शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
4
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
6
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
7
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
8
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
9
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
11
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
12
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
13
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
14
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
15
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
16
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
17
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
18
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
20
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस

अतिशहाणा त्याचा...

By admin | Updated: June 28, 2017 00:19 IST

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू या पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे ठरवून सगळ्या विरोधी

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू या पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे ठरवून सगळ्या विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. आपण आपल्या विवेकबुद्धीनुसार हा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे समर्थन त्यांच्या पक्षाचे पूर्वाध्यक्ष शरद यादव यांच्यासह लालूप्रसाद यादव या त्यांच्या सरकारात सामील झालेल्या राजद या पक्षाच्या नेत्यालाही मान्य झाले नाही. नितीशकुमारांनी असा निर्णय घेण्यात घाई व चूक केली आणि तो निर्णय त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात न घेताच केला अशी टीका त्यांच्यावर लालूंनी केली तर शरद यादव हे त्यांचे पक्षातले दुबळे अस्तित्व लक्षात घेऊन गप्प राहिले आहेत एवढेच. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीशकुमारांनी लालूंच्या मदतीने भाजपचा प्रचंड पराभव केला व त्या सभागृहातील तीन चतुर्थांशाएवढ्या जागा जिंकल्या. त्यांच्या युतीतील लालूंच्या पक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या असल्या तरी नितीशकुमारांचे नाव पुढे करून लालूंनी त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्याचा संयम दाखविला. त्या निवडणूक विजयामुळे नितीशकुमारांचे नाव राष्ट्रीय स्तरावर मोदींचा पर्याय म्हणून घेतले जाऊ लागले. सगळे डावे व अनेक राजकीय पक्ष त्यांच्यात देशाचा उद्याचा नेता पाहू लागले. नितीशकुमारांची प्रतिमा स्वच्छ व बुद्धिमान नेत्याची असल्याचे आणि ते साऱ्यांना चालू शकणारे नेते असल्याचे तेव्हा बोलले गेले. त्यांच्या सरकारात तिसऱ्या क्रमांकाच्या जागा घेऊन काँग्रेस पक्षही सहभागी झाला त्यामुळे भाजपेतर सर्वपक्षीय सरकारचे स्वरूपही त्याला प्राप्त झाले. आताच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तेव्हा मात्र नितीशकुमारांनी त्यांच्यासोबत न जाता भाजप व मोदींसोबत राहण्याचे ठरवून साऱ्या राजकारणालाच एक चकवा दिला आहे. आपण याआधीही असे निर्णय स्वमतानुसार घेतले आहेत हे त्यांचे म्हणणे खरे असले तरी रूढ राजकारणाला ते मानवणारे नाही. भाजपच्या नेतृत्वातील रालोआमध्ये असताना नितीशकुमारांनी काँग्रेसचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुकर्जी यांना जाहीर पाठिंबा दिला होता हे खरे आहे. मात्र नितीशकुमारांची प्रतिमा समाजवादी व सेक्युलर नेत्याची आहे. ते लोहियांचे शिष्य आहेत. सातत्याने दलित, महादलित अशी भाषा बोलणारे आहेत. शिवाय भाजपच्या भगव्या राजकारणाला त्यांचा असलेला विरोधही उघड आहे. त्या पक्षासोबत त्यांनी काही काळ बिहारात राज्य केले मात्र ज्या क्षणी त्यांच्यात वैचारिक मतभेद उद््भवले त्याक्षणी त्यांनी भाजपला सरकारबाहेरही काढले. त्यांच्या स्वयंभूपणाबद्दलचे असे अनेक पुरावे येथे सांगता येतील. पण देशात सामूहिक राजकारणाची गरज निर्माण झाली असताना त्यांचे हे स्वयंमन्यपण एकांगी व त्यांना एकटे टाकणारे ठरू शकणार आहे. भाजपला त्यांची गरज नाही. त्याने त्यांची मदत मागितलीही नाही. त्यांचे आपल्याशी जुळणारे नाही हे भाजपला कळणारेही आहे. अशावेळी त्यांच्या मिळणाऱ्या आगंतुक पाठिंब्याने भाजप आनंदी होणार आहे. मात्र त्याचवेळी सर्व विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार ही त्यांच्या वाट्याला परवापर्यंत येत राहिलेली भूमिका त्यांच्या या निर्णयाने उध्वस्त व मातीमोलही केली आहे. यापुढे त्यांना काँग्रेसपासून लालूंपर्यंत आणि पवारांपासून डाव्या पक्षांपर्यंत कोणाचाही विश्वास मिळवता येणे अशक्य आहे. प्रत्यक्ष बिहारमध्येही त्यांच्या पक्षाला बहुमत नाही. लालूंच्या मदतीवर ते चालत आहे. उद्या लालूंनी पाठिंबा काढला तर भाजप त्यांना साथ देईलही. पण अशी साथ किमतीवाचून दिली जात नाही. यासंदर्भात नितीशकुमारांचे शहाणपण हे अमित शाह यांच्या चतूरपणापुढे फारसे टिकणारेही नाही. लालू सोबत नाहीत, आजवरचे सोबती गमावले आहेत आणि ज्या भाजपची आस त्यांना वाटते तो पक्ष त्यांच्यावाचूनही पुढे जाणारा आहे. हातची गाडी सोडली आणि येणाऱ्या गाडीचा भरवसा उरला नाही अशा अवस्थेत असलेल्या प्रवाशासारखे ही स्थिती आहे. नितीशकुमारांच्या अंगी बऱ्याच कळा आहेत. आपले असे एकटेपण ते निव्वळ मुजोरीच्या भरवशावर इतरांना दिसू देणार नाहीत. मात्र आपल्या पायाखालचे राष्ट्रीय पाठबळ आपण गमावले आहे आणि बिहारातली निम्मी सत्ताही घालविली आहे एवढे त्यांना नक्कीच समजणारे आहे. मोदी वा भाजप त्यांना कधी महत्त्व आणि भाव देणार नाहीत. संघाच्या तालमीत तयार झालेल्या माणसांखेरीज त्यांना इतर माणसे फारशी चालतही नाहीत. त्यातून नितीशकुमारांसारखा साऱ्यांनाच बेभरवशाचा वाटणारा माणूस त्यांच्या विचारांचा भागही होणार नाही. महादलित व दलित अशी भाषा बोलणाऱ्या या नेत्याने बिहारची दलितकन्या असलेल्या मीराकुमारांना विरोध करून आपल्या पाठिंब्याचे एक मोठे क्षेत्रही आता गमावले आहे. मराठीत ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी एक म्हण आहे. तिचा अर्थ समजावून सांगेल अशी नितीशकुमारांची आताची एकाकी अवस्था आहे. लोकशाही हे बहुजनांच्या संमतीने व पाठिंब्याने करावयाचे राजकारण आहे. तो एकट्याने वाहून नेण्याचा वसा नाही. नेता कितीही बुद्धिमान असला आणि त्याच्यासोबत कुणी नसले तर त्याला त्याचा मतदारसंघही विचारत नाही हे लोकशाहीतले एक वास्तव आहे.