अत्यंत निर्ममतेने, कोरडेपणाने, तटस्थतेने आणि भावनाशून्यतेने जो कारभार चालविला जातो, त्यालाच सरकारी कारभार म्हणत असतील तर या सर्व अवगुणांच्या विरोधात ज्यांचे विचार आणि वर्तन असते, त्या साहित्यिकांची ओळखली जाणारी साहित्य अकादमी ही संस्थादेखील यापुढे सरकारी अकादमी म्हणूनच ओळखली जायला हवी. देशातील वाढत्या असहिष्णुतेचा प्रतिकात्मक निषेध म्हणून देशभरातील सुमारे चाळीस साहित्यिकांनी गेल्या दोन महिन्यात त्यांना पूर्वी प्राप्त झालेले साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या साहित्यिकांच्या हत्त्या होत असताना अकादमी मूक राहिल्याचा खरा तर तो निषेध होता. हा निषेध व्यक्त केला गेला तेव्हां कोणत्याही कृती वा उक्तीद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त न करता आता अकादमीने तिच्याकडे परत आलेले पुरस्कार न स्वीकारण्याचा आणि धनादेश न वटविता पुन्हा संबंधितांकडे पाठविण्याचा निर्णय आपल्या बैठकीत घेतला आहे. परत करण्याच्या या कृतीसोबत अकादमीने संबंधिताना वेगळे पत्र लिहून त्यांच्या भावनांची कदर करण्याचे सौजन्य दाखविण्याचा निर्णयही खरे तर घ्यावयास हवा होता. तसा काही तो झालेला दिसत नाही. पण तरीही इथपर्यंत सारे ठीकच झाले म्हणायचे. परंतु अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी त्यानंतर केलेले वक्तव्य मात्र साहित्यिकांच्या या संस्थेला सरकारी संस्थेची अवकळा प्राप्त करुन देणारे आहे. ते म्हणतात एकदा दिलेले पुरस्कार माघारी घेण्याची काही तरतूदच अकादमीच्या घटनेत नाही आणि ती करायची तर घटना दुरुस्ती करावी लागेल व ते किचकट काम आहे. जिथे केवळ साहित्यिकांचाच राबता असतो असे सांगितले जाते आणि जी संस्था राजकीय हस्तक्षेपापासून सुरक्षित असल्याचाही दावा केला जातो, अशा संस्थेच्या अध्यक्षांची ही भाषा केवळ सरकारी हडेलहप्पी याच सदरात मोडू शकते. त्यांच्या या विधानाचा एक अर्थ असाही निघू शकतो की सहिष्णुताभंगाचे असे प्रकार आता होतच राहणार तेव्हां ज्यांना हा भंग मानवणार नाही त्यांनी पुरस्कार न घेतलेलेच बरे! तिवारी यांचे पुढील विधान तसेच सुचवून जाते. ते म्हणतात, साहित्य अकादमी ही संस्था साहित्यिकांची आहे आणि तेच तिचे संचालन करीत असतात. पण तरीही या संस्थेने बहाल केलेला पुरस्कार ज्यांना परत करावासा वाटतो त्यांनी एक तर आपल्या निर्णयाच पुनर्विचार करावा अन्यथा स्वत:ला अकादमीपासून कायमचे वेगळे करुन टाकावे! हे सर्व बघितल्यानंतर ज्या साहित्यिकांनी अकादमीच्या बोटचेपपणावर आपली निषेधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली, ती किती योग्य आणि तंतोतंत होती याची प्रचितीच अकादमीच्या अध्यक्षांनी आणून दिली आहे.
सरकारी ‘अकादमी’
By admin | Updated: December 19, 2015 03:46 IST