शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
10
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
11
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
13
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
14
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
15
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
16
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
17
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
18
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
19
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
20
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार

रसेल आज असते तर...

By admin | Updated: February 6, 2017 23:53 IST

बर्ट्रांड रसेल या ब्रिटिश तत्त्वज्ञाने ‘अमेरिकेच्या अध्यक्षपदावर चांगली माणसे का येत नाहीत’ याच नावाचे एक पुस्तक जॉन एफ केनेडी यांच्या हत्त्येनंतर लिहिले.

बर्ट्रांड रसेल या ब्रिटिश तत्त्वज्ञाने ‘अमेरिकेच्या अध्यक्षपदावर चांगली माणसे का येत नाहीत’ याच नावाचे एक पुस्तक जॉन एफ केनेडी यांच्या हत्त्येनंतर लिहिले. त्यांच्या मते त्या पदावर तोपर्यंत आलेल्या अध्यक्षांपैकी जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, जेम्स मऱ्रो, अब्राहम लिंकन आणि फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे पहिल्या दर्जाचे तर जेम्स मॅडिसन, अ‍ॅन्ड्र्यू जॅक्सन यांच्यापासून थेट ट्रूमनपर्यंतचे अध्यक्ष दुसऱ्या दर्जाचे होते.

उरलेल्यांची गणना त्यांनी तिसऱ्या दर्जाच्या अध्यक्षात केली. रसेल आज असते तर त्यांनी केनेडींपाठोपाठ रोनाल्ड रिगन, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांना वरचा दर्जा दिला असता आणि आताचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दर्जाबिर्जा काही न देता थेट नापासातच काढले असते. २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून ट्रम्प यांची जनतेतील मान्यता ४७ टक्क्यांएवढी कमी झाली तर ते नको म्हणणाऱ्यांची संख्या ५३ टक्क्यांपर्यंत गेली.

मुळात अमेरिकेतील निवडणूक पद्धतीत असलेल्या सांघिक व्यवस्थेमुळे जनतेची ६० लाख मते कमी मिळूनही ट्रम्प हे अध्यक्षपदावर निवडून आले. निवडीनंतरची त्यांची उद्दाम भाषणे अमेरिकेतील जनतेएवढीच त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनाही आवडली नाही. निवडणुकीपूर्वीही त्यांच्या उमेदवारीने रिपब्लिकन पक्षात फूट पाडलीच होती. आताही सिनेटर मॅकेनसारखे एकेकाळी अध्यक्षपदाची निवडणूक लढविलेले त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करीतच राहिले आहेत.

मेक्सिकोच्या सीमेवर भिंत, जगभरच्या मुस्लीम नागरिकांना अमेरिकाबंदी, अमेरिकेतील विदेशी लोकांना बाहेर घालवण्याच्या धमक्या आणि स्त्रीवर्गाविषयीचे अपमानास्पद बोलणे या साऱ्यांमुळे ट्रम्प यांनी आपल्या लोकप्रियतेएवढीच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठाही कमी केली आहे. अध्यक्षपदावर येताच त्यांनी गरीब व मध्यमवर्गांसाठी ओबामांनी सुरू केलेली आरोग्य सहाय्यता योजना मोडीत काढली.

त्यानंतर लागलीच सात मुस्लीम देशांतील लोकांच्या अमेरिकाप्रवेशावर निर्बंध घालणारा अध्यक्षीय आदेश जारी केला. परिणामी त्या देशात जायला विमानात बसलेल्या अनेक स्त्री-पुरुषांना त्यातून उतरविले गेले. अमेरिकेच्या ज्या नागरिकांनी विदेशी मुस्लीम स्त्रियांशी विवाह केले त्यांच्या स्त्रियांनाही त्यांच्या माहेरून अमेरिकेत परत जाणे त्यामुळे शक्य झाले नाही. हा आदेश माणुसकीविरुद्ध व आंतरराष्ट्रीय कायद्याविरुद्ध जाणारा आहे असे संयुक्त राष्ट्र संघटनेने बजावल्यानंतरही ट्रम्प यांनी त्याविषयीचा आपला हेका चालूच ठेवला.

त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने साठ हजार विदेशी लोकांचे अमेरिकेत प्रवेश करण्याचे परवाने (व्हिसा) रद्दही करून टाकले. आता अमेरिकेच्या सिएटल येथील सांघिक न्यायालयानेच ट्रम्प यांच्या या आदेशावर स्थगितीचा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी थांबविली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने वाटेत अडलेल्या नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. मात्र न्यायालयाचा हा स्थगिती आदेश चुकीचा असल्याची व तो सरकारच्या अधिकारावर आक्रमण करणारा असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.

या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपण तो लवकरच रद्द करून घेऊ, असेही ते म्हणाले आहेत. मुळातच घमेंडी असलेल्या एखाद्या इसमाच्या डोक्यात सत्ता कशी व केवढी चढते याचा अनुभव आज आपणही भारतात घेत आहोत. ध्यानीमनी नसताना पाकिस्तानी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या व त्यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या आपल्या सरकारने अशाच एका रात्री देशातील सामान्य माणसांच्या खिशावर व मिळकतीवर नोटाबंदीचा स्ट्राइक करून त्यांना अक्षरश: ‘कॅशलेस’ बनविले. ट्रम्पही याच प्रकाराची मोठी व विक्राळ आवृत्ती आहे. त्यांच्यामुळे अमेरिकेचे जगातील मित्र देश जसे धास्तावले आहेत तसे हा गडी यापुढे आपल्यासमोर आणखी कोणते प्रश्न उभे करील या भयाने अमेरिकेतील लोकही अस्वस्थ झाले आहेत. विदेशी मित्रांसह स्वदेशातील जनतेला भयभीत व अस्थिर करणारा इसम ट्रम्प यांच्या आधी अमेरिकेच्या अध्यक्षपदावर कधी आला नाही.

नेतृत्वाविषयी जनतेत विश्वास असावा लागतो आणि ते आपल्याला योग्य दिशेने योग्य ठिकाणी नेईल याविषयी तिने आश्वस्त रहायचे असते. ट्रम्प हे साऱ्यांनाच अस्वस्थ करणारे व आपल्या भयचकित करण्याच्या वृत्तीपायी जगाचे राजकारण अस्थिर करणारे नेते ठरतील अशी भीती आता साऱ्यांना वाटू लागली आहे. लोकशाहीतील मतदार नेहमीच फार चांगलीच माणसे निवडून देतात असे नाही. जर्मन नागरिकांनी एकेकाळी हिटलरला असेच निवडले होते. त्यामुळे यापुढे मतदारांना केवळ साक्षर आणि सुशिक्षित असून चालणार नाही.

त्यांना उमेदवाराची जाण व स्वभाव यांची पूर्वकल्पना असणेही आता गरजेचे झाले आहे. आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलेला फोन आपटून बंद करण्याची ट्रम्प यांची कृती व सगळी माध्यमे अप्रामाणिक असल्याचा त्यांचा अभिप्रायही असाच वादग्रस्त झाला. अल्पसंख्य, कृष्णवर्णीय, स्त्रिया आणि अमेरिकेत व्यवसाय वा शिक्षणासाठी आलेले सारेच या इसमाच्या वागणुकीने भयचकित आहेत. बर्ट्रांड रसेल आज असते तर त्यांनी ट्रम्प यांची जाहीर कानउघाडणीच केली असती.