शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
7
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
8
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
9
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
10
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
11
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
12
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
13
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
14
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
15
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
16
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
17
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
18
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
19
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
20
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?

कृतज्ञतेचा कुर्निसात!

By admin | Updated: September 6, 2016 03:36 IST

निस्सीम व पराकोटीच्या निष्काम सेवेमुळे अखिल विश्वात ‘मदर आॅफ मॅनकाइंड’ अशी आपली ओळख निर्माण करते...ती मदर तेरेसा

‘दारिद्रय, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकारांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, म्हणून प्रथम या शत्रूंना दूर केले पाहिजे; यासाठी दु:खी व आपद्ग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे’, या विचारांनी प्रेरित होऊन युगोस्लोव्हिया येथील रोमन कॅथलिक अ‍ॅल्बेनियन कुटुंबात जन्माला आलेली अ‍ॅँग्निस गॉकशा वाजकशियू नामक महिला १९२९ च्या सुमारास कोलकात्यात येते. १९५० मध्ये ‘मिशनरीज आॅफ चॅरिटी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून तब्बल चार दशके दु:खी, पीडित व निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी स्वत:ला आजन्म वाहून घेते आणि तिच्या या निस्सीम व पराकोटीच्या निष्काम सेवेमुळे अखिल विश्वात ‘मदर आॅफ मॅनकाइंड’ अशी आपली ओळख निर्माण करते...ती मदर तेरेसा! खरे तर अ‍ॅँग्निस ही किराणा दुकानदार आणि शेतकऱ्याची मुलगी, सुखात वाढलेली. परंतु शालेय शिक्षणापासूनच तिच्यात सेवाकार्याची गोडी निर्माण होते, वयाच्या अठराव्या वर्षी ती ‘सिस्टर्स आॅफ लॉरेटो’ या आयरिश संघात प्रवेश करते, एक वर्ष आयर्लंड येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास करते, १९ वर्षे भूगोल विषयाचे अध्यापन करते आणि ती अध्यापन करीत असलेल्या शाळेजवळील मोती झील झोपडपट्टीतील लोकांचे दीनवाणे जगणे पाहून दु:खी-कष्टी होते. आपणही अशा दीनदुबळ्यांची सेवा करावी असे विचार तिच्या मनात डोकावत असल्याच्या सुमारास दार्जिलिंगला जात असताना अंतरात्म्यातून एक आवाज येतो...‘तू गरिबांच्या सेवेला लाग’. तोच दैवी संदेश समजून अ‍ॅँग्निस जोगीण बनून पूर्णत: मिशनरी कार्यास वाहून घेते आणि कोणालाही नतमस्तक व्हावेसे वाटेल असे काम उभारून मदर तेरेसा बनते. ‘अ‍ॅँग्निस ते मदर तेरेसा’ हा प्रवास एका रात्रीतून झालेला चमत्कार खचितच नव्हता. त्यासाठी आयुष्याची ४५ वर्षे मोजावी लागली. तिच्या सहकारी जोगिणींच्या साहाय्याने गटारात, उकिरड्यात तसेच इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांसाठी अनाथाश्रम काढून मातृप्रेमाने त्यांचे संगोपन केले, बेवारस, निर्वासित, निराश्रित, रोगपीडित, मरणोन्मुख व्यक्तींसाठी ‘निर्मल हृदय’ नावाचा आधाराश्रम सुरू केला, पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. केवळ शब्दांनी मानवजातीची सेवा घडत नसते. सेवेचे हे कार्य कठीण असून यासाठी समर्थन आणि समर्पण आवश्यक असते. भुकेलेल्याची भूक, तहानलेल्याची तहान, बेघरांना घर, दु:खी-पीडितांना मायेची ऊब देण्याचे ममत्त्व ज्याच्या काळजात वसलेले असते, तोच हे दिव्य कार्य करू शकतो असे मानणाऱ्या मदर तेरेसांनी आपल्या सेवाकार्याला व्यापकत्व बहाल केले. महिला, अपंग, वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, शाळा अशा विविध स्तरावरून कार्याचा आलेख रूंदावताना ‘मिशनरी ब्रदर्स आॅफ चॅरिटी’ स्थापून पुरूषांनाही सोबत घेतले. बघता-बघता जगभरातील ५२ देशात शाखांचा विस्तार करून २२७ ठिकाणी संस्थेची सेवा केंद्रे उभी केली. सामाजिक कार्याचा हा वटवृक्ष उभारूनही मदर तेरेसांना उच्चभ्रू समाजाने सहजासहजी स्वीकारले असे नाही. ‘सेंट आॅफ द गटर्स’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले. कोणतीही अभिलाषा उराशी न बाळगता एखाद्या विशिष्ट ध्येयाकडे वाटचाल करणारी माणसे ‘हाथी चला बाजार...’ हे ओळखून कार्यरत राहतात व त्यांना आपल्या कामातून उत्तर देत असतात. मदर तेरेसांचेही तसेच होते. शांत, संयमी वृत्तीची ही वामनमूर्ती समाजसेविका आयुष्यभर चेहऱ्यावर कारूण्यभाव आणि स्मित घेऊन कमालीच्या साधेपणाने जगत राहिली. मग प्रसंग तो पॅलेस्टियन बंडखोर आणि इस्त्रायली सैनिकात तात्पुरता समझोता घडविण्याचा असो वा चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाचा त्रास झालेल्या लोकाना मानसिक आधार देण्याचा असो. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आणि जगभर सद्भाव पेरण्यासाठी अनाथ, अपंग, निराधारांची ही निर्मलहृदयी माता आयुष्यभर आपल्या परीने कार्यमग्न राहिली. जगातील कोणत्याही पुरस्कारांनी तोलता येणार नाही एवढे महान आणि कोणालाही हेवा वाटावे असे कार्य त्यांनी उभे केले. १९६२ मध्ये पद्मश्री, १९७९ मध्ये नोबेल, १९८० मध्ये भारतरत्न, विविध मान्यवर विज्ञापीठांची डॉक्टरेट, पोपचे शांतता पारितोषिक, नेहरू पुरस्कार, ब्रिटीश सरकारचा अत्त्युच्च ‘आॅर्डर आॅफ मेरिट’ अशा ४३ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किताबांनी मदर तेरेसांचे कार्य गौरवान्वित करण्यात आले तरी मदर चेहऱ्यावर हसू घेऊन शांत, स्तब्ध आणि पाय जमिनीवरच! कारण कोणत्याही ‘दिव्यांच्या लखलखाटा’त जाणे त्यांना पसंत नव्हते. तरीदेखील त्यांच्या कार्याला कृतज्ञतेचा कुर्निसात घालण्यासाठी रविवारी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये वैश्विक पातळीवरील ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत मदर तेरेसांना संतत्व बहाल करण्यात आले. जगातील एकाच व्यक्तीच्या वाट्याला नोबेल, भारतरत्न आणि संतत्व प्राप्त होणे ही तशी विरळातील विरळ बाब म्हणावी लागेल. विख्यात समाजसेविका मदर तेरेसा यांना संतत्व बहाल केल्यामुळे जगभरातील वंचित, शोषित, पीडित, निराधार समाजवर्गाचे काळीज आज निश्चितच सुपाएवढे झाले असणार यात संदेह नाही. यामध्ये जसा त्यांचा वैयक्तिक गौरव आहे तसाच तो भारताचाही आहे.