफेडीसाठी धमकावण्यात येतं. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेल्या या रॅकेटपर्यंत ना स्थानिक पोलिस पोहचू शकत, ना सरकार पातळीवर याची दखल घेतली जाते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक हजाराहून अधिक लोन ॲप्स आहेत. त्यातील सहाशेहून अधिक कंपन्यांची आरबीआयकडे नोंदच नाही. मुंबई पोलिसांनी तीनशेहून अधिक ॲप्स बंद पडण्याची कारवाई केली असली तरी हे प्रकार अद्याप सुरूच आहेत.  अतिशय नियोजनपूर्वक चालणाऱ्या या डिजिटल लोन रॅकेटविरोधात तपास यंत्रणांकडून मोठ्या कारवाईची गरज आहे. त्यासाठी संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू करण्याचाही विचार व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पाहूया अजून किती बळी गेल्यावर सरकारला जाग येते ते!    - ravirawool@gmail.com

टॅग्स :fraudधोकेबाजी