शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: 'धर्मवीर'चा शेवट होता नव्या सुरुवातीची नांदी?; एकनाथ शिंदेंची 'धर्मवीर सेना' चमत्कार करणार?

By संदीप प्रधान | Updated: June 22, 2022 10:06 IST

Eknath Shinde: शिंदे यांनी नेहमीच सर्वसमावेशक राजकारण केले. विरोधी पक्षातील नेत्यांचीही कामे ते करीत. त्यामुळे आमदारांची कुमक त्यांच्यासोबत उभी राहिली.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक,लोकमत)ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख स्व. आनंद दिघे यांच्यावरील ‘धर्मवीर’ चित्रपट कधी रिलीज करायचा याबाबत बैठक सुरू होती. बहुतेकांचे मत असे होते की, महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे तर त्याचवेळी चित्रपट रिलीज करायला हवा. सारे जण एकनाथ शिंदे काय अंतिम निर्णय देतात, याकडे पाहत होते. शिंदे यांनी हा चित्रपट लागलीच रिलीज करण्याचा ‘आदेश’ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावेळी शिंदे कुठले टायमिंग साधत आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते. मात्र शिंदे यांच्या मनातील खळबळ, राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत होणारी महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट, शिंदे यांचे होणारे बंड आणि धर्मवीरांना अभिप्रेत जहाल हिंदुत्वाकरिता आपण बंडाचा पवित्रा घेतल्याचे शिंदे यांनी आपल्या राजकीय कृतीला दिलेले वैचारिक अधिष्ठान हे सारे शिंदे यांना त्यावेळीच समोर दिसत होते. वेगवेगळ्या सुट्या घटनांची संगती अशीच कालांतराने लागते.

‘धर्मवीर’ चित्रपटाचा प्रीमियर सुरू असताना अगदी शेवटी आनंद दिघे इस्पितळात असतानाचा सीन सुरू झाला. पडद्यावरील उद्धव व राज ठाकरे हे दिघे यांच्या भेटीला जाण्याचा प्रसंग आता दाखवला जाणार तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले व थिएटरमधून बाहेर पडले, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. पत्रकारांनी याबाबत ठाकरे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा आपल्याला ती घटना पुन्हा पाहायची नव्हती, असे ते म्हणाले. मात्र प्रत्यक्षात चित्रपटाच्या अखेरीस दिघेंचा राजकीय वारस शिंदे हेच असल्याचा संदेश देऊन चित्रपट संपत असल्याने कदाचित चित्रपटाचा शेवट ठाकरे यांनी टाळला, अशी चर्चा मीडियात सुरू राहिली. त्यामुळे शिंदेंच्या हालचालींची ठाकरे यांनाही कुणकुण लागली होती का, असे आता वाटू लागते.

आनंद दिघे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आणि छगन भुजबळांपासून नारायण राणे यांच्यापर्यंत जनसामान्यांशी नाळ जोडली गेलेल्या प्रत्येक नेत्याला शिवसेनेत संघर्ष करावा लागला. भुजबळ हे शिवसेनेचे जहाल ओबीसी चेहरा होते. त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचल्याने ठाकरे यांच्या डोळ्यात ती सलू लागली. मंडल आयोगावरून उभयतांमध्ये वाद झाल्याने त्यांना शिवसेना सोडावी लागली. भुजबळ १८ आमदार सोबत घेऊन बाहेर पडले. दिघे यांची ठाण्यातील लोकप्रियता अशीच कमालीची उच्च पातळीची झाली. लोक देव्हाऱ्यात त्यांचा फोटो ठेवून पुजन करू लागले. त्यावेळी दिघे यांचे प्रस्थ कमी करण्याकरिता टी. चंद्रशेखर या आयुक्तांचा ठाकरे यांनी खुबीने वापर केला. दिघे यांचा उल्लेख ‘ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख’ केला जात होता. मातोश्रीने फतवा काढून ठाणे जिल्हाप्रमुख, असा उल्लेख करण्याचा आदेश दिला होता. शिवसेनेला एक कोटी रुपयांची देणगी व शंभर रुग्णवाहिका देणाऱ्या गणेश नाईक यांची नवी मुंबईतील लोकप्रियता व साम्राज्य वाढल्याचे लक्षात आल्यावर माथाडी कामगारांच्या घरकुल योजनेवरून त्यांचेही पंख कापले गेले. 

नारायण राणे व एकनाथ शिंदे या दोघांना ज्या परिस्थितीमुळे बंड करावे लागले. त्यामध्ये साम्य आहे. राणे व शिंदे हे शिवसेनेला सर्वार्थाने रसद पुरवत होते. निवडणूक असो की पक्षाचा एखादा कार्यक्रम, त्याची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे ही उभयतांची चूक ठरवली गेली. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू होता. मात्र शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक संबंध सलोख्याचे राहिले. त्यामुळे एक ना एक दिवस शिंदे वेगळा राजकीय विचार करणार ही ठाण्यात चर्चा होती. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्याकडे सोपवली जाईल, अशी शिंदे यांना अपेक्षा होती. मात्र अचानक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आपल्याला मिळेल, अशी शिंदे यांची अपेक्षा होती. तीही आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे संपुष्टात आली. यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांना आमदारांची रसद पुरवण्याचे अप्रत्यक्ष काम खुद्द ठाकरे यांनीच केले. मुख्यमंत्री असूनही ठाकरे आमदारांना भेटत नव्हते. त्यांची गाऱ्हाणी ऐकत नव्हते. त्यामुळे एकेकाळी आमदार जसे राणे यांना आपल्या समस्या सांगायचे तसेच ते आता शिंदे यांना सांगू लागले. शिंदे हे अनेक आमदारांना वैयक्तिक पातळीवर मदत करीत होते. ठाण्यातही शिंदे यांनी नेहमीच सर्वसमावेशक राजकारण केले.

विरोधी पक्षातील नेत्यांचीही कामे ते करीत. त्यामुळे आमदारांची कुमक त्यांच्यासोबत उभी राहिली. आमदार, नगरसेवक वगैरे सत्तेच्या गणितांकरिता शिवसेनेतील बंडखोर नेत्यांच्या मागे उभे राहात असले तरी शिवसैनिक बंडखोरांच्या मागे उभा राहात नाही. ठाण्यातील शिवसैनिक काय करणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे. आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाकरिता शिवसेनेत बंड केलेल्या एकाही नेत्याला ते पद लाभलेले नाही. त्यामुळे शिंदे चमत्कार घडवतात का, हे काळच ठरवेल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे