मंत्र्यांनी मंत्रालयात तर यायलाच हवे, पण कोणत्या दिवशी मंत्रालयात बसावे, कोणत्या दिवशी मतदारसंघात जावे, कोणत्या दिवशी कोणते करावे याचे वेळापत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना करून दिले व त्यावर त्यांचे मतही मागवले. काहींनी उत्तरही पाठवले. पण मंत्रालयात येऊन बसा, असे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर यावी यासारखे दुर्दैव नाही. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्याला असे वेळापत्रक तयार करून देण्याची वेळ कधी आली नव्हती. वाचकांना यात मुख्यमंत्र्यांची चूक वाटेल, पण ही त्यांची चूक नसून मंत्र्यांना हे सांगण्याची वेळ यावी यात सरकारची नामुष्की आहे. भाजपा-सेनेचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली. तरीही अनेक मंत्री दोन आठवड्याच्या वरती मंत्रालयात बसायला तयार नाहीत. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र काढावे लागावे ही बाब सरकार कसे चालले आहे याची साक्ष देते. अर्थात याच सरकारात असे होते, असेही नाही. याआधीच्या आघाडी सरकारमध्येही वर्षातले दोन दिवस मंत्रालयात येणारे मनोहर नाईक यांच्यासारखे मंत्री होतेच. पण ते अपवाद. मंत्रालयात सर्वात जास्त काळ बसणारे मंत्री म्हणजे आर. आर. पाटील आणि त्याखालोखाल सुरेश शेट्टी. ‘मंत्र्यांचे हजेरीपुस्तक’ अशी बातमीही ‘लोकमत’ने त्यावेळी दिली होती. आज मात्र चित्र वेगळे आहे.फडणवीस सरकार एकखांबी तंबू बनू लागले आहे. एकटे मुख्यमंत्री वेगाने धावत निघाले आहेत. पण त्यांनी मागे वळून पाहिले तर कोणीही सोबतच काय दूरदूरवरसुद्धा मागे कोणी दिसणार नाही असे चित्र आहे. नाही म्हणायला सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे काही मंत्री वगळले तर अन्य मंत्री यात कुठेही दिसत नाहीत. प्रत्येकात परस्परांचे पाय खेचण्याची स्पर्धा लागली आहे. ‘तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसे’ या डायलॉगप्रमाणे सगळे वागत आहेत. पंकजा मुंडे भगवानगडावर भाषण करताना मी तुमची माता आहे, माझ्यामुळेच माझ्या भावांना लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या असे जाहीर बोलून जातात, राम शिंदे कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतरही आधी पंकजा मुंडेंशी बोलेन नंतरच पद घेईन अशी उघड भूमिका घेतात आणि गिरीश महाजन ज्या पद्धतीने त्यांच्या खात्याचा कारभार चालवत आहेत ते पाहिले तर आघाडीच्या काळात आणि त्यांच्यात फार फरक उरलेला नाही असे खात्यातील अधिकारीच जाहीरपणे म्हणत आहेत. शिवसेनेचे मंत्री सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका नेटाने पार पाडीत आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे हे सरकार नालायक आहे असे जाहीर भाषणात सांगत आहेत. या नालायक सरकारमध्येच त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले सुभाष देसाई, दिवाकर रावते अशी मंडळी मंत्री आहेत हे आदित्य ठाकरेंनी विसरावे इतकी शिवसेना विरोधकांसारखी वागत आहे. विदर्भातलेच वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या अनेक आठवणी आज त्यावेळी पत्रकारितेत सक्रिय असणारे सांगतात. नाईक सभागृहात बोलायला उभे राहिले की सगळे सभागृह भरलेले असायचे. सत्ताधारी बाकावरील सदस्य मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी झाडून हजर राहायचे. आज चित्र काय आहे? फडणवीस बोलायला उभे राहिले तर त्यांच्या पक्षाचेदेखील सर्वच्या सर्व सदस्य हजर नसतात. शिवसेनेकडून कसल्या अपेक्षा करणार?आज काँग्रेस आणि भाजपात फार फरक राहिलेला नाही. दोन वर्षे संपत आली तरी अजूनही या सरकारला महामंडळावरील नियुक्त्या करता आलेल्या नाहीत, पक्षाचे झेंडे खांद्यावर मिरवून मिरवून कार्यकर्ते थकले तरीही तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे त्यांना सांगितले जात आहे. या साऱ्याचा परिणाम येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत दिसेल. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यात कळीची ठरेल. त्यात भाजपाला महापौर करता आला नाही तर मुख्यमंत्री बदल अटळ आहे अशा राजकीय पुड्या आत्तापासूनच सोडण्याचे काम हेच असंतुष्ट करू लागले आहेत. पक्षातल्या असंतुष्टांची ही अवस्था तर जनतेने संतुष्ट व्हावे असे कोणते काम सरकार लोकाना सांगणार?- अतुल कुलकर्णी
सरकार सत्तेत आणि विरोधातही
By admin | Updated: October 24, 2016 04:05 IST