एक बरे, स्वातंत्र्य दिन पावसाळ्यात येतो. सगळे पुतळे आपोआप धुतले जातात. त्यांना भोंदू, भंपक पुढाऱ्यांचा स्पर्श नको असेल तर ते पावसालाच साकडे घालतात. कारण त्यांची अवस्था भूतकाळात रमता येत नाही, वर्तमान सोसत नाही आणि भविष्यकाळ अंधारमय वाटतो, अशी होते. पारतंत्र्य भेदून गेला तो महान आहेश्वास येथे स्वातंत्र्याचा बंदिवान आहे ही आजची स्थिती म्हणायची, की वेगवेगळ्या अभियानात गुंतलेला, ओढला गेलेला, पिडलेला, वेगावर आरूढ झालेला, स्मार्ट स्मार्ट म्हणत यंत्र झालेला भारत माझा म्हणायचा, हा प्रश्न आहे. नव्या नव्या उन्मेषांचे कोंभही जळालेमोकळ्या स्वरांचे पक्षी हाय भार झालेइथे फूल झाडाशीही बेइमान आहेबेइमानी, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार हे अलंकार झाले. प्रत्येक माणसाच्या हातात अदृश्य खंजीर आहे, म्हणूनच रक्ताची किंमत कमी झाली. गुंडगिरी, झुंडशाही पराक्रमाची खूण झाली. म्हणून आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो मनावर होणारे पाशवी बलात्कार.पूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी समतोल न्यायदानासाठी होती. आता ती नको तो आतून चाललेला आतबट्ट्याचा व्यवहार पाहण्यासाठी. संत भोंदू झालेत, त्यांचं सत्त्व संपलं, धाक संपला. नीतीची चाड संपली म्हणून न्याय लीन दीन झाला. काळा-पांढरा, सत्य-असत्य, नीतिमान-भ्रष्ट, त्याग-मोह, सत्ता-संपत्ती यांचा झगडा अनादी कालापासून सुरू आहे. महाभारत काळापासून माणसांच्या सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आपण पाहत आलोय.खुलेआम शारीरिक, भावनिक कत्तल करणारे वीर ठरले आहेत. कारण प्रत्येक चेहऱ्यामागे मुखवटा दडलेला आहेच गुन्हेगाराचा. प्रत्येकाच्या डोळ्यात एक कसाई दडलेला आहे. गायीच्या प्रतीक्षेत असलेला. झडप घालायला कायम सुसज्ज! म्हणून ही लढाई चिरंतन आहे. श्रेयस, प्रेयस कायम झगड्यात अडकलंय. प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नवे सत्य संकल्प आपण सोडीत असतो आणि ते पाळण्याचे आश्वासन देत राहतो. नव्या बालकांना, तरुणांना नवनव्या सुदृढ, सुमंगल विचारांचे सूर्यदर्शन घडविणे आपले काम. नुस्ता भूतकाळ कुरवळायचा नाही, वर्तमान नासवायचा नाही, कोवळ्या डोळ्यांमधले भविष्याचे स्वप्न पुसायचे नाही. त्यांच्या डोळ्यात सूर्योदय पेरण्याचे काम आपले. ते आपण केले नाही तर पुढची पिढी दिशाहीन सैराट होईल. म्हणून स्वातंत्र्यदेवतेला विनवणी करायची..अरे कुणी अंधांसाठी सूर्य होऊनी यामढ्या माणसांच्यासाठी प्राण घेऊनी याम्हणू द्या जगाला अवघ्या हे तुफान आहे!अशा एका ऊर्जस्वल तुफानाची आपण तयारी करू या! जी लाभांच्या बाहेर दिव्यतेच्या रंगगंधात न्हालेली, तेजस्वी प्रकाशात लखलखलेली पहाट असेल. आजची आणि उद्याची पहाट अशी असो!-किशोर पाठक
तुफानाची पहाट
By admin | Updated: August 15, 2016 05:26 IST