शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकऱ्यांची पंढरी

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

जालना जिल्ह्यातील खरपुडी, शेतकऱ्यांची आणखी एक पंढरी. शेतकरी ही वारीदेखील टाळत नाहीत.

जालना जिल्ह्यातील खरपुडी, शेतकऱ्यांची आणखी एक पंढरी. शेतकरी ही वारीदेखील टाळत नाहीत. आषाढी आणि कार्तिकीला कुठलाही वारकरी पंढरीची वारी चुकवत नाही. जालना जिल्ह्यातील शेतकरी याच भक्तिभावाने दर महिन्याच्या पाच तारखेला होणारी खरपुडीचीही वारी सोडत नाहीत. मे महिन्याच्या या पाच तारखेला अशा तब्बल २१३ वाऱ्या झाल्या. प्रत्येक वारीने नवे वारकरी जोडले आणि घडविलेदेखील. जालना जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात या वारीची बीजे सापडतात. एवढेच नव्हे तर शेजारी बीड, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यांतही ती रुजलेली दिसतात.कृषी विज्ञान केंद्र हा भारत सरकारचा उपक्रम. जालना जिल्ह्यात १९९२ साली या केंद्राची स्थापना झाली. सप्टेंबर १९९३ पासून या केंद्राने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र आढळते. मात्र, यात स्वत:ची ओळख निर्माण केलेली बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे देता येतील. ही यादी खरपुडीतील केंद्राशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जालना शहरापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर खरपुडी गावालगत हे केंद्र उभारले आहे. माणसांच्या उंचीइतके दगड होते या ठिकाणी. कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या पुढाकारातून या माळरानावर नंदनवन फुलले. शेतावरील चाचण्या, पीक प्रात्यक्षिके असे उपक्रम राबविले गेले. काही प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सप्टेंबर १९९७ साली स्वयंस्फूर्त गट स्थापन केला. दर महिन्याच्या पाच तारखेला कृषी केंद्रात न चुकता एकत्र येणे आणि पूर्वनियोजित विषयावर चर्चासत्र घडवून आणण्याचे ठरले. संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना बोलावण्याची जबाबदारी केंद्राने उचलली. एकही खंड न पडता गेले २१३ महिने हे चर्चासत्र होते आहे. आतापर्यंत या चर्चासत्रात ३५० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा झाल्या. मागील चर्चासत्रावर आधारित प्रश्नमंजूषा कार्यक्रमाने या चर्चासत्राची सुरुवात होते. सलग पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या शेतकऱ्याला चांदीचे नाणे दिले जाते. अन्नदान आणि चांदीची नाणी देण्याचा आर्थिक भार या शेतकऱ्यांमधूनच उचलला जातो. साधारण २४ चर्चासत्रांचे बुकिंग आजच फुल्ल असल्याचे कार्यक्रम समन्वयक एस. व्ही. सोनुने सांगतात. प्रत्येक चर्चासत्राला २०० ते ६०० शेतकरी उपस्थित असतात. चर्चासत्राचा विषय केंद्राशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याला कळविला जातो. विषय डाळिंबाचा असेल तर डाळींब उत्पादक येतो आणि मोसंबीचा असेल तर मोसंबी उत्पादक. आतापर्यंत मराठवाड्यात घेतल्या जाणाऱ्या आणि घेऊ शकणाऱ्या प्रत्येक पिकावर येथे मंथन झाले. यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभवकथन झाले. शेतशिवार भेटी झाल्या. यातूनच अनेक शेतकरी घडले. आख्खा मराठवाडा सध्या दुष्काळझळा सोसत असताना या केंद्राशी संबंधित शेतकऱ्यांनी मात्र या दुष्काळावर मात केली आहे. शेतकऱ्यांच्या तपश्चर्येचे हे फलित म्हणावे लागेल. एकीकडे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना जालना तालुक्यातील कडवंची या गावात आजही द्राक्षांच्या बागा मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गावात ३०० एकरपेक्षा जास्त द्राक्ष लागवड झाली असून, द्राक्षाचे गाव म्हणून कडवंची ओळखले जाते. दुष्काळ २०१२ चा असो वा आत्ताचा, इथली एकही बाग पाण्याअभावी वाळली नाही. अवघ्या १० ते १५ वर्षांच्या काळात माथ्याकडून पायथ्याकडे या धर्तीवर पाणलोटास श्रीसीटी, कंपार्टमेंट बंडिंग, नालाबंडिंग, सीमेंट नालाबांध, वृक्ष लागवड करून अख्खे गाव बदलून गेले. गावचे वार्षिक उत्पन्न ७७ लाखांवरून १५ कोटींपर्यंत पोहोचले. जसे कडवंची गावचे, तसेच शिवनीचेही. कडवंचीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतकरी सुखी झाला, तर शिवनीत वॉटर बजेटिंग करून तो समृद्ध झाला. प्रयोगशील दांपत्य शेतकरी मंडळ, कृषी तंत्रज्ञान महोत्सव हे आणखी काही वेगळे उपक्रम. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगत आहेत. शेती व्यवसायात ही समानता अनेक वर्षांपासून आधीच रुजली आहे. शेतीला आणखी यशस्वी करायचे असेल तर महिलांची भूमिका आणि त्यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, हे ओळखून केंद्राने प्रयोगशील दांपत्य मंडळ स्थापन केले. अशा ३५ दांपत्यांचा गट स्थापन करण्यात आला. दर महिन्याच्या अमावास्येला गटातील एका दांपत्याच्या शेतावर शिवारफेरी केली जाते. तो प्रयोग इतर ठिकाणी कसा राबवायचा यावर मंथन होते आणि केंद्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले जाते. पुढच्या अमावास्येला दुसरी शिवारफेरी. राबविलेला प्रयोगही दुसराच. अशी ही प्रयोगशील शेतकऱ्यांची साखळी वाढतच जाते... - गजानन दिवाण