एखाद्या रस्त्यानेच एखाद्या गावातील प्रत्येक महिलेला विधवा बनविल्याचे आणि आता त्या गावात एकही पुरुष शिल्लक नसल्याचे कुणी सांगितले, तर विश्वास बसेल? दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे आणि तीदेखील आपल्याच देशातील! आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जातो. या महामार्गावर पेद्दाकुंता नावाचे गाव आहे. दुर्दैवाने आज तोच महामार्ग पेद्दाकुंतासाठी दु:स्वप्न ठरला आहे! अवघ्या ४० घरांची वस्ती असलेल्या पेद्दाकुंतामधील प्रत्येक वयस्कर पुरुषाचा या महामार्गावरील अपघातांनी बळी घेतला आहे. त्यामुळे आता या गावात आहेत त्या केवळ १८ ते ३६ वर्षे वयाच्या विधवा आणि त्यांची चिल्लीपिल्ली! गावातील सर्वात वयस्कर पुरुष आहे अवघा सहा वर्षे वयाचा एक मुलगा! त्याहूनही भयंकर बाब म्हणजे गावात एकही पुरुष शिल्लक नसल्याचे बघून, शेजारच्या गावांमधील लिंगपिसाटांची गिधाडी दृष्टी पेद्दाकुंताकडे वळली आहे. हे भयावह चित्र म्हणजे तथाकथित विकासाच्या वृक्षाला लागलेले विषारी फळ असल्याच्या प्रतिक्रिया उमटू शकतात; पण देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्यासाठी विकास प्रकल्पांना पर्यायच नाही. त्यामुळे पेद्दाकुंतासारख्या दु:स्वप्नांची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर विकास प्रकल्प राबविताना सर्व शक्यता विचारात घेऊन काटेकोर नियोजन करावे लागेल आणि अंमलबजावणी करताना नियोजनाला फाटा देण्याची आपली उपजत प्रवृत्तीही बदलावी लागेल. गत काही वर्षांपासून देशात चार, सहा किंवा आठ पदरी महामार्ग बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील मापदंड लावल्यास, या प्रकल्पांच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. पेद्दाकुंता गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्यायच नाही. देशाला वेगाने प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर वाहतुकीचा वेग वाढविण्याशिवाय पर्याय नाही; मात्र ते करीत असताना वर्षानुवर्षे संथ आयुष्य जगत आलेल्यांना दुर्लक्षून वा वगळून चालणार नाही, तर त्यांनाही वेगवान जीवनाचे सहप्रवासी बनवावेच लागणार आहे. त्याचबरोबर शहरी सुखसुविधांचा उपभोग घेण्यासाठी, त्यासोबत अपरिहार्यपणे येणाऱ्या वेगवान जीवनाचे नियम समजून घेण्याची आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी, ग्रामीण भागातील जनतेलाही ठेवावी लागणार आहे. हे जर आपल्याला उमजले नाही, तर भविष्याच्या उदरात असे अनेक पेद्दाकुंता आपली प्रतीक्षा करीत असतील!
महामार्गाचे नष्टचक्र
By admin | Updated: September 25, 2015 22:25 IST