शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

अंधार वाढत चालला, पणत्या जपूया। 

By किरण अग्रवाल | Updated: August 19, 2021 10:53 IST

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. 

- किरण अग्रवाल

अलीकडे समाजजीवनाचे व जगण्याचेही संदर्भच बदलले असल्याने प्रत्येकजण मी व माझ्यात गुंतत चालला आहे, त्यामुळे स्वार्थांधांच्या मतलबी गोतावळ्यात माणुसकीचा शोध घेणे जिकिरीचे झाले आहे हे खरेच; पण इतरांचे जाऊ द्या, जेव्हा आपलेही आपल्याला होत नसल्याचे दिसून येते तेव्हा मनाचे व्याकूळ होणे गहिरे होऊन गेल्याखेरीज राहत नाही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त मातेवर उपचार करण्याचे सोडाच, परंतु तिच्या अंत्यसंस्काराकडेही पोटच्या पोरांनी पाठ केल्याचा जो प्रकार नागपुरात पुढे आला आहे तोदेखील अशा व्याकुळतेत भर घालणाराच असून, संवेदनशीलता व माणुसकीच्या व्याख्या नव्याने तपासून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा म्हणता यावा. काही घटना या अपवादात्मक असतात, पण पांढऱ्या कॅनव्हासवर काळा डाग उठून दिसावा तशा असतात. समाजमनाची अस्वस्थता वाढीस लावणाऱ्या या घटनांमुळे वेदना व व्याकुळतेच्या जाणिवा घट्ट होतातच, परंतु नात्यांचे बंध किती सैल होत चालले आहेत हेदेखील त्यातून लक्षात येते. नागपुरातील घटना तशीच आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील किसनराव बोरकर हे ज्येष्ठ गृहस्थ आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीस नागपुरात उपचारासाठी घेऊन आले होते. दवाखान्यात असताना तर तिच्या मुला मुलींनी तिच्याकडे ढुंकून पाहिले नाहीच, परंतु आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही कोणी आले नाही; अखेर मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाच्या लोकांनी या अभागी मातेवर अंत्यसंस्कार केले. परिस्थिती कितीही हलाखीची वा कशीही असो, पण पोटची मुले असताना एखाद्या मातेवर अशी वेळ यावी हेच हृदय पिळवटून काढणारे आहे. यात ज्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला त्या अपरिचितांकडून माणुसकीचा प्रत्यय येत असताना, हक्काच्या म्हणवणार्‍या मुलांकडून, आप्तांकडून आलेला संवेदनाहीनतेचा अनुभव वयोवृद्ध पित्याला किती वेदना देऊन गेला असेल याची कल्पनाच करता येऊ नये. सदरची घटना ही प्रातिनिधिक म्हणता यावी, कारण समाजात अनेक ज्येष्ठांच्या वाट्याला असे दुःख आले आहे. म्हातारपणाची काठी म्हणवणार्‍या मुलांकडे आश्रितासारखे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या व्यथा या अशा असतात, ज्या सहन होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखे असते ते, पण समाजात मुलांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपला सन्मान खुंटीवर टांगून ते वाट्याला येणारे एकटेपणाचे जीवन जगत असतात. खरेतर आई वडिलांचा नीट सांभाळ न करणाऱ्या मुलांना घराबाहेर काढून देता येईल, असा एक निकाल मागे उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्येष्ठांचा योग्य सांभाळ व सन्मानासाठी कायदाही अस्तित्वात आहे, आपल्या चरितार्थासाठी ते मुलांकडून अधिकृतपणे पोटगीही मागू शकतात; पण अनेकांना हा कायदा माहित नाही व ज्यांना माहित आहे ते त्याचा वापर  करण्यास धजावत नाहीत. अर्थात प्रश्न कायद्याचाही नाहीच, तो आहे संवेदनेचा व माणुसकीचा. दुर्दैवाने या बाबी क्षीण होत चालल्या आहेत.अर्थात सारेच काही संपलेले अगर बिघडलेले नाही. तुफानातही काही दिवे तेवत असतात. नागपुरात संबंधित नलिनी बोरकर या मातेवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले तसे इतरही ठिकाणच्या घटना अधून मधून समोर येतात. परभणी जिल्ह्यातील सेलू येथेही पार्वतीबाई जैस्वाल या वयोवृद्ध महिलेवर तेथील मुस्लिम तरुणांनी रीतसर अंत्यसंस्कार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे, तर जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील जावूबाई भिल्ल या रस्त्यात बेवारस आढळलेल्या वृद्ध महिलेस काही तरुणांनी रूग्णालयात दाखल करून माणुसकीचा परिचय घडविला. अशा घटनांची यादी आणखीही लांबू शकेल, तेव्हा मथितार्थ इतकाच की; संवेदनाहीनतेचा अंधार वाढत असला तरी त्याला भेदु पाहणाऱ्या पणत्या आपल्या क्षमतेनुसार मिणमिणत आहेतच. या पणत्यांभोवती कौतुकाचा व सहकार्याचा हात धरूया इतकेच यानिमित्ताने.