- प्रसाद ओक‘बाबा... मी जर आत्ता तुझ्या पाठीवर थोडा वेळ पाय दिले तर तू मला पीएस ३ चा नवा गेम आणशील...?’ असे माझ्या मुलानी मला विचारले आणि त्या क्षणी मी अचानक खेचल्यासारखा कित्येक वर्षे मागे गेलो... काही वर्षांपूर्वी असाच तंतोतंत संवाद मी आणि माझ्या वडिलांमध्ये घडला होता... फक्त तेव्हा पीएस ३ च्या जागी पतंग होता... तोपतंग आठवला आणि त्या पतंगा सोबत मी सुद्धा आता आठवणींच्या आभाळात गटांगळ्या खाऊ लागलो... आठवणी असतात सुद्धा पतंगा सारख्याच... बुद्धीची फिरकी जोपर्यंत स्मरणशक्तीच्या मांजाला ढील देऊ शकते तोपर्यंत आठवणींचे पतंग कितीही उंच उडू शकतात. आणि मग पांढऱ्या शुभ्र बालपणीच्या आभाळावर आठवणींचे अनेक पतंग उडू लागले.मला आठवतंय....माझे ५ पतंग... एक चांदणी वाला, दुसरा शोले मधल्या बच्चनच्या फोटो वाला, तिसरा दुरंगी म्हणजे अर्धा पतंग हिरवा आणि अर्धा केशरी... आणि उरलेले दोन मी पकडलेले.. त्यातल्या एकावर अर्धचंद्र होता आणि दुसरा एकदम सफेद पण पकडताना फाटलेला म्हणून चिकटवलेला... माझी लाल मांज्याची फिरकी.. .आणि बरोब्बर एक तासांनी, ह्यबास झालं आता पतंग उडवणं.. अभ्यासाला बसाह्ण असा आईचा आवाज.पन्नास पैसे तासावर असं भाडं देऊन आणलेली लेडीज सायकल... मग बहिणीचं चिडवणं... मग १ रुपया देऊन मी आणलेली जेन्ट्स सायकल...ती चालवताना घोट्याला गुढघ्याला झालेल्या जखमा... त्यावर आईनी केलेली मलमपट्टी...शाळेच्या फाटलेल्या हाफ पेंट... त्यामुळे वाटणारी लाज... मग आईला कळू न देता ती पँट शिवण्याचा असफल प्रयत्न... मग हाताला लागलेली सुई आणि बाबांचा ओरडा...शाळेच्या प्रत्येक नवीन वर्षी नव्या पँट चा हट्ट... मग आईचं समजावणं.. मग माझं भावाला माझी पँट वापर असं सांगणं... त्याला ते पटण... मग मला नवी पँट मिळणं ती सुद्धा फूल’’...मधल्या सुट्टीत डबा हरवणं किंवा मित्राला देऊन आपण यशवंत ची कुल्फी खाणं... मग घसा बसणं.. मग डॉक्टर, औषधं.. मग शाळा बुडण... बुडलेला अभ्यास घरी करत बसणं.. तेव्हाच भावाचं मुद्दाम खेळायला जाणं... आपल्याला त्याचा आलेला राग... भांडणं... दिवाळीत किल्ला बांधायची धडपड... तुटलेली जुनी खेळणी फेविकॉल नि चिकटवण. नव्या कपड्यांसाठी बाबांकडे केलेला हट्ट.. फटाक्यांसाठी केलेल्या विनवण्या... लाडूच्या डब्यात न सांगता घातलेला हात... त्याबरोबर पाठीत मिळालेला धपाटा... त्यानंतर सगळ्यांसोबत केलेला फराळ... सुतळी बॉंब फोडताना मनात असलेली पण चेहऱ्यावर नसलेली भीती...शाळेच्या गॅदरींगमधे मिळालेली संधी... मग शाळेतल्या मित्रांसमोर खाल्लेला भाव... झालेलं कौतुक... त्यातून निर्माण झालेली नाटकाची आवड... मग एक एक इयत्ता पार करत जाणं...मग १० वी चं वर्ष... खूप खूप अभ्यास... नो सिनेमा नो नाटक... फक्त अभ्यास... बोडार्ची परीक्षा... टेंशन... रिझल्ट... चांगले मार्क्स ... कौतुक... नव्या कॉलेजची स्वप्नं....एडमीशन... नवे मित्र, मैत्रिणी, शायनिंग मारणं... एकांकिका... शिबिरं... नव्या ओळखी... प्रेम... मग लग्न... संसार... मुलंबाळ... करियर... स्पर्धा... धावपळ... ओढाताण... यश... पैसा... मालकीचं घर... मुलं मोठ्ठी होणं... त्याचं शाळेत जाणं... त्यांचे हट्ट पुरवणं... वगैरे वगैरे वगैरे........आणि अचानक , आत्ता काही गरज नाहीये नव्या गेमची... थोडे दिवस आहे तोच खेळस, असा वर्तमानात आत्ता बायकोचा आलेला आवाज...माझं स्वप्नातून जागं होणं... मुलाचं हिरमुसून निघून जाणं... आणि नंतर लगेच हो म्हणत जाऊ नकोस.. वाईट सवय लागते... दिवाळीत घेऊ त्याला तो नवीन गेम असं बायकोचं मला सांगणं...या सगळ्यानंतर खिडकीतून बाहेर उडताना दिसणारा पतंग पाहता पाहता मला कळेचना कि या इतक्या वर्षांमध्ये मी काही मिळवलंय कि माझ्या हातून काही हरवलंय...पतंग मात्र अजूनही आकाशातच... आठवणींच्या, लहानपणाच्या, मोठ्ठेपणाच्या, मिळवल्याच्या, हरवल्याच्या अशा अनेक गर्तेत गोता खात खात... भलं मोठ्ठं आकाश कवेत घेऊ पाहतोय....
(लेखक प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक आहे.)