रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला
सुमारे चार दशकांपूर्वी भारताने हलके लढाऊ विमान (तेजस) आणि त्यासाठीचे टर्बोजेट इंजिन (कावेरी) विकसित करण्यास प्रारंभ केला. आजही कावेरीचा विकासच सुरू आहे. दुसरीकडे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ‘हायप्रिक्स’ नामक स्टार्टअप कंपनीने मद्रास आयआयटीच्या सहकार्याने ‘रॅमजेट’ प्रकारचे इंजिन विकसित करून त्याची यशस्वी चाचणीही घेतली.
टर्बोजेट इंजिन अधिक गुंतागुंतीचे असते ही वस्तुस्थिती मान्य केली, तरी तुलनेत किती तरी मोठे मनुष्यबळ आणि आर्थिक स्रोत उपलब्ध असलेल्या सरकारी संस्थेला चार दशकांनंतरही यश हुलकावणी देते आणि एक नवखी खासगी संस्था अवघ्या सहा महिन्यांत यश चाखते, या विरोधाभासावर विचार होणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत उपक्रमां’तर्गत विविध शैक्षणिक संस्था आणि खासगी उद्योग परस्पर सहकार्याने विविध क्षेत्रांत उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढे येत आहेत. या सहयोगामुळे नवोपक्रमांना चालना मिळत असून, स्वदेशात विकसित तंत्रज्ञानामुळे विदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होत आहे आणि देशाच्या संरक्षणशक्तीत भर पडत आहे. भारताचे संरक्षण आणि अवकाश क्षेत्र अलीकडे झपाट्याने बदलत असून, शैक्षणिक संस्था आणि खासगी उद्योजकांमधील वाढता समन्वय त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
बंगळुरूस्थित हायप्रिक्स या स्टार्टअपने नुकतीच ‘तेज’ या देशातील पहिल्या खासगीरीत्या विकसित रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी आयआयटी मद्रासमधील नॅशनल सेंटर फॉर कम्बशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एनसीसीआरडी)च्या सहकार्याने घेण्यात आली. अशा सहकार्याची अपार क्षमता स्पष्ट करणारे हे एक उदाहरण आहे. पुढच्या पिढीतील क्रुझ क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने (यूएव्ही) यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत बऱ्याच स्टार्टअप उद्योगांनीही शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने संरक्षण, विमानचालन, अवकाश, अशा उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशाचे झेंडे रोवले आहेत.
आयआयटी कानपूरने आयडिया फोर्ज या ड्रोन उत्पादक कंपनीसोबत केलेल्या सहकार्य करारातून विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी ड्रोनचा भारतीय लष्कर वापर करीत आहे. या सहयोगामुळे भारतातील ड्रोन तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत असून, परदेशी आयातीवरील अवलंबित्व त्यामुळे कमी होत आहे. अवकाश क्षेत्रातही शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्स यांच्यातील सहकार्यामुळे क्रांती होत आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’ या स्टार्टअपने इस्रोच्या विविध संशोधन केंद्रांशी समन्वय साधत ‘विक्रम-एस’ या भारतातील पहिल्या खासगीरीत्या विकसित उपकक्षीय प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्याचप्रमाणे, अग्निकुल कॉसमॉसने आयआयटी मद्रासच्या सहकार्याने ‘अग्निबाण’ हे उपग्रह प्रक्षेपण यान विकसित केले आहे. अलीकडेच, आयआयटी मुंबई आणि भारत फोर्ज यांच्या सहयोगातून लष्करी वाहनांसाठी हलक्या, पण मजबूत मिश्रधातूंची निर्मिती करण्यात आली आहे.
ही वानगीदाखल काही उदाहरणे झाली. प्रत्यक्षात, गेल्या काही वर्षांत देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधून किंवा त्यांच्या सहकार्याने उदयास आलेल्या अनेक स्टार्टअप उद्योगांनी सर्वसामान्य माणसाचे दररोजचे जीवन बदलणाऱ्या नवोपक्रमांसह देशाच्या संरक्षणसिद्धतेलाही हातभार लावला आहे.
शैक्षणिक संस्थांकडून सैद्धांतिक ज्ञान, तर खासगी उद्योगांकडून व्यावहारिक उपाय मिळत असल्याने संशोधन वेगाने तंत्रज्ञानात रूपांतरित होते आणि लवकरच प्रत्यक्ष उपयोगासाठी उपलब्ध होते. अशा सहकार्यामुळे उच्च तंत्रज्ञानासाठीचे विदेशांवरील अवलंबित्व कमी होत आ. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समस्यांवर काम करण्याची संधी मिळत असल्याने, देशात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होत आहे.
शैक्षणिक संस्था आणि खासगी उद्योजकांमधील वाढता समन्वय आत्मनिर्भरतेसाठी उत्प्रेरक ठरत असून, जागतिक स्पर्धेत भारत अधिक सक्षम ठरत आहे. स्टार्टअप उद्योगांना सरकारचा सक्रिय पाठिंबा, मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक आणि प्रगत कुशल मनुष्यबळ यांच्या मदतीने भारत लवकरच जागतिक नवोपक्रम व उत्पादन क्षेत्रात आघाडीवर जाईल, अशी आशा आहे; परंतु त्याचवेळी सरकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्षे एकाच प्रकल्पावर काम करीत, गलेलठ्ठ वेतन घेऊन खुर्च्या उबवणाऱ्या कथित संशोधकांचेही उत्तरदायित्व निश्चित करायला हवे !
ravi.tale@lokmat.com