आपले धर्मशास्त्र सांगते की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत़ म्हणूनच ‘गावो विश्वस्य मातर:’ म्हटले जाते. मला तर तेहतीस कोटी हे संख्येत लिहिता सुद्धा येत नाही़ शंभर, एकशे आठ, जास्तीत जास्त विष्णुसहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची सहस्त्रनामावली़ या बाबतीत आमची मजल हजारापर्यंत़ देवांचीच संख्या तेहतीस कोटी म्हणजे आपल्या देशाला कितीतरी चांगले दिवस यायला पाहिजेत़ देश ‘सुजलाम सुफलाम’ व्हायला कसली बरे अडचण असावी? तेहतीस कोटीच्या संख्येत नागपूरचे विद्वान संस्कृत पंडित कै. श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी आणखी एका देवाची नव्याने प्रतिष्ठापना केली़ संस्कृतमध्ये श्रमगीता लिहिली आणि पुण्याच्या पं़ वसंतराव गाडगीळांनी ‘शारदा’ मासिकातून ती प्रकाशित केली़ चाळीसपेक्षा अधिक वर्षे झाली असतील या गोष्टीला़हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे परवा माझ्या मित्राने सहज म्हणून विचारले तू कोणत्या देवाची उपासना करतोस? ईश्वरी शक्तीला वंदन करतो़ ती आहे म्हणून सर्व चालले आहे़ ‘घेतो झोप फिरूनी उठतोही ईश्वराची कृपा’ झोपेतच राम म्हटले तर सकाळ कशी दिसणार? सांगण्याचे तात्पर्य तो आहे म्हणून सर्व काही आहे़ ‘देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो’ ह्या इयत्ता दुसरीतील कवितेने ‘तशी आम्ही मुले देवा तुझी’आम्ही ईश्वराची लेकुरे याचे भान जागविले होते़ श्री़ भा़ वर्णेकरांच्या ‘एको देव: परिश्रम: श्रमो राम: श्रमो कृष्ण:’ श्रम हाच एक देव आहे़ तोच राम आहे़ तोच कृष्ण आहे़ प्रयत्न नावाच्या देवाची आगळी-वेगळी ओळख करून दिली़ प्रयत्नालाच परमेश्वर मानून जीवनाची वाटचाल केली तर देवसुद्धा आपल्या शुभाशीर्वादासाठी आपल्या मागे उभाच असेल़ ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ याचा प्रत्यय यायलाच हवा आणि येतोच़‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे जर आहे तर ‘प्रयत्न’ नावाच्या देवाची ओळख बालमनाला करून दिली पाहिजे़ ‘प्रयत्न’ देवाचा साक्षात्कार, शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणींना करून दिला पाहिजे़श्रमदेवाची प्रतिष्ठापना व्यक्तिगत जीवनात आणि राष्ट्राच्या जीवनात केली तर भारत देशाला भविष्यात बरे दिवस येतील़ एवढे महत्त्व या एका देवाचे आहे़ संतांनी या देवाला जवळ केले होते़‘यत्न तो देव जाणावा’ हे त्यांचे अनुभूतीचे बोल होते़‘केल्याने होत आहे रेआधी केलेचि पाहिजे? चला तर, आजच करूया श्रमदेवाची प्राणप्रतिष्ठा आणि देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ या़ ‘श्रम एव जयते’ -डॉ. गोविंद काळे
एको देव: परिश्रम:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 06:37 IST