इश्क ने गालिब को निकम्मा कर दियावरना हम भी आदमी थे काम के ...मिर्झा गालिबनं कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला हा शेर गळी उतरता उतरता या जित्या जागत्या शहरातील दोन पिढ्या कधी सरल्या हे कळलंच नाही. अहोरात्र जागं राहण्याची सवय जडलेली ही महानगरी म्हणजे सांस्कृतिक बदलाच्या मोजमापाची अचूक पट्टीच म्हणा, ना! काळानुरूप बदलणं हा बहुसंख्य मुंबईकरांचा स्वभाव आहे. म्हणूनही असेल, कदाचित.....नव्या पिढीनं गालिबची प्रेम भावना स्वीकारली पण त्याचा इजहार बदलला. आपण व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायचा, की वसंत पंचमीची कास सोडायची नाही, या संभ्रमात काही पिढ्या सरल्या. प्रेमाचा इजहार हा चार हात लांब राहून अर्थात सुरक्षित अंतर ठेवून केवळ नजरेनं करायचा, या खोलवर रूजलेल्या पाळामुळांना फुटलेल्या पारंब्या सर्वस्वी वेगळ्या आहेत. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे... या सारखा फक्त भावगर्भ आशयातून व्यक्त होण्याचा काळ गडप झाला आहे. लांब काडीचं गुलाबाचं फूल नाकासमोर धरून माझी होशील का, असं धिटाईनं विचारणारी आधीची पिढीसुद्धा आता पुढ्यातल्या मोबाइलमध्ये नाक खुपसून बसू लागली आहे. इतकंच कशाला, १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेण्टाइन्स डे च्या आसपास दादरच्या फुलबाजारात जितक्या गुलाब कळ्यांचा उठाव होतो, त्यापेक्षा कैकपटीनं जास्त गुलाब कळ्या सोशल मीडियाच्या कुंडीतून या मोबाइलमधून त्या मोबाइलमध्ये जात असतात. मायानगरी मुंबई हीच या स्थित्यंतराची जननी आहे. त्यातूनच ‘व्हॅलेण्टाइन्स डे’चं आपल्याकडे आलेलं लोण गेल्या दोन दशकांच्या प्रवासानंतर बऱ्यापैकी स्थिरावलंय. मध्यंतरीच्या काळात व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्याला विरोध करणं हा संस्कृतिरक्षकांना मिळालेला कार्यक्रम बनला होता. काही राजकीय पक्षांनीही प्रेमाच्या अशा प्रकटीकरणाला मोडता घालण्यासाठी आंदोलनंही छेडली. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, काटेच टोचतील या भीतीनं कुणाचं आंदोलन या गुलाबाला हात घालायला धजावलेलं नाही. त्याचं मुख्य इंगित सामाजिक स्थित्यंतरातच दडलेलं आहे. प्यार किया तो डरना क्या, असं दबक्या आवाजात गुणगुणणारी पिढी चाळिशीत पोहोचली तोवर त्यानंतरची पिढी तू तू तू तूतू तारा...म्हणू लागली होती. अगदी बॉलिवूडमध्येदेखील प्रेमाच्या आराधनेसाठी माडा-पोफळींच्या बगिच्यांची गरज संपली होती.‘मेरे जीवन साथी, प्यार किए जा...चे सूर आळवायला सिनेमात लिफ्टमधली जागासुद्धा पुरायला लागली होती. आताची डिजिटल पिढी त्याहूनही वेगळी आहे. ती एका अर्थानं व्हर्च्युअल आहे. या पिढीनं मुंबईला प्रेमाच्या विश्वामित्री जगाचं दर्शन घडवलंय. यांना गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल वगैरे देत प्रेमाचा इजहार करावा लागत नाही. कोणे एके काळी प्रेमात पडल्याची शाब्दिक अभिव्यक्ती चपलेच्या माराला निमंत्रण देण्याची क्षमता ठेवायची. आताच्या पिढीनं ही शक्यता डिलीटच करून टाकली आहे. कारण सोशल मीडियावर स्माइली आणि इमोजीच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत प्रेमभावनेला वाट करून देण्याचा व्हर्च्युअल मार्ग या पिढीनं अनुसरला आहे. प्रेम ही काही और चीज आहे. व्हर्च्युअल अवतारातून जे काही साकारतं ते बव्हंशी डेटिंग वा कोर्टिंगच्या अंगानं जातं, याचं भानही या पिढीला असल्याचं जाणवतं. म्हणूनच तर यांच्या व्हॅलेण्टाइन्सचा व्हर्च्युअल अवतार भिन्न जातकुळीतला आहे. यांचं गुंतणं जसं साजरं होतं तसंच ब्रेकअपही ! अभिव्यक्ती एव्हाना धीट झाली आहे. आता प्रेम व्यक्त करताना ना अंगाला हात लावायचा असतो, ना डोळा मारायचा असतो. प्रपोज करायला एक व्हॉट््सअॅप पुरतो आणि ब्रेकअप सेलिब्रेट करायला कोल्ड कॉफी पुरते. सारं काही विशिष्ट दिवशीच करायला हवं असा त्यांचा हट्ट नाही. ही पिढी परिपक्व असल्याचा अनुभव मुंबई पदोपदी घेत आहे. तूर्तास आधीच्या पिढीनं नाकं मुरडण्यापेक्षा...गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधीआम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी...या कुसुमाग्रजांच्या शब्दांत व्यक्त होऊन मोकळं व्हावं की!- चंद्रशेखर कुलकर्णी
आम्ही तरुण होतो याच्या बरेच आधी
By admin | Updated: February 12, 2017 23:51 IST