संसद किंवा राज्यांच्या विधिमंडळांच्या चर्चांमधून विनोद आणि उपहास पार हद्दपार झाल्याची खंत केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली असून त्यांच्या या मताशी कोणीही सहमत होईल असे आजचे वास्तव आहे. भारतीय संसदेविषयी बोलताना जेटली यांनी अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते, पिलू मोदी यांसारख्या संसदपटूंचा आवर्जून उल्लेखही केला आहे. ‘स्वतंत्र’ याच नावाच्या पक्षाचे पिलू मोदी हे एकमात्र संसद सदस्य होते आणि कधी नर्म विनोदाचा, तर कधी उपहासाचा आधार घेऊन ते आपला मुद्दा मांडीत असत. ज्या काळात ते खासदार होते त्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि देशातील कोणत्याही वाईट घटनेचे खापर एक तर ‘परकीय हात’ किंवा अमेरिकन गुप्तहेर संस्था ‘सीआयए’ यांच्या डोक्यावर फोडण्याची सरकारी पक्षाची जणू रीतच होऊन बसली होती. अर्थात हा परकीय हात असो की सीआयए, कोणाच्या दृष्टीला पडण्याचे काही कारणच नव्हते. परिणामी एके दिवशी पिलू मोदी चक्क गळ्यात एक पाटी लटकवून संसदेत आले, पाटीवर अक्षरे होती ‘मी सीआयए एजंट आहे’! एका साध्या कृतीमधून व तिला विनोदाची डूब देऊन त्यांनी सरकारला सणसणीत टोला लगावला. विनोदाची किंवा उपहासाची हीच ताकद असते. समोरची व्यक्ती दुखावेल असा मुद्दा मांडायचा झाला तर विनोद किंवा उपहास यापरते अन्य प्रभावी अस्त्र नाही. मुद्दा तर पोचतोच पण समोरचा दुखावलादेखील जात नाही. रामदास स्वामींनी भले ‘टवाळा आवडे विनोद’ असे म्हणून ठेवले असले तरी बऱ्याचदा टवाळकीच कामी येत असते. अन्यथा ‘कोणी मूर्खदेखील शोकांतिका लिहू शकतो, पण विनोदी वा उपहासगर्भ लिहायला खरी बुद्धिमत्ता लागते’, असे म्हटलेच गेले नसते. अर्थात केवळ संसद वा विधिमंडळेच कशाला, एकूण समाज व्यवहारामधूनही विनोद अस्तंगतच होत चाललेला आढळून येतो. आधीच्या पिढीत प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ऐकायला मोठा जनसमुदाय एकत्र येण्यामागील कारणही एकच, लोकांना विनोद-उपहास-चिमटे आवडतात पण व्यवहारात ते अभावानेच आढळून येतात. ब्रिटिश लोक तसे सामान्यत: आपणहून कोणात न मिसळणारे आणि स्वत:च्याच कोशात राहणारे समजले जातात. पण ब्रिटनच्या संसदेमधील विनोद, उपहास आणि परस्परांना काढले गेलेले चिमटे यावर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. सामान्यत: सरकार कुठलेही आणि कोणत्याही देशातले असो, ते विनोद निर्मिती करणारांच्या दृष्टीने उत्तम खाद्य पुरविणारे माध्यम असते. विल रॉजर्स हा अमेरिकेतील दिवंगत विनोदी अभिनेता. त्याचे याच संदर्भातले एक विधान मोठेच मजेशीर. तो म्हणतो, ‘मी कधीही विनोद वगैरे करीत नाही. फक्त सरकारी कारभार पाहतो आणि त्याचे यथार्थ रिपोर्टिंग करतो’!
जेटलींची रास्त खंत
By admin | Updated: October 24, 2016 04:07 IST