पण एक साधं उदाहरण घेऊ. समजा, घरात एक नवा टीव्ही आणायचा आहे. तो कोणता आणावा, किती मोठा आणावा, तो कोणत्या कंपनीचा आणावा याची चर्चा जर घरात सुरू झाली, तर त्यात ब:यापैकी पुढाकार हा बच्चेलोकांचा असतो. कोणी पीसीवर बसेल, तिथे नेटवर जाऊन सध्या बाजारात कोणते टीव्ही आहेत याचा उभा आडवा लेखाजोखा उत्साहाने गोळा करेल. कोणी मोबाइलवर बोटं फिरवेल आणि थ्रीजी वापरून गुगलवर ‘बेस्ट टीव्ही इन इंडिया’ हे चार शब्द टाईप करून माहितीच्या जंजाळातून नेमके मुद्दे हुडकून काढेल. कोणी व्हॉट्सअॅपवर जाऊन आपल्या मित्र-मैत्रिणींकडे कोणते टीव्ही आहेत, कोणी कोणी नवे टीव्ही अलीकडे आणले आहेत, त्यांचे अनुभव कसे आहेत, हे फोनवर काहीही न बोलता फटाफट मेसेजेस पाठवून जाणून घेईल. आता एवढं सगळं केल्यानंतर ‘तुम्हाला काही कळत नाही, काय ठरवायचं, कोणता टीव्ही आणायचा ते मम्मी-डॅडी ठरवतील’ असं कोण म्हणू शकेल? खरंतर या बाबतीत गंगा उलटीच वाहणारी असते. मुलांकडे जेवढी माहिती असते तेवढी पालकांनी जमा केलेली नसते. ‘तुमचं ते व्हॉट्सअॅप आणि ते इंटरनेट एवढं नाही जमत आम्हाला. या पोरांचं चाललेलं असतं 24 तास’ हे किंवा असं काहीतरी वाक्य बोलणारे पालक बहुसंख्येने असतात. अशावेळी कोणता टीव्ही आणायचा याचा निर्णय पालकांपेक्षा बालकच घेणार असतात. ब्रँड, मॉडेल, फीचर्स, डिस्काउंट, कोणत्या दुकानात काय स्किम्स आहेत, कोणत्या दुकानाबद्दल इंटरनेटवर जास्त तक्रारी वगैरे दिसतात याचा अभ्यास करून बच्चेमंडळी टीव्ही खरेदी या विषयात आपला ‘व्हेटो’ वापरून निर्णय घेतात. पैशांची व्यवस्था ऊर्फ पेमेंट करण्याचे कर्तव्य मम्मी-डॅड यांनी केलं की ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट’ म्हणायला मुलं मोकळी असतात.
वर आपण जे टीव्ही खरेदीचं उदाहरण पाहिलं तेच इतर गोष्टींनाही लागू असतं. घराला रंग लावणं असो, नवं घर घेणं असो किंवा प्रवासाला जाणं असो मुलांचा ‘से’ बरेचदा ‘फायनल’ असतो. आता ही परिस्थिती मोठय़ा कंपन्यांनी आणि विक्रेत्यांनी ओळखली नाही तरच नवल. अगदी कालर्पयत मुलांचा विचार करणा:या कंपन्या म्हणजे चॉकलेट-गोळ्यांचे उत्पादक किंवा खेळण्यांचे निर्माते. पण आता तसं राहिलेलं नाही. बच्चेलोक घरचे निर्णय फिरवतात, हे लक्षात आल्याने घरकर्जाची जाहिरात करणारी एखादी बँकसुद्धा आपल्या जाहिरातीत अमुकतमुक कमी व्याजदराचा उल्लेख करीत आईबाबांबरोबर बच्चेकंपनीचाही खुललेला चेहरा ठळकपणो दाखवत असतात. सर्वाना परवडणारा मोबाइल फोन आणि त्यातही स्मार्ट फोन ही तर अगदी आजकालची ‘डेव्हलपमेंट’. पण ही दररोज वेगाने बदलती परिस्थिती आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांना पुरं पडण्यात यशस्वी होणारी कंपनी एकच, ती म्हणजे बच्चेकंपनी.
तंत्रज्ञानामुळे अगदी कोवळ्या वयातली मुलंही आता अकाली खूप ज्ञानी झालेली दिसतात. खूप माहिती गोळा केलेली मुलं त्या माहितीचा आचरणासाठी उपयोग करतात का, हा मुद्दाही जगभर चर्चेला आला आहे. शरीराला पोषक अशी कोणकोणती जीवनसत्त्वे, खनिजे व अन्य घटक आहेत याची माहिती मुलांना इंटरनेटवरही भरपूर मिळते. पण त्याचा परिणाम होऊन त्यांनी फास्ट फूड कमी केले आहे, असे दिसत नाही. याचे कारण मुलांवर त्यांच्या वाढत्या ज्ञानापेक्षा अधिक परिणाम होतो तो जाहिरातीच्या भडिमाराचा. त्यातूनच मग ‘कळते पण वळत नाही’ अशा स्थितीत मुले पोहोचताना दिसतात. असं झालं की मुलांचे पालक चिंतीत होऊ लागतात. चॉकलेट खाऊन दात किडतात, ते दातांना कसं हानिकारक आहे याची माहिती इंटरनेटवर कितीही मिळाली तरी मुलांच्या वाढदिवसाला चॉकलेटची घाऊक देवाणघेवाण ही अर्निबध चालूच असते. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातल्या बालक-पालक संबंधांची गोष्ट ही आज अशी ‘कळते पण वळत नाही’च्या वळणाने पुढे चालली आहे.
(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत़)
याच नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवडय़ात वॉलमार्ट कंपनीने 18 महिने ते 12 वर्षे वयोगटातल्या मुलांचे एक अनोखे संमेलनच भरवले होते. त्यात मुलांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या संमेलनाची कल्पना अनोखी आणि बच्चेकंपनीला आवडणारी अशीच होती.
वॉलमार्ट ही कंपनी जगातल्या किती तरी लहान देशांपेक्षा मोठी अर्थव्यवस्था असणारी कंपनी आहे, हे एव्हाना सगळ्यांना माहीतच आहे. वॉलमार्टने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली खेळणी एका भल्या मोठय़ा प्रांगणात बच्चेकंपनीला हाताळायला खुली केली होती.
मुले कोणती खेळणी अधिक पसंत करतात, याचा अभ्यास वॉलमार्ट या संमेलनाच्या माध्यमातून करीत असते. अशा संमेलनाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. संमेलनानंतर ‘चोझन बाय किड्स, टॉप टॉय लिस्ट वॉलमार्ट’तर्फे जाहीर करण्यात येते. खेळणी बनवणा:या मोठय़ा कंपन्या वॉलमार्टच्या यादीत आपल्या उत्पादनाचं नाव यावं यासाठी प्रय}ांची पराकाष्ठा करीत असतात.
-माधव शिरवळकर