रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत जिमनॅस्ट या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करुन चांगली कामगिरी (पदक मिळाले नाही तरी) बजावल्याबद्दल तिच्या सन्मानार्थ तिला भेट मिळालेली बीएमडब्ल्यु ही आलिशान मोटार परत करुन टाकण्याचा निर्णय म्हणे तिने घेतला आहे. ही आलिशान गाडी म्हणजे एक पांढरा हत्ती असून तो आपण पोसू शकत नाही याची प्रांजळ कबुलीही तिने दिली आहे. अर्थात हा निर्णय तिचा एकटीचा नसून तिचे कुटुंब आणि प्रशिक्षक अशा साऱ्यांनी मिळून म्हणे घेतला आहे. दीपा मूलत: अगरताळा येथली असल्याने त्या गावातील रस्त्यांची रुंदी आणि अवस्था या आलिशान, महागड्या आणि तरीही नाजुक मोटारीच्या प्रकृतीला मानवणारी नाही असेही तिने म्हटले आहे. अर्थात तिला कोणी तरी हे सांगायला हवे होते की रस्त्यांच्या अवस्थेविषयी म्हणशील तर मुंबईसारख्या शहरातील रस्ते आणि अगरताळ्यातील रस्ते यामध्ये फार काही फरक नाही. केवळ दीपा कर्माकरच नव्हे तर साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधू अशा तिघींना एकाच वेळी सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते ही आलिशान भेट दिली गेली व त्याची बातमी सर्वत्र झळकली तेव्हां तेंडूलकर यांनीच ती दिली असा अनेकांचा समज झाला. प्रत्यक्षात ती केवळ त्यांच्या हस्ते दिली गेली होती व प्रत्येकीच्या मोटारीसाठी खिशात हात घालणारे लोक वेगळेच होते. दीपाला जी बीएमडब्ल्यु दिली गेली तिचे खरे मालक होते वा आहेत ते हैदराबाद बॅडमिन्टन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ. त्यांनी आपली अमानत परत घेऊन जावी आणि शक्य असेल तर या मोटारीच्या किंमतीइतकी किंवा त्याहून कमी का होईना रक्कम रोख स्वरुपात दीपाला द्यावी अशी तिच्या प्रशिक्षकाची इच्छा आहे. त्याचे महत्वाचे कारण महिनाभरात जर्मनीत भरणाऱ्या स्पर्धेत तिला उतरायचे आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. यावरुन देशातील सर्वच धनिकांनी एक बाब लक्षात घ्यायला हरकत नाही, ती अशी की अभिनव बिन्द्रासारखा एखादाच खेळाडू गर्भश्रींमत असतो. बाकी सारे सामान्य किंवा फार फार तर मध्यम वर्गातील असतात आणि त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी रोख रकमेतील प्रोत्साहनाची गरज असते. महागड्या वस्तू देऊन देणाऱ्याचे नावे होते पण खेळाडूंना त्याचा काहीच लाभ होत नाही.
दीपाची बीएमडब्ल्यु
By admin | Updated: October 13, 2016 01:27 IST