शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

साक्षेपी समीक्षक

By admin | Updated: January 28, 2016 03:29 IST

डॉ. द. भि. कुलकर्णी... मराठी साहित्यातील प्रवृत्ती-प्रवाहांवर सम्यक दृष्टीने लिहिणारे... त्याचवेळी काव्य व ललितलेखनातून संवेदनशीलतेने अभिव्यक्त होणारे असे बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्त्व

- विजय बाविस्करडॉ. द. भि. कुलकर्णी... मराठी साहित्यातील प्रवृत्ती-प्रवाहांवर सम्यक दृष्टीने लिहिणारे... त्याचवेळी काव्य व ललितलेखनातून संवेदनशीलतेने अभिव्यक्त होणारे असे बहुआयामी व्यासंगी व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून हरपले आहे.विद्वत्तेला जेव्हा विनम्रतेची, शुचितेची, व्यापकतेची किनार लाभते तेव्हा ते व्यक्तिमत्त्व सर्वत्र स्पृहणीय होते... डॉ. द. भि. कुलकर्णी यांची लौकिकार्थाने समीक्षक म्हणून ओळख असली तरीही त्यांनी प्रतिभेला अहंकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. मतांचा दुराग्रह न ठेवता ते कायम स्वीकारशील राहिले. मर्मग्राही समीक्षक तर ते होतेच त्याचवेळी साहित्याचा मनसोक्त व निखळ रसास्वाद घेणारे चोखंदळ रसिकपणही त्यांनी संवेदनशीलतेने जपले. त्यांच्या निधनाने एक विद्वान समीक्षक तर हरपला आहेच परंतु उत्तम साहित्यरसिकाला व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. मृदू स्वभाव, सव्यसाची दृष्टी आणि मनाचा मोकळेपणा हा दभिंच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. दभि हे मुळचे विदर्भातील. शैक्षणिक कारकीर्दीतही त्यांनी 'सुवर्णपदका'वर आपले नाव कोरले होते. 'महाकाव्य' या विषयावर त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली. विदर्भ साहित्य संघाची 'साहित्य वाचस्पती' ही डीलीट समकक्ष पदवी संपादन केली. त्यांना रशियन भाषाही अवगत होती. अध्यात्मशास्त्र, सौंदर्यशास्त्र, शरीरशास्त्र व कुणालाही ऐकून आश्चर्य वाटावे पण ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. शिक्षकाचा पिंड असलेल्या दभि सरांनी अध्यापन क्षेत्रात भरीव योगदान दिले. अनेक विद्यार्थीही घडवले. त्यांच्या जडणघडणीचा आलेख जीवनप्रवासात सतत उंचावत राहिला. 'रेक्वियम' हा त्यांचा पहिला कथासंग्रह. मेघ, मोर, मैथिली हे ललित लेखसंग्रह त्यांनी लिहिले. दुसरी परंपरा, महाकाव्य : स्वरुप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, नाट्यवेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, प्रतितीविश्रांती, युगास्त्र, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता हे समीक्षापर लेखन केले. त्यांच्या समीक्षेवर त्यांच्या अध्यापकीय अनुभवाचा ठसा होता. म्हणूनच ती सकस व समृद्ध होती. त्यांची पृथक्करणाची शैली अतुलनीय व विलक्षण होती. काटेकोर, शुद्ध वाङ्मयीन, कलाकृतीनिष्ठ व तरीही सुगम व लालित्यपूर्ण अशा त्यांच्या समीक्षेची दखल साहित्यविश्वाने अल्पावधीतच घेतली. प्राचीन व अर्वाचीन वाङ्मयातील अनेक प्रवृत्ती-प्रवाहांवर त्यांनी व्यासंगपूर्ण पद्धतीने लेखन केले. दभि हे उत्तम कवी होते. दिग्गज मराठी साहित्यिकांनी त्यांच्या मनाची भूमी नांगरलेली होती. नव मराठी साहित्यामध्ये त्यांना गुणात्मक उणेपण जाणवू लागले. तेव्हा त्याची परखड चिकित्सा त्यांच्या साहित्यिक मनाला आवश्यक वाटली. त्यातून त्यांच्यातील समीक्षक बहरत गेला. समीक्षकाची जडणघडण होताना त्यांनी त्यांच्यातील लेखकाला मात्र संपू दिले नाही. काव्य, ललित, कथा, निबंध यातून साहित्यनिर्मिती करीतच राहिले. लेखक, प्राध्यापक आणि समीक्षक या तिहेरी भूमिकेमुळे त्यांचे लेखन टोकाचे व एकांगी झाले नाही. नवनिर्मितीचे बीज म्हणून त्यांनी या समीक्षेकडे पाहिले म्हणूनच त्यांच्यातून साकारला तो उत्तम साक्षेपी समीक्षक. अभिजात रसिकता, सौंदर्यनिष्ठ चिकित्सा, व्यासंगी वृत्ती, नवतेचा स्वीकार अशी गुणवैशिष्ट्यांचे किनार व खोली त्यांच्या लेखनाला लाभली होती. अनेक मानसन्मान व पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा उत्तुंग आलेख मराठी साहित्य विश्वाने अनुभवला आहे. वयाची ८० वर्षे पार केल्यावर दभि शरीराने थकले तरी मनाने त्याच उत्साहात असायचे. पुण्यातील ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नुकत्याच पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनातही ते सहभागी झाले होते. लहान, थोर, विचारवंत साऱ्यांशी ते उत्साहाने, आनंदाने बोलायचे. साहित्याशी संबंधित महत्त्वाच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे. हातचं राखून देणं हा प्रकार त्यांच्या स्वभावात नव्हताच मुळी. त्यांचा संवाद नेहमीच मुक्त होता. कवितेची गेयताही होती. असा हा बहुआयामी प्रतिभावंत आपल्यातून जाण्याची हळहळ व हुरहुर कधीही न संपणारी आहे.