शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

नव्या पिढ्यांचे पंख कापू नका

By admin | Updated: April 14, 2017 04:54 IST

ज्ञान हे नेहमीच नित्य, शुद्ध व बुद्धच नव्हे तर मुक्तही असते. ते तसेच राखले जाणे अपेक्षितही असते. ज्ञानाला मर्यादा नसतात. त्याला कुंपणे सहन होणारीही नसतात.

ज्ञान हे नेहमीच नित्य, शुद्ध व बुद्धच नव्हे तर मुक्तही असते. ते तसेच राखले जाणे अपेक्षितही असते. ज्ञानाला मर्यादा नसतात. त्याला कुंपणे सहन होणारीही नसतात. सर्व दिशांनी येणारे विद्यांचे प्रवाह समजून घेऊन ते ग्राह्य वा अग्राह्य ठरविणे हा ज्ञानाला असलेला विवेकाधिकार आहे. झालेच तर ज्ञानाला रंग नाही ते भगवे, हिरवे, निळे, पांढरे वा रंगीबेरंगीही नसते. ते पाण्यासारखे निर्मळ व पारदर्शी असते. अशा ज्ञानाची पीठेही तशीच नित्य, शुद्ध, बुद्ध, निर्मळ आणि पारदर्शी असावी लागतात. भारतातील विद्यापीठांची आजची अवस्था अशी राहिली नाही. ज्ञानाला संकुचित व मर्यादित करण्याचा आणि त्याला एका विशिष्ट विचारांची कुंपणे घालण्याचा प्रयत्न येथे सध्या सुरू आहे. नेमकी त्याच विषयीची चिंता आपले उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी चंदीगड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना बोलून दाखविली आहे. ज्ञान डावे वा उजवे नसते. अ‍ॅरिस्टॉटल तर ज्ञानाचा मार्ग हा मध्यममार्गच होय असे म्हणायचा. ज्ञान कोणत्याही एका बाजूचे वा टोकाचे नसते. ते तसे करण्याचा प्रयत्न त्याला एकमार्गी, एकारलेले व प्रसंगी प्रचारकी आणि अतिरेकी बनविणारा असतो. वेदांच्या पलीकडे ज्ञान असू शकत नाही, कुराण हा ज्ञानाचा पूर्णविराम आहे, मार्क्स हे जगाचे अखेरचे ज्ञानपीठ आहे यासारखी विधाने किंवा ज्ञानाचा शेवट एखाद्या महात्म्यापाशी, धर्मापाशी वा विचारापाशी होतो ही भूमिका खुळचट व ज्ञानाच्या क्षेत्रात वर्ज्य ठरणारी आहे. ज्ञान हे सदैव प्रवाहीच असावे लागते. कोणताही प्रवाह अडला वा अडविला की त्याचे डबके होते आणि ते यथावकाश अस्वच्छही होते. डॉ. अन्सारी हे जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आहेत. त्यांना विज्ञानाएवढीच ज्ञानाची अमर्याद महत्ता ठाऊक आहे. त्यांनी आपल्या भाषणात ज्ञानाची कोंडी करण्याच्या आपल्या विद्यापीठांनी चालविलेल्या अलीकडच्या प्रयत्नांविषयी फार स्पष्ट शब्दात काही सांगितले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख कशावर आहे ते साऱ्यांना समजणारे आहे. देशातील सगळ्या विद्यापीठांच्या प्रमुख पदांवर संघाच्या विचारसरणीची माणसे आणून बसविण्याचा व त्यांच्यामार्फत केवळ संघाचा विचार व त्यातली कडवी व एकारलेली धर्मनिष्ठा नव्या पिढ्यांच्या गळ्यात उतरविण्याचा मोदी सरकारचा व त्याच्या परिवाराचा प्रयत्न ज्ञानाची अशी कोंडी करणारा आणि त्याऐवजी नव्या पिढ्यांच्या मेंदूत प्रचारी भूमिकांची पेरणी करणारा आहे. दिल्ली विद्यापीठात या प्रयत्नाविरुद्ध विद्यार्थ्यांचा भडका उडाला. त्याआधी तो पुण्याच्या एफटीटीआयमध्ये झाला. पुढे हैदराबाद, कानपूर, अलाहाबाद आणि कोलकात्यातही तो झाला. याचपायी डॉ.अमर्त्य सेन यांच्यासारख्या नोबेल विजेत्या ज्ञानी माणसाला नालंदा विद्यापीठाचे कुलगुरुपद सोडणे भाग पडले. सत्ता हाती आली आहे तर तिचा वापर आपल्या भगव्या विचाराचा प्रचार देशाच्या गळी उतरविण्याचा संघाचा प्रयत्न केवळ अशा भडक्यांना उत्तेजन देणारा आणि ज्ञानी माणसांना विद्यापीठांबाहेर जायला लावणारा आहे. तो ज्ञानाची कोंडी करणारा व त्याच्या अमर्याद सामर्थ्याला एकारलेले व टोकदार बनविण्याच्या दिशेनेही जाणारा आहे. बहुधर्मी, बहुभाषी, संस्कृतीबहुल व असंख्य प्रादेशिक अस्मिता असणाऱ्या या देशात हजारो रंगांची फुले एकाचवेळी बहरली पाहिजेत, असे उद््गार अलीकडेच राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनीही काढले आहेत. देशाचे बहुढंगी व बहुरंगीपण जाणे आणि त्याने एकारलेले वा एकरंगी होणे हे त्याचे भारतीयत्व संपविण्याच्या प्रयत्नांत बसणारे दु:खद प्रकरण आहे. निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याचा तो अपयशी होणारा व हास्यास्पद ठरणारा प्रकारही आहे. त्यातून आजचे जग ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे लहान होऊन जवळ आले आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात त्याचा विचार आता ग्लोबल व्हिलेजसारखा होऊ लागला आहे. त्याच्या अशा लहान होण्याने माणूसच अधिक मोठा व उंच होऊ लागला आहे. अशा नव्या युगातील माणसांना व त्यांच्या पिढ्यांना एका कुंपणात डांबून त्यांच्यावर एकचएक प्रचारी विचार लादत राहणे हे दरदिवशी ऐकाव्या लागणाऱ्या बौद्धिकासारखे कंटाळवाणे व टाकाऊ प्रकरण आहे. विद्यापीठांनी सर्व प्रश्नांची त्यांच्या सर्व बाजूंसह चर्चा केली पाहिजे. त्यात ज्ञानाच्या कोणत्याही प्रवाहावर बंदी असता कामा नये. विद्यार्थ्यांना सारे काही ऐकता, वाचता व समजून घेता आले पाहिजे. त्यातूनच त्यांना स्वत:चा मार्ग स्वत:च्या विवेकानुसार शोधता आला पाहिजे. इतरांनी तो सांगण्याचा वा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करणे हे त्यांना एका रांगेतून व एका चाकोरीतून एकाच दिशेने नेण्यासारखे प्रकरण आहे व त्याचे दिवस आता मागे पडले आहेत. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी देशाला दिलेला हा सांगावा सरकारसह साऱ्यांनी गंभीरपणे घेतला पाहिजे व आपली विद्यापीठे मुक्त व स्वतंत्र राहतील याची काळजी घेतली पाहिजे. ज्ञानात अखेरचे असे काही नसते. त्याला पूर्णविराम नसतो. ते डबक्यात वाढत नाही. विद्यापीठ आणि मदरसा किंवा ज्ञानपीठ आणि संघशाखा यांच्यातला हा फरक आहे. उद्याच्या पिढ्यांमध्ये ज्ञानाच्या आकाशात भरारी घेण्याची क्षमता आणणे हे विद्यापीठांचे काम आहे. त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होता कामा नये हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींचे म्हणणे आहे.