विशिष्ट कालावधीनंतर इतिहासातील काही घटना तपशीलामधील थोड्याशा बदलांसह पुनरावृत्त होत असतात, असे म्हणतात. पण हाच न्याय पुराणकालीन घटनांनाही लागू पडत असावा असे उत्तर प्रदेश राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर जाणवू लागले आहे. महाभारतातील महायुद्ध संपल्यानंतर आणि पांडवांचा राज्याभिषेक झाल्यानंतर स्वगृही निघालेला श्रीकृष्ण निरोप घेण्यासाठी कौरव माता गांधारीच्या महालात प्रवेश करतो तेव्हां गांधारी त्याला म्हणे एक शाप देते. ‘मनात आणले असते तर तू कुरुकुळाचा नाश होणे थांबवू शकला असता, पण तू ते केले नाहीस, त्यामुळे कुरुकुळाचा जसा नाश झाला तसाच तो तुझ्या यादवकुळाचा नाश होऊन तुझे कुळ निर्वंश होऊन जाईल’! गांधारीचा हा शाप खरा ठरतो आणि अंतत: स्वत: श्रीकृष्णासह यादवकुळाचा नाश होतो, असा उल्लेख महाभारतात आहे. आज उत्तर प्रदेशात योगायोगाने यादवांचेच राज्य आहे आणि या यादवांमध्ये जी यादवी माजली आहे, ती लक्षात घेता आता सत्तेच्या संदर्भात तेथील यादवकुळ विनाशाच्या गर्तेत सापडले असून हा विनाश कोणाच्या शापवाणीतून आकारास येत आहे व ही शापवाणी उच्चारणारी गांधारी कोण, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज त्या राज्यात मुलायमसिंह यादव उर्फ नेताजी यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीची सत्ता आहे आणि मुख्यमंत्रिपदाचे सिंहासन मुलायमपुत्र अखिलेश यांच्या ताब्यात आहे. देशातील प्रत्येक पक्षाच्या नेत्याने नेहरु-गांधी घराण्याच्या कथित घराणेशाहीवर प्रसंगी प्रच्छन्न टीका केली असली तरी ग्रामपंचायतीपासून देशाच्या राजकारणापर्यंत साऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या घराणेशाहीचाच पुरस्कार आणि अवलंब केला आहे आणि म्हणूनच उत्तर प्रदेशात मुलायम यांच्या कुणब्यातील किमान तीन डझन लोक सत्तेच्या कोणत्या ना कोणत्या पदावर विराजमान आहेत. परंतु तसे असले तरी या सर्व भाऊबंदांना भाऊबंदकीचा उपसर्ग पोहोचलेला आहे. मुळात मुलायम यांनी अखिलेश यांना मुख्यमंत्री केले तेच काही फार मोठ्या त्याग भावनेतून नव्हे. त्यांना स्वत:ला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत होती व त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्याची गादी अन्य कोणाला देण्यापेक्षा आपल्या मुलाला दिली. नेताजींचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले पण तोवर अखिलेश आपली मांड पक्की करुन बसले होते. बाप-लेकातील पिढीचे अंतर म्हणा वा दृष्टिकोनातील फरक म्हणा, मुलायम यांनी अनेकवार आपल्या मुलाच्याच कारभारावर जाहीर टीका केली. पण या टीकेने शेंडी तुटो की पारंबी असे रुप धारण केले नाही. आज आता ती अवस्था निर्माण झाली आहे. कारण त्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून निवडणुकीनंतर राज्याची सूत्रे बापाने आपल्या हाती घ्यायची की मुलाकडे राहू द्यायची या संघर्षातून समाजवादी पार्टीत सरळसरळ मुलायम आणि अखिलेश असे दोन तट पडले आहेत. त्यात शिवपाल यादव यांनी मुलायम यांची तर रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांची बाजू घट्टपणे लावून धरली आहे. योगायोगाने हे दोघे यादव मुलायम यांचे जवळचे नातलग भाऊच आहेत. मौजेची बाब म्हणजे या संघर्षात विधानसभेच्या निवडणुकीत मतदार समाजवादी पार्टीलाच पुन्हा सत्तेवर बसविणार असल्याचे गृहीत धरले गेले आहे. पण तसे होण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. बाप-लेकातील संघर्ष तसा आजचा नाही. गेल्या काही दिवसांपासून तो उघड वा छुप्या स्वरुपात अस्तित्वातच आहे. त्यामुळेच अखिलेश यांनी शिवपाल यादव यांची आपल्या मंत्रिमंडळातून याआधी एकदा आणि आता दुसऱ्यांदा हकालपट्टी केली आहे तर त्याला उत्तर म्हणून मुलायम यांनी अखिलेश यांच्या पाठीराख्यांना पक्षातून डच्चू दिला आहे. राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव पुढे करायचे, हादेखील एक संघर्षाचा मुद्दा होता. त्यावर तोडगा म्हणून खुद्द मुलायम यांंनी अखिलेश यांचेच नाव जाहीर केले. पण आता त्यालाही विरोध होत असून नेताजीच पुढचे मुख्यमंत्री होतील, असा आग्रह शिवपाल आणि तत्सम लोक धरु लागले आहेत. पण बाप-लेकातील संघर्षास खरा कारक ठरला तो अमरसिंह यांचा पक्षप्रवेश. अमरसिंह यांच्याविषयी अखिलेश यांच्या मनात पराकोटीचा द्वेष आणि संताप आहे पण ‘त्यांनीच आपल्याला तुरुंगात जाण्यापासून वाचवले’असे जाहीर करुन मुलायम यांनी अमरसिंह यांना पक्षाच्या सरचिटणीसपदासह पक्षात दाखल करुन घेतले आहे. त्याचा संताप म्हणून अखिलेश यांनी अमरसिंह यांच्यासोबतच जयाप्रदा या अभिनेत्रीलाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकूणात आजच्या काळातील उत्तर प्रदेशातील यादवीच्या संभाव्य ऱ्हासाला कुणा गांधारीचा शाप भोवताना दिसत नसून त्याचे उत्तरदायित्व अमरसिंह नावाच्या शकुनीमामाकडे जात असावे असे म्हणता येऊ शकते. पुन्हा महाभारताचाच दाखल द्यायचा तर गांधारीचा शाप उच्चारुन झाल्यावर श्रीकृष्ण तिला म्हणतो, काही बाबी अटळ असतात आणि त्यामुळे त्या होऊ देण्यातच साऱ्यांचे हित असते. या न्यायाने यादवकुळातील आजच्या यादवीत उत्तर प्रदेशातील जनसामान्यांचे हित दडलेले नसेल कशावरुन?
गांधारी कोण?
By admin | Updated: October 25, 2016 04:16 IST