ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव अनिर्बन्ध उच्चार स्वातंत्र्याचा मन:पूत उपभोग घेत असतात त्याच राष्ट्रीय जनता दलाच्या कधी काळी मंत्री राहून गेलेल्या आणि आता खासदार असलेल्या एका बिचाऱ्या नेत्यावर मात्र अशाच स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्याबद्दल भलतीच आफत ओढवलेली दिसते. मुहम्मद तस्लीमुद्दीन हे त्यांचे नाव. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे महागठबंधन केले त्याने भाजपाचा पार धुव्वा उडवला. स्वाभाविकच लोकसभेच्या आणखी तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत आता फक्त आणि फक्त नितीशकुमार हेच मोंदींशी टक्कर घेऊ शकतात असा विश्वास या महागठबंधनशी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या जनता परिवाराशी संबंधित लोकांच्या मनात दाटून आला. पण हा विश्वास तस्लीमुद्दीन यांना बहुधा अनाठायी वाटत असावा. पण तरीही दिल्ली अभी बहुत दूर है असा विचार करुन त्यांनी गप्प राहावे ना, पण नाही. अखेर तेदेखील लालूंचेच अनुयायी. ते म्हणाले नितीश तर एखाद्या गावचे सरपंच ‘मुखिया’ होण्याच्याही योग्यतेचे नाहीत. इतक्यावरही बहुधा समाधान न झाल्याने त्यांनी आपल्याच पक्षाला सल्ला दिला की, या महागठबंधनला काही अर्थ नाही, राजदने त्यामधून तत्काळ स्वत:ला दूर करुन घ्यावे. त्यांची मल्लिनाथी आणि अनाहूत सल्ला नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास काही फारसा रुचला नाही. त्यांनी लगेच लालंूकडे धाव घेतली व आता खासदार तस्लीमुद्दीन यांना राजदने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘आपण वारंवार नितीशकुमार यांचा पाणउतारा करीत असता आणि संघ-भाजपाची भाषा बोलता’ असा ठपका त्यात ठेवला गेला आहे. संघ-भाजपाला गुदगुल्या व्हाव्यात असाच हा प्रकार. पण त्यातही अधिक मौजेची बाब म्हणजे तस्लीमुद्दीन यांचे पुत्र सरफराझ आलम संयुक्त जनता दलाचेच आमदार आहेत आणि एका जोडप्याशी गैरव्यवहार केला म्हणून निलंबित आहेत.
‘मुखिया न बन सके’
By admin | Updated: May 24, 2016 04:10 IST