शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत झळाळली भारताची ‘सॉफ्ट पॉवर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2023 07:54 IST

दिवाळीचे दिवे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये उजळले जाऊ लागले आहेत. हा केवळ सण नव्हे, भारताच्या सामर्थ्याची खूण होय!

- रवी टाले

दिवाळी हा भारतीयांचा सर्वांत मोठा सण गत काही काळापासून जगाच्या इतरही भागात साजरा होतो; पण यावर्षी तर भारताबाहेरील दिवाळी उत्सवाने एक वेगळीच उंची गाठली. अमेरिकेत दिवाळी हा आता ख्रिसमस, हॅलोवीन, थँक्सगव्हिंग आणि क्वान्झानंतरचा सर्वांत मोठा सण ठरला आहे. यावर्षी न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुटी दिली होती. दिवाळीला सार्वजनिक सुटी घोषित करणारा कायदा पेनसिल्वानिया राज्याने मंजूर केला आहे, तर इतर काही राज्ये त्या मार्गावर आहेत. दिवाळी ही राष्ट्रीय सुटीच जाहीर करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेतही एक विधेयक सदर झाले आहे. गत काही वर्षांपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाउसमध्येही दिवाळी साजरी करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. 

अलीकडे भारत आणि कॅनडाचे संबंध रसातळाला गेले आहेत; पण तरीही त्या देशाच्या टपाल खात्याने सतत पाचव्या वर्षी दिवाळीनिमित्त टपाल तिकीट जारी करण्याची परंपरा कायम राखली आहे. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि विरोधी पक्षनेता पिअर पालीएव्ह या दोघांनीही दिवाळी साजरी केली. ब्रिटनमध्ये तर पूर्वीपासूनच दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी इस्रायल-हमास युद्धामुळे उत्साहाला थोडा आवर घालण्यात आला असला तरी संयुक्त अरब अमिराती व इतर काही अरब देशांमध्येही अलीकडे दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, सिंगापूर, फिजी, सुरीनाम, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो आदी देशांनीही यावर्षी दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुटीची घोषणा केली होती. भारताची वाढती ‘सॉफ्ट पॉवर’च अशा प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे. 

‘सॉफ्ट पॉवर’ ही संकल्पना  अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय ज्युनिअर यांनी १९८० मध्ये मांडली होती. त्यांनी केलेल्या व्याख्येनुसार, तुम्हाला जे हवे आहे, ते इतरांनाही हवेहवेसे वाटावे, यासाठी तुमच्या ठायी असलेली क्षमता म्हणजे ‘सॉफ्ट पॉवर’!  थोडक्यात, सक्ती अथवा बळाचा वापर न करता, आकर्षण निर्माण करून स्वत:ची उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता म्हणजे ‘सॉफ्ट पॉवर’! आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात या संकल्पनेचा नेहमीच वापर केला जातो. आधुनिक काळातील बहुतांश नव्या संकल्पनांचे, तंत्रज्ञानाचे, पायंड्यांचे उगमस्थान अमेरिका आहे. ‘सॉफ्ट पॉवर’चा सर्वप्रथम यशस्वी वापर केला तोदेखील अमेरिकेनेच आणि तोदेखील नाय यांनी ती संकल्पना मांडण्याच्या किती तरी आधीपासून! अमेरिकेचे जगातील अग्रस्थान टिकवून ठेवण्यात अमेरिकेच्या लष्करी बळापेक्षाही त्या देशाच्या ‘सॉफ्ट पॉवर’चाच मोठा वाटा आहे.

शैक्षणिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून दरवर्षी जगभरातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना खेचण्यात अमेरिका यशस्वी होते. त्यापैकी अनेक विद्यार्थी पुढे अमेरिकेतील विकास, अनिर्बंध स्वातंत्र्य व मुक्त जीवनशैलीच्या आकर्षणातून अमेरिकेतच स्थायिक होतात, त्या देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावतात. हॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून अमेरिकेचा विकास आणि जीवनशैलीबाबत  आकर्षण निर्माण होण्यास मदत होते. ‘वेब सिरीज’ या प्रकारानेही अलीकडे त्याला हातभार लावला आहे. उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या अमेरिकेला अभिप्रेत संकल्पनांचा जगभर प्रसार होण्यासाठी इंटरनेटची मोलाची मदत झाली आहे. मॅकडोनल्ड्स, पिझ्झा हट, बर्गर किंग, स्टारबक्स आदी फूड चेन्स, वॉलमार्ट, सेव्हन इलेव्हनसारखी स्टोर चेन्स यांनीही अमेरिकन संस्कृती, खाद्यसंस्कृती, जीवनशैलीचा जगभर प्रसार करण्यास मदत केली आहे. या माध्यमांतून अमेरिकेला जो लाभ होतो, तो त्या देशाच्या ‘सॉफ्ट पॉवर’चाच तर परिपाक आहे.

अलीकडे इतर देशही आपापली ‘सॉफ्ट पॉवर’ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकशाहीची घट्ट पाळेमुळे, विचारस्वातंत्र्य, समृद्ध प्राचीन वारसा, जगभर पसरलेला भारतीय समुदाय या घटकांच्या बळावर भारत इतर देशांच्या तुलनेत त्याबाबतीत अंमळ पुढेच आहे. चीन हा भारताचा सर्वच क्षेत्रांतील प्रमुख प्रतिस्पर्धी; पण लोकशाही, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्ये आणि इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेचा व्यापक प्रसार, या आघाड्यांवर चीन भारताचा मुकाबला करू शकत नसल्याने, ‘सॉफ्ट पॉवर’च्या संदर्भात भारताने चीनला मात दिली आहे. यावर्षी दोन ऑस्कर पुरस्कार, यशस्वी चंद्रयान-३ मोहीम, जी-२० परिषदेचे यशस्वी आयोजन आणि सर्वांत वेगाने वाढत असलेल्या अर्थकारणाचा बहुमान, यामुळे भारताची वाढती ‘सॉफ्ट पॉवर’ आणखी झळाळली आहे.  

भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे. संस्कृती, खाद्य, वेशभूषा, उत्सव, जीवनशैली आदींबाबतीत भारतात जेवढे वैविध्य आणि समृद्धी आहे, तेवढे जगाच्या पाठीवरील एकाही देशात नाही. भारताच्या अत्यंत कमी खर्चातील अवकाश मोहिमा आणि यूपीआय पेमेंट सिस्टीमने जगाला भुरळ घातली आहे. भारताची ‘नाविक’ ही प्रणाली तूर्त प्रादेशिक असली तरी अमेरिकेच्या जीपीएसच्या तुलनेत खूप उजवी आहे. कमी खर्चात आधुनिक रेल्वेगाड्या विकसित करण्यातही भारत आघाडी घेत आहे. हे सर्व काही भारत जगाला देऊ शकतो. काही मोजके अपवाद वगळल्यास भारत तसा नावडता नाही. अमेरिका, रशिया, चीन या विद्यमान जागतिक महासत्तांच्या संदर्भात तसे नाही. त्यांच्या तुलनेत भारताची विश्वासार्हता कितीतरी अधिक आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’चा योग्य रीतीने वापर केल्यास जागतिक पटलावरील भारताचा उदय कोणीही रोखू शकणार नाही! दिवाळी हा उत्सव तिमिरातून तेजाकडे म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. यावर्षीच्या दिवाळीने तिचे उगमस्थान असलेल्या भारतालाही तो संदेश दिला आहे! 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनDiwaliदिवाळी 2023