शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: ओ रेई पेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 08:47 IST

एडसन अरांतेस दो नासिमेंतो नावाचा महामानव पृथ्वीतलावर कधीतरी होऊन गेला, आयताकृती फुटबॉल मैदानाचा तो सम्राट होता, असे पुढच्या पिढ्यांना सांगितले तर त्या विचारतील कोण होते ते?

एडसन अरांतेस दो नासिमेंतो नावाचा महामानव पृथ्वीतलावर कधीतरी होऊन गेला, आयताकृती फुटबॉल मैदानाचा तो सम्राट होता, असे पुढच्या पिढ्यांना सांगितले तर त्या विचारतील कोण होते ते? पण पेले हे त्या जादूगाराचे दोन अक्षरी नाव घेतले की त्यांचा नक्की विश्वास बसेल. गरीब माता-पित्यांच्या पोटी जन्मलेल्या या अद्वितीय खेळाडूला प्रतिस्पध्र्थ्यांसारखा कर्करोगाला गुंगारा देता आला नाही. झुंजता झुंजता त्याने अखेरचा श्वास घेतला. एका दंतकथेची अखेर झाली. ब्राझीलमधील सान्तोस बंदरावर पडेल ती कामे करणाऱ्या पेलेंच्या वडिलांना फुटबॉलचे वेड ते मुलात उतरले अन् विज्ञानालाही आश्चर्य वाटावे अशी शारीरिक वैशिष्ट्येही लाभली. दारिद्र्यामुळे खरा फुटबॉल मिळायचा नाही, तेव्हा लहानगा पेले पायमोज्यात वृत्तपत्राचा कागद कोंबून त्याचा चेंडू बनवायचा. 

चहाच्या टपरीवर काम, बूटपॉलिश करून, शेंगदाणे विकून घराला मदत करणारा पेले आईला गॅस स्टोव्ह विकत घेता यावा म्हणून अवघ्या दहा डॉलर्ससाठी एका क्लबशी करारबद्ध झाला; पण ती गरिबी क्षणभंगूर ठरली. काही वर्षांत पेले हा कित्येक लाख डॉलर्स कमावणारा खेळाडू बनला. १९७० चे दशक फुटबॉलचे सुवर्णयुग म्हणविले जाते आणि त्या पर्वाचा सर्वाधिक धनवान खेळाडू पेले होता. शारीरिक क्षमतेचे सगळे तर्क आणि थेट गुरुत्वाकर्षणालाही चकवा देणाऱ्या या महान खेळाडूच्या मांसपेशीत, मेंदूत व हृदयात अतिमानवी काय आहे, याचे कुतूहल जगाला वाटत राहिले. पस्तीशीच्या उंबरठ्यावर असताना न्यूयॉर्क टाइम्सने चक्क त्यांची तपासणी केली. तेव्हा आढळले, की साधारणपणे सरावाच्या वेळी खेळाडूंची हृदयगती ९० ते ९५ राहते, तर पेलेंचे हृदय मात्र ४६ ते ५८ वेळाच धडधडते. हाडांची घनता व अंगी चपळता इतकी की मैदानावर अवघ्या ४० ते ६० सेकंदात ते आक्रमणाची दुसरी वेगवान चाल रचू शकत. 

महत्त्वाचे म्हणजे पेलेंची नजर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या हालचाली इतरांपेक्षा ३० टक्के अधिक टिपते. हाडांची अतिघनता, सरळ पाय यामुळे चेंडू जणू पेलेंच्या पायांना अदृश्य धाग्यांनी बांधलाय की काय, असा प्रेक्षकांना भास व्हायचा. याच अतिमानवी क्षमता, असामान्य कौशल्य, शारीरिक-मानसिक वैशिष्ट्यांमुळे आयुष्याची ८२ वर्षे पेले एक दंतकथा म्हणूनच जगले, वावरले, जगभर विस्मयाचे प्रतीक बनले. अन्य थोर खेळाडूंना हेवा वाटावे असे आयुष्य, लौकिक वाट्याला आला. 

पेलेंनी भेट दिलेली स्वाक्षांकित जर्सी व फुटबॉल पोप फ्रान्सीस यांनी व्हॅटिकन संग्रहालयात ठेवला. अवघ्या १७ वर्षे २४९ दिवसांचा, विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत तरुण फुटबॉलपटू आणि १९५८, १९६२ व १९७० असे तीन विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू असे दोन विश्वविक्रम पेलेंच्या नावाने गिनीज बुकने नोंदले. कारकिर्दीत १३६३ सामन्यांमध्ये तब्बल १२९ हॅट्ट्रिकसह १२७९ गोल, ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी ९२ लढतींमध्ये ७७ असे जवळजवळ प्रत्येक सामन्यात गोलपोस्ट भेदणाऱ्या पेलेंच्या जवळपासही कुणी नाही. १९ नोव्हेंबर १९६९ ला पेलेंनी १०००वा गोल नोंदविला. तो दिवस सान्तोस शहरात 'पेले दिन' म्हणून पाळला जातो. दुसऱ्या विश्वचषकासाठी मैदानात पाऊल ठेवण्याआधीच ब्राझीलने पेलेंना 'राष्ट्रीय संपत्ती जाहीर केले. जेणेकरून इतर देश किंवा क्लबनी त्यांना घेऊन जाऊ नये. वीस दिवसांपूर्वी विश्वचषकावर मोहोर उमटविणारा मेस्सी किंवा अंतिम सामना हरल्यानंतर विमनस्क झालेला एम्बाप्पे अथवा रोनाल्डो, आधीच्या पिढीतला डेव्हिड बेकहम किंवा त्याही आधीचा मॅराडोना या दिग्गजांच्या प्रत्येक कौशल्याची पहिली ओळख पेलेंनी रसिकांना करून दिली. 

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कौन्सिलने विसाव्या शतकातील महान खेळाडू म्हणून त्यांना गौरविले. टाइम मासिकाने शतकातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. राजकारणात नसताना १९९५ साली ब्राझीलच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी पेलेंना क्रीडामंत्री नेमले. अखेरच्या मैत्रीपूर्ण सामन्यात पहिल्या हाफमध्ये नव्या न्यूयॉर्क कॉसमॉस, तर दुसरा हाफ जुन्या सान्तोस क्लबकडून खेळले. १९६७ मध्ये नायजेरियात लष्कर विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षावेळी केवळ पेलेंचा सामना पाहण्यासाठी ४८ तासांची युद्धबंदी घोषित झाली. एका आयुष्यात असे इतके भाग्याचे क्षण केवळ पेले नावाच्या शहेनशहाच्याच वाट्याला आले. ते ओ रेई म्हणजे पोर्तुगीज भाषेत राजा होते. त्यांना 'पेरोला नेगरा' म्हणजे ब्लॅक पर्ल किंवा कृष्णमोती म्हणून ओळखले जायचे. स्मृतींचा शिंपला मागे ठेवून अनंतात घरंगळत गेलेला हा अजरामर मोती आता परत कधी येणार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Footballफुटबॉल