जे पदरात पडलं ते आपल्या योग्यतेच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक आपल्याला मिळायला हवं होतं पण ते मिळालं नाही म्हणण्यापेक्षा मुद्दामहून ते मिळू दिलं नाही, असा विचार करणे हा मनुष्यस्वभावच झाला. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक सईद किरमाणी याच्याही मनात तशी भावना उत्पन्न होण्यात अनैसर्गिक असे काहीही नाही. पण त्याला कर्नल सी.के.नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने त्याच्या मनातील साचलेल्या कडवटपणाला जी वाट मोकळी करुन दिली तिच्यामागे वेदनेपेक्षा असूयेची भावना अधिक तीव्र स्वरुपात जाणवून येते. विशेषत: त्याने याचवेळी आपल्या आगामी आत्मकथनाची जाहिरात करताना हे आत्मकथन त्याच्या शीर्षकापासून अत्यंत स्फोटक आणि खळबळजनक असेल असे जे सांगून टाकले त्यावरुन त्याचा हेतू त्याच्या झालेल्या कथित उपेक्षेचे गाऱ्हाणे मांडण्याऐवजी इतरांना उघडे पाडण्याचा असावा असा वास येतो. ज्या काळात आजच्याइतके भरमसाठ क्रिकेट खेळले जात नव्हते आणि फारुख इंजिनिअर भारताच्या संघाचा यष्टीरक्षक होता, त्याच काळात किरमाणीला संघात प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश मिळाला. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत तो ८८ कसोटी तर ४९ एक दिवसीय सामने खेळला. परंतु त्यानंतर म्हणजे त्याच्या निवृत्तीच्या काळात त्याला ना निवड समितीत घेतले गेले ना त्याच्या नावाचा प्रशिक्षक म्हणून विचार केला गेला. ‘माझ्या बरोबर आणि नंतर क्रिकेट खेळू लागलेले निवड समितीमध्ये गेले’ हे त्याचे गाऱ्हाणेवजा दु:ख दिलीप वेंगसरकर वा संदीप पाटील यांना उद्देशून असू शकते. एक तितकेच खरे की आजच्या काळात कोणतेही पद, पुरस्कार किंवा मान केवळ गुणवत्तेच्या जोरावर व तेदेखील घरचालत मिळत नसतो. निर्णयकर्त्यांकडे त्यासाठी ऊठबैस असावी लागते. किरमाणीला ते जमले नाही असे दिसते. पण ते केवळ त्याला एकट्यालाच जमले नाही असे नाही. तसे अनेक आहेत. आपल्या कामगिरीची उचित दखल घेतली नाही असेही त्याचे दु:ख आहे व तेही पुन्हा त्याचे एकट्याचे नाही. ज्या संघाकडून किरमाणी भारतीय संघात आला त्याच कर्नाटक संघातील गुंडाप्पा विश्वनाथच्या कामगिरीस सुनील गावस्कर तर राहुल द्रवीडच्या कारकिर्दीस सचिन तेंडूलकरच्या कामगिरीने झाकोळून टाकले होते. तो काळाचा परिणाम असतो. ‘आयपीएल’मध्ये गोऱ्या खेळाडूंचाच एवढा बोलबाला का हा त्याचा सवाल मात्र अत्यंत बाळबोध आहे कारण आयपीएल हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसायात कोणी सहसा जोखीम उचलत नसतो. तसेही किरमाणीेने आपल्या आगामी आत्मचरित्राची जाहिरात करुन व्यवसायाचे गणित साधण्याचाच तर प्रयत्न केला आहे.
उपेक्षित किरमाणी
By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST