शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘भयंकरा’ला कॅनव्हासवर उतरवण्याची तडफड; अस्वस्थ काळाचे वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:35 IST

दु:खद, त्रासदायक अनुभवांना चितारणं नेहमीच गुंतागुंतीचं असतं. कुठल्याही कलावंतापुढे हा प्रश्‍न नेहमीच फणा काढून उभा असतो.

- सुधीर पटवर्धन

‘माणसांचा चित्रकार नसतो तर चित्रकार असण्याचं समर्थन करू शकलो नसतो,’ असं म्हणता तुम्ही. या अस्वस्थ काळाकडे कसं बघता?२०१९ हे पूर्ण वर्ष नि २०२० चे पहिले दोन महिने माझ्यासाठी खूप धावपळीचे होते. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ला रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन भरलं होतं. फेब्रुवारीत ते संपलं नि लोकांकडून प्रदर्शनासाठी घेतलेली चित्रं परत करण्याच्या व्यवस्थेत गुंतलो. दरम्यान, ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला. इतक्या दमणुकीमुळं घरी थांबणं बरंच वाटलं. पण, बाहेरचा अनुभव कालांतराने बदलू लागला. रिकामे रस्ते, शुकशुकाट, कधीही न अनुभवलेलं एखाद्या फिल्ममध्ये शोभावं असं वातावरण. सुरुवातीला तितकं गांभीर्य जाणवत नव्हतं. मात्र, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून स्थलांतरित कामगारांचे जे हाल समोर आले त्याने हलून गेलो.

काहीतरी प्रतिसाद द्यावा असं वाटू लागलं. अशा प्रतिसादात भीतीही असते की व्यथा चित्रात आणायची तर ते ‘अस्थेटीसाईज’ करण्याकडे जातं.. म्हणजे नकळत होणारं सौंदर्यीकरण! अकारण सुंदर शब्दाला कितीही छटा असल्या तरी माणसांच्या परवडीबद्दल, त्यांनी अनुभवलेल्या भयंकराबद्दल ‘सुंदर’ चित्र होणार! त्या सुंदरात नेहमी नेत्रसुखदता असेल असं नाही; पण ते चांगलं होण्यात कलावंताचा आनंद दडलेला असतो. चित्रकार किंवा कुठल्याही कलावंतापुढे हा प्रश्‍न नेहमीच फणा काढून उभा असतो.

जे अनुभव चांगले असतात ते ठीक; पण दु:खद, त्रासदायक अनुभवांना चितारणं, - तेही कला म्हणून, केवळ उद्रेक या अर्थाने नव्हे! ही दुविधा या अस्वस्थ काळात प्रकर्षाने जाणवू लागली. तरी या काळात शहरांनी फेकून दिलेल्या स्थलांतरितांची चित्रं मी पहिल्या चार महिन्यांत केली. माझ्या चित्रात प्रामुख्यानं रस्त्यावर चालणारी, हिंडताना पाहिलेली माणसं असतात. आता बाहेर जाणं खुंटलेलं व सगळे चेहरे मास्कमध्ये. अशात दुसरा टप्पा असा झाला की मी आपोआप आत वळलो. बायको व मी दोघेच घरात. शहरात फिरताना बरंच काही दिसण्याचा, संवाद-विसंवादाचा सगळा अनुभव तुटून गेला होता. अशी स्टेज आपल्या आयुष्यात आजवर केव्हा-केव्हा आली? मनाच्या तळात गेलेले असे अनुभव वर येऊ लागले.

आजारपण, प्रवास, लादलेल्या किंवा स्वीकारलेल्या एकांताचे. काश्मीरवर एकांत लादण्याला वर्ष होऊन गेलं होतं. ती जनता वर्षभर फोन, इंटरनेटपासूनही तोडली गेलीय. वेगवेगळ्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी माणसं असला ‘एकटेपणा’ साहत आहेत त्यांचा विचार मनात येऊ लागला. आपण लॉकडाऊनच्या अनुभवातून त्यांचं सोसणं कसं अनुभवू शकतो या विचारानं चित्रं उमटू लागली. आता या व्हायरसपासून लवकर सुटका नाही. नव्या स्थितीसोबत जीवनशैली जुळती घेत जगावं लागणार आहे, मात्र गरीब वर्गाला याची झळ जास्त बसली व बसणार आहे. त्यातलंही काही उमटेल कदाचित.

जगभरात ‘कोविडकाळा’बद्दल कलेच्या माध्यमातून बोललं जातं आहे? कलेच्या माध्यमातून माणूस किंवा नागरिक म्हणून ज्या प्रतिक्रिया दिसल्या ती ‘नोंद’ आहे केवळ, असं मला वाटतं. कला म्हणून ती अभिव्यक्ती तितकी खोल आहे असं माझ्या पाहण्यात आज तरी आलेलं नाही. एकंदर समाजात जे चालू आहे त्यावर अर्थपूर्ण भाष्य करायचं तर ते संबंधित कलाकाराच्या खाजगी अनुभवातून उतरलेलं असावं लागतं. तरच त्याला सच्चेपणा येऊ शकतो. आपला अनुभव तसा मर्यादित असतो त्यामुळे पाचेक वर्षे गेली, अनुभव मुरला की ते दिसेल.‘मानवतेची दृष्टी शाबूत ठेवून व्यक्तिवादी होणं कसं टाळता येईल हे मी शोधू लागलो...’ असं तुम्ही म्हणता, म्हणजे काय?

साधारण सत्तरच्या दशकात व ऐंशीच्या सुरुवातीला मी कामगार वर्गाचा प्रवक्ता आहे असं मानून चित्रं करत होतो. ती माझी राजकीय  भूमिका होती. या लोकांबद्दल, याच लोकांशी आपल्याला बोलायचंय हे मला पटत होतं.  आधुनिक कलेमध्ये कलाकाराला काय वाटतं, त्याची भूमिका काय हे सांगण्याचा प्रवाह आहे. मी वेगळा विचार करत होतो. मी त्यांच्या वर्गातला नसलो तरी मला त्यांच्याशी, त्यांच्या जीवनाशी संवाद करायचा होता. ज्या माणसांची चित्रं मी काढतो त्यांना ती स्वत:ची वाटण्यासाठी काय व्हायला पाहिजे? त्या अर्थाने कलावंताने स्वत:च्या चाकोरीतून बाहेर पडून, दुसऱ्या विषयाशी, दुसऱ्या वर्गाशी स्वत:ला जोडत नेलं पाहिजे. व्यक्तीवादी विधानं कितीही प्रबळ असली तरी वस्तुस्थिती नि तिच्या सत्याशी अशा चित्रांना नातं सांगता येतंच असं नाही. हा तिढा सोडवून मला माणूस म्हणून आतपर्यंत जायची धडपड करायची होती. आपल्याला जो शोध आहे व जे सांगायचं आहे ते संवेदनशीलपणे तपासायचं होतं. तुमचं पेशाने रेडिओलॉजिस्ट असणं चित्रकार असण्याला पूरक झालं का?रेडिओलॉजिस्टपेक्षा मुळात डॉक्टर असण्यानं खूप फरक पडला. तीस वर्षे मी हे काम केलं. तेव्हाही चित्रं काढत होतो. त्याचा दृश्य नव्हे, पण दृष्टीवर प्रभाव होतंच होता नकळत. डॉक्टरला पेशंटवर एक सत्ता असते.  डॉक्टरचं वाक्य त्याच्यासाठी प्रमाण असतं. त्याचे पेशंटशी संबंध कसे असावेत याचा विचार करताना चित्रकाराचं विषयाशी कसं नातं असावं असा विचार आपसूक घडत होता. तशाच अर्थानं, चित्रकार ‘माणसां’ची चित्रं काढत असतो तेव्हा त्याचं प्रतिनिधित्व करण्याची एक पॉवर त्याला मिळत असते. डॉक्टर पेशंटला पूर्ण व्यक्ती म्हणून समजून घेत त्याची स्वायत्तता भंगू न देता त्याच्याशी संबंध जोडतो. त्यातूनच चित्रकार म्हणून ती जबाबदारी मी अधिक जाणीवेनं पार पाडत राहिलो. या प्रक्रियेत उच्च दर्जाची विनयशीलता लागते. एखाद्याचं सोसणं जवळून बघताना त्याचा मान राखत त्याच्याकडे, त्याच्या संघर्षाकडे त्याच्या नजरेतून बघावं लागतं. चित्रकाराला हीच रिप्रेझेंटेशन पॉवर आहे. मला काय वाटतं ते नव्हे, तर आम्हा दोघांमधलं जे आहे ते नम्रपणे राखावं लागतं. काहीवेळा आपल्या ‘पोझिशन’चा माज येण्याची दाट शक्यता असते, ती दिसते मला आधुनिक वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये... कलावंतांमध्येही! आपल्याला जी विशिष्ट अनुकूल जागा लाभली आहे त्यातून शोधाला सजग व सक्रिय दिशेनं नेणं उमगत जावं असं मला वाटतं. व्यक्तीला एका व्यापक सामाजिक संदर्भात पाहाणं मला जरुरीचं वाटतं.मुलाखत : सोनाली नवांगुळ