शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अखिलाडू वृत्ती! ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 09:12 IST

क्रिकेट सभ्यपणेच खेळले जाईल, असा फतवाच त्यांनी काढला. म्हणजे काय, तर खेळताना उगीच आरडओरड करायची नाही,

जगात नाना क्रीडाप्रकार आहेत; पण ‘जेंटलमन्स गेम’ (सभ्य गृहस्थांचा खेळ) हे बिरूद केवळ क्रिकेटच मिरवीत आले आहे. सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सोमवारी झालेल्या श्रीलंका-बांगलादेश सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही घडलेल्या प्रकारांमुळे, आणखी किती दिवस क्रिकेटसाठी ते बिरूद वापरता येईल, असाच प्रश्न पडावा! इतिहासात क्रिकेटचा पहिला संदर्भ १३ व्या शतकातील आढळतो; पण या क्रीडा प्रकाराला खरी लोकप्रियता लाभली ती १७ व्या शतकात इंग्लिश अमीर-उमरावांनी क्रिकेट खेळायला प्रारंभ केल्यावर!

क्रिकेट सभ्यपणेच खेळले जाईल, असा फतवाच त्यांनी काढला. म्हणजे काय, तर खेळताना उगीच आरडओरड करायची नाही, प्रतिस्पर्धी खेळाडू बाद असल्याचे वाटल्यास पंचांकडे एका मर्यादेतच दाद मागायची, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना हिणवायचे, खिजवायचे (स्लेजिंग) नाही, फलंदाजांचे अंग भाजून काढणारी गोलंदाजी (बॉडीलाईन बोलिंग) करायची नाही, मनाजोगते न घडल्यास आदळआपट करायची नाही, बाद असल्याची जाणीव झाल्यावर फलंदाजाने निर्णयाची प्रतीक्षा न करता तंबूची वाट धरायची, इत्यादी! अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत क्रिकेट त्याच मापदंडांनुरूप खेळले जात असे; पण पुढे इतर खेळांप्रमाणे क्रिकेटचेही व्यवसायीकरण झाले आणि हळूहळू तो लौकिक काळवंडू लागला.

पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट रटाळ होऊ लागल्याने आणि नव्या युगात वेळेची कमतरता भासू लागल्याने एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाला. दरम्यान. कॅरी पॅकर या ऑस्ट्रेलियन उद्योगपतीने ‘वर्ल्ड सिरिज कप’ आणि ‘इंटरनॅशनल कप’ या नावाने जगभरातील प्रमुख खेळाडूंना ‘भरती करून’ क्रिकेटची जत्राच भरविणे सुरू केले. क्रिकेटमध्ये पैशाला महत्त्व आले ते तिथे! त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू केली. तेथून पुढील टी ट्वेंटी क्रिकेट, इंडियन प्रीमिअर लीग, इतर लीग, त्या माध्यमातून क्रिकेटमध्ये आलेला प्रचंड पैसा हा अलीकडील प्रवास सर्वांनाच ठाऊक आहे. या प्रवासादरम्यान देशोदेशींची क्रिकेट मंडळे आणि क्रिकेटपटू गब्बर झाले खरे; पण क्रिकेटचा आत्मा हरविला! आज क्रिकेटमध्ये एवढा पैसा दावणीला लागलेला असतो, की जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली जाते. सोमवारच्या श्रीलंका-बांगलादेश सामन्यात तेच झाले.

अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचा फलंदाज आधीचा फलंदाज बाद झाल्याने धावपट्टीवर पोचला खरा; पण हेल्मेटचा पट्टा तुटला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने दुसरे हेल्मेट मागवले. त्यामध्ये विलंब झाला आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याने ‘टाइम आउट’ नियमांतर्गत मॅथ्यूज विरुद्ध दाद मागितली. पंचांनीही त्याला बाद घोषित केले. या नियमान्वये एखादा फलंदाज बाद अथवा निवृत्त झाल्यास, दोन मिनिटांच्या आता पुढील फलंदाजास चेंडू खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागते. तांत्रिकदृष्ट्या मॅथ्यूज बाद होताच; पण खिलाडूवृत्ती नावाची गोष्ट असते की नाही? शकीब अल हसनने सामना संपल्यावर, आपण जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असे सांगून मॅथ्यूज विरुद्ध दाद मागितल्याचे समर्थनही केले!

अर्थात अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करणारा शकीब अल हसन काही पहिलाच नाही. यापूर्वीही अशी उदाहरणे घडली आहेत. भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावाने प्रचलित झालेला ‘मंकडिंग’ हा फलंदाजाला बाद करण्याचा प्रकार, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडदरम्यानची कुप्रसिद्ध ‘बॉडीलाईन’ मालिका, चेंडू कुरतडण्याचे प्रकार, रुडी कोर्टझेन या पंचांना रिकी पॉन्टिंगने दिलेली वागणूक किंवा अनिल चौधरी या पंचांसोबत विराट कोहलीने घातलेला वाद, ‘स्लेजिंग’, ‘मंकीगेट स्कॅन्डल’ अशा अनेक प्रकारांमुळे क्रिकेटची ‘जंटलमॅन्स गेम’ ही प्रतिमा डागाळत आहे.

सोमवारी बांगलादेश संघाने अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केल्यावर, श्रीलंकन खेळाडूंनीही सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन, आपणही कमी नसल्याचेच दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर, भारत व इंग्लंडदरम्यानच्या सुवर्णमहोत्सवी कसोटी सामन्यात पंचांनी बॉब टेलरला बाद नसताना बाद दिल्यावर भारतीय कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने टेलरला परत फलंदाजीस बोलावणे, अन्य एका कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इयान बेल तांत्रिकदृष्ट्या धावबाद असतानाही अपील मागे घेणे, अशी खिलाडू वृत्तीची उदाहरणे प्रकर्षाने आठवतात. सोमवारच्या सामन्याला मध्ययुगीन कालखंडातला एखादा इंग्लिश उमराव उपस्थित असता, तर तो खचितच उद्गारला असता, ‘क्रिकेट इज नो मोअर अ जेंटलमन्स गेम!’

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाBangladeshबांगलादेश