शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

टक्कल असेल तर न्यूनगंड कसला? - ते वैभव समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 08:06 IST

पुरुषांच्या टकलाचा विषय सध्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, कारण प्रिन्स हॅरीने ‘स्पेअर’ या पुस्तकात प्रिन्स विल्यमच्या टकलावर केलेली टिप्पणी!

-श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

अवतीभोवतीचे वातावरण, टीव्ही आणि इंटरनेटवरील जाहिराती यामुळे आपल्या सौंदर्याच्या व्याख्या किती बदलल्या पाहा - स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल नेहमीच बोलले जाते; पण पुरुषांबद्दलही कधी तरी चर्चा करायला हवीच. डोक्यावरचे केस हा अलीकडच्या काळातील पुरुषी सौंदर्याचा महत्त्वाचा निकष बनला आहे. डोक्यावर घनदाट केस असलेला पुरुष आकर्षक, यशस्वी अन् आनंदी असतो, अशा जाहिरातींचा इतका मारा झाला की विशाल भालप्रदेश, त्यामागे चंद्रासारखे टक्कल हे कधीकाळचे विद्वत्तेचे चिन्ह आता बहुतेकांना नको नकोसे वाटते. डोक्यावर काळेभोर दाट केस असावेत, अशी अगदी चाळिशी, पन्नाशी ओलांडलेल्यांचीही इच्छा असते. ही इच्छा बाजारपेठेने बरोबर हेरली. केस कसे जपायचे हे सांगणाऱ्या जाहिराती आल्या. ती उत्पादने घराघरात पोहोचली. ती वापरूनही ज्यांचे केस जायचे थांबले नाहीत त्यांच्यासाठी जागोजागी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केशरोपणाचे दवाखाने उघडले गेले. त्यासाठी भरमसाठ खर्च होऊ लागला. 

यावर आता चर्चेचे कारण आहे, इंग्लंडच्या राजघराण्यातल्या दोन राजपुत्रांमधील भाऊबंदकीचा मामला. मेघन मर्केलसोबत लग्न केल्यापासून राजघराण्याचा रोष ओढवून घेतलेला राजपुत्र हॅरी आता विंडसर पॅलेस सोडून दूर अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहतो. तिथेच त्याने ‘स्पेअर’ हे आठवणींचे पुस्तक लिहिले. त्यात त्याने बंधू राजपुत्र विल्यमच्या टक्कलावर टिप्पणी केली. विल्यमचे टक्कल हॅरीला काळजीचे वाटले. विल्यम आई डायनासारखा दिसत नाही असेही हॅरीने म्हटले आणि जगभर त्यावर चर्चा होऊ लागली. मुळात टक्कल हा पुरुषांच्या जगण्याचा, क्षमतांचा, सौंदर्याचा किंवा प्रतिष्ठेचाही विषय होऊ शकत नाही, हा या चर्चेचा मुख्य धागा आहे. ‘स्पेअर’चा परिणाम म्हणा की अन्य काही; पण हॅरी-मेघन दाम्पत्याकडून आता विंडसर कॅसलशेजारचे फ्रॉगमोर कॉटेज हे निवासस्थान काढून घेण्यात आले आहे. 

निम्म्याहून अधिक पुरुषांना प्रौढावस्थेत टक्कल पडतेच पडते. त्याबद्दल कसलाही न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. उलट जरा इतिहासात डोकावून पाहिले तर त्याचा अभिमानच वाटेल. हा इतिहास प्रामुख्याने चित्रकलेचा आहे. समर मुस्तफा कमाल या मानववंश शास्त्रज्ञाने २०१९ मध्ये इजिप्तच्या एका थडग्यात इसवी सनापूर्वी ५२५ सालचे, १२२ जणांच्या समूहाचे एक प्राचीन चित्र शोधून काढले. त्या बहुतेक सगळ्यांना टक्कल होते आणि शेतकरी, मच्छीमार, शिल्पकार, लेखक अशा सगळ्या व्यवसायांमधील लोक त्या समूहात होते. अशी थडगी किंवा इजिप्शियन पिरॅमिडमध्ये ममीच्या रूपात हजारो वर्षे मृतदेह जतन करण्यात आले आहेत, त्या ममीफिकेशनच्या प्रक्रियेतही डोक्यावरच्या टकलाची रेषा गृहीत धरली जात होती, असे उघडकीस आले. टक्कल या विषयाच्या अनुषंगाने याच्या जोडीला त्यानंतरच्या कालखंडातील काही चित्रांचाही हवाला दिला जातो. विन्सेंट वॅन गॉघने १८९० साली चितारलेली ‘ऑन द थ्रेशोल्ड ऑफ इटरनिटी’ ही अँड्रियानस झायडरलँड या सेवानिवृत्ताची चित्रकृती, डच सुवर्णकाळातील चित्रकार फ्रान्स वॅन मिआरिस याचे १७९३ मधील ‘यंगर मॅन विथ अ टंकार्ड’, इटालियन रेनेसां काळातील पावलो व्हेरोनीज याचे ‘द इटर्नल फादर’ अशा प्रसिद्ध चित्रकृतींमध्ये टक्कल हा केंद्रबिंदू आहे. टक्कल हा केवळ सामान्यांच्या भावविश्वाचा भाग आहे असे नाही. तथागत गौतम बुद्ध, ख्रिश्चन संत जेरोम व ऑगस्टीन, जपानी संस्कृतीमधील फुकुरोकुजू व होटेई या देवांच्या छबीही घनदाट काळेभोर केसांच्या नाहीत. 

ही झाली कालची गोष्ट. आज चित्र अगदीच वेगळेच आहे. सिनेमाच्या ज्या अभिनेत्यांकडे समाज हीरो म्हणून पाहतो, त्यांच्यातही बदल झाले. हॉलिवूडमधील जेसन स्टॅथम, विन डीजल किंवा ब्रूस विलीस आणि आपल्या हिंदी सिनेमातील अनुपम खेरसारख्या मोजक्या अभिनेत्यांचे टक्कल हाच त्यांचा यूएसपी असतो. अमेरिकेतील एका अभ्यासात आढळले, की २००६ साली प्रमुख टीव्ही शोमधील केवळ तीन टक्के कलाकारांना टक्कल होते. २०११ व १२ मधील प्रमुख मासिकांमध्ये प्रकाशित अवघे ८ टक्के मॉडेलच्या डोक्यावर केस नव्हते. तेव्हा बदलत्या जीवनशैलीने पदरात टाकलेला ताणतणाव, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, प्रदूषण अशांमुळे डोक्यावरचे छप्पर विरळ होत असेल, ते उडून जात असेल तरी त्याचा ताण घेण्याची अजिबात गरज नाही.    - srimant.mane@lokmat.com

टॅग्स :Englandइंग्लंड