शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

सत्तेतल्या फुग्यांच्या बाहुल्या

By admin | Updated: May 18, 2017 04:12 IST

नुसतीच हवा भरलेली फुग्याची बाहुली आकाशात कितीही उंच उडविली तरी तिला खाली लावलेल्या पुठ्ठ्याच्या वजनाने ती आपल्या पायावरच उभी राहते.

नुसतीच हवा भरलेली फुग्याची बाहुली आकाशात कितीही उंच उडविली तरी तिला खाली लावलेल्या पुठ्ठ्याच्या वजनाने ती आपल्या पायावरच उभी राहते. अशा बाहुल्या एकेकाळी मुलामुलींत फार प्रिय होत्या. त्यांच्या मोठ्या व किमती आवृत्त्या आता बाजारात मिळतात. पण त्या बाहुल्यांच्या लोकप्रियतेची सर त्यांना नाही. आताच्या आपल्या राजकारणातली कशाही व कोणत्याही स्थितीत सदैव सत्तेच्या पायावर उभी होऊ शकणारी माणसे पाहिली की त्या फुग्याच्या बाहुल्यांची आठवण होते. अशा राजकारणी बाहुल्यांमध्ये बहुदा पहिल्या क्रमांकावर राहू शकणारा बाहुला रामविलास पासवान हा आहे. लोहिया आणि जयप्रकाश यांच्या तालमीत तयार झालेला हा पुढारी १९७५च्या आणीबाणीत तुरुंगात गेला. त्यातून सुटल्यानंतर त्याने लोकसभेची १९७७ची निवडणूक लढविली. त्याची लोकप्रियता तेव्हा शिगेला असल्याने तो पाच लाखांच्या मताधिक्याने तीत निवडून आला. (त्याचा तो विजय गिनीज बुकात नोंदविलाही गेला) पुढे तो मोरारजी देसार्इंच्या मंत्रिमंडळात मंत्री झाला. नंतरच्या काळात सरकारे बदलली, सत्तेतले पक्ष बदलले तरीही मोरारजींपासून मोदींपर्यंतच्या सहा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री म्हणून स्थान मिळाले. १९७७, ८०, ८४, ८९, ९६, ९८, २०००, २००४ आणि २०१४ अशा नऊ निवडणुकीत ते बिहारमधील हाजीपूर लोकसभा क्षेत्रातून त्या सभागृहात निवडून आले. त्याआधी बिहार विधानसभेतही आमदार म्हणून निवडून गेले होते. मधल्या काही काळात ते राज्यसभेतही होते. सत्तारूढ पक्ष बदलला की धावत जाऊन त्याच्या गाडीत बसण्याची सवय जडलेली व तीत पारंगत झालेली माणसेच अशी किमया करू शकतात. तेवढ्यावर न थांबता आपण पूर्वी ज्या सरकारात होतो त्या सरकारची व त्यातल्या आपल्याच जुन्या सहकाऱ्यांची उणीदुणी काढायलाही ती मागेपुढे पाहत नाहीत. विश्वनाथ प्रतापसिंह, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी आणि मनमोहनसिंग या साऱ्यांच्या कारकिर्दीत मंत्री राहिलेले पासवान आता मोदींच्या मंत्रिमंडळात स्थिरावले आहेत आणि ते त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध (त्यातल्या काहींना त्यांनी कधीकाळी आपले नेते मानले असतानाही) चौकशांची मागणी करू लागले आहेत. खरे तर भ्रष्टाचाराच्या प्रत्येकच आरोपाची चौकशी होणे गरजेचे आहे. पण तो भ्रष्टाचार प्रत्यक्ष सुरू असण्याच्या काळात तो करणाऱ्यांच्या सोबतीने सत्तेत राहिलेली माणसे त्याची मागणी करतात तेव्हा ती नुसती ढोंगीच नव्हे तर स्वत:च्या तत्कालीन वागणुकीवर पांघरूण घालणारीही वाटू लागतात. पक्षांतर हा आपल्या राजकारणाला जडलेला मोठा विकार आहे व त्यामुळे बाधित झालेल्या माणसांची काळजी व आश्चर्य आता येथे कुणाला वाटत नाही. त्यामुळे पासवानांच्या बदलत्या रंगांचे व सत्तेच्या सोबत राहण्याचे वेगळेपण आपणही लक्षात घ्यावे असे नाही. मात्र ही माणसे त्यांच्या निष्ठा आणि भूमिका जेव्हा बदलतात तेव्हा त्यांच्या राजकीय सच्चाईएवढेच त्यांच्या नैतिक भूमिकांच्या खरेपणाविषयीही पाहणाऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे होते. जयप्रकाश आणि लोहियांच्या सहवासात समाजवादाची कास धरून उभा राहिलेला पासवानांसारखा माणूस भगव्या रंगात न्हातो तेव्हा तसे करणारी इतरही अनेक माणसे डोळ्यासमोर असल्याने त्याचे तितकेसे आश्चर्य वाटत नाही. मात्र ‘गोमांस, राम मंदिर किंवा ३७०वे कलम हे भारतीय जनता पक्षाचे प्रश्न आहेत. त्यांचा मोदींच्या म्हणजे आमच्या सरकारशी संबंध नाही’ असे पासवान म्हणतात तेव्हा तो त्यांच्या आत्मवंचनेचाच नव्हे तर लबाडीचाही प्रकार होतो. ज्या पक्षासोबत पासवान सत्तेत आहेत तो त्यांच्या सरकारात बहुमतातच नाही तर नेतृत्वस्थानीही आहे. त्याच्यासोबत असताना ‘हे कार्यक्रम केवळ भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्याच्या सरकारचे नाहीत’ असे पासवान म्हणत असतील तर ते स्वत:खेरीज कुणाची फसवणूक करीत असतात? गोमांसावरून किंवा त्याच्या संशयावरून संघ परिवारातील लोकांनी उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये माणसे मारली. राम मंदिराचे वचन त्याने आपल्या जाहीरनाम्यात दिले आणि घटनेचे ३७०वे कलम संपविण्याची भाषाही त्याने कित्येक दशके देशाला ऐकविली. तो परिवार त्याच्या या भूमिकांचे सरकारी कार्यक्रमात रूपांतर करण्यासाठी तसे म्हणत आला की नुसतीच त्याची हवा तयार करण्यासाठी? पासवानांना संघ समजत नाही की त्याच्या ताब्यातील राजकीय पक्षाची वाटचाल कळत नाही? थोड्याशा तडजोडी आणि थोड्याशा माघारी घेतल्या, आपले मन जरासे मारले आणि आपल्या जुन्या व मूळ निष्ठांचा काहीसा विसर पाडला की माणसांना असे वागणे सोयीचेही होते. आपले वागणे आणि बोलणे जनतेला कळत नाही असा खुळा भाव पासवानांच्या मनात असेल तर मग मात्र ते खरोखरीच खुळे आहेत असे म्हणावे लागेल. प्रश्न सामान्य माणसांचा असता तर त्याची कोणी दखल घेतली नसती. पण जयप्रकाश, लोहिया इ.ची नावे घेत राजकारणात येऊन स्थायिक झालेल्या व त्या निष्ठांचा ऊठसूट उच्चार करणाऱ्या पासवानांना असे बोलताना पाहिले की माणसे व्यथित होतात. पासवानांनी निष्ठा जोपासायच्या नाहीत तर मग रामदास आठवल्यांना आणि त्या नरेंद्र जाधवांना काय म्हणायचे बाकी राहते?