शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

Corona Vaccination: अकारण शंकांना बळी पडू नका; कोविशिल्डच्या दोन डोसमधले अंतर १६ आठवडे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 06:24 IST

संपूर्ण जगभरात लसीचा तुटवडा आहे. दोन डोसमधील अंतर वाढवले की जास्त लोकांना लस मिळेल. त्यामुळे अजिबात आभाळ कोसळणार नाही!

डॉ. नानासाहेब थोरात

भारतामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोविशिल्ड (ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका) लसीला मान्यता देताना या लसीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने दिले जातील, असे जाहीर झाले.  आता दुसरा डोस १२ आठवड्यांनी दिला जाणार आहे.  ब्रिटनमध्ये हे अंतर  १२ आठवडे ठेवल्याचा दाखलाही दिला गेला.  कोविड-१९ वरील इतर सर्व लसींचे (कोव्हॅक्सिन, फायजर, मॉडर्ना, स्पुतनिक-V ) दोन्ही डोस चार आठवड्यांच्या दरम्यान दिले जातायत, मग याच लसीच्या बाबतीत असा गोंधळ का? या प्रश्नाचे उत्तर मात्र भूतकाळात दडले आहे. सुरुवातीला एकाच डोसचे नियोजन केले 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केलेल्या या लसीचा रूपबंधच असा की एकाच डोसमध्ये जास्तीत जास्त परिणाम दिसून येईल. ४ आठवड्यांच्या अभ्यासानंतर दिसून आले की, एका डोसमुळे पुरेशी प्रतिकारशक्ती तयार होत नाही. त्यामुळे ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाच्या संशोधकांनी ठरवले की, दुसरा डोस पण दिला पाहिजे. त्यावेळी इंग्लंडमध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली होती आणि ज्या लोकांनी पहिला डोस घेतला होता त्यामधील बरेच लोक दुसरा डोस घेण्यासाठी निरुत्साही दिसले. त्यामुळे दुसरा डोज हा ४ आणि ८ ते १२ अशा वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये दिला गेला. त्यामुळे लसीच्या परिणामकारकतेची वेगवेगळ्या आठवड्यातील माहिती तयार झाली. 

लसीचा अपुरा पुरवठा क्लिनिकल चाचण्या करण्यासाठीची लस ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधेच एका छोट्या प्रयोगशाळेत (स्टार्ट-अप कंपनीमध्ये) होत होती. दुसरा डोस देण्याच्या वेळेला या प्रयोगशाळेतील काही यंत्रणा बदलल्या गेल्या. त्यामुळे दुसरा डोस ४ आठवड्यांपासून १२ आठवड्यांपर्यंत लांबला.  ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार केलेल्या आणि इटलीमधून आलेल्या लसीच्या एका डोसमधील मूलभूत घटकांचे प्रमाण वेगवेगळे निघाले,  त्यामुळे नक्की किती डोस द्यायचे, याचा पण सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वेगवेगळे झाले. 

शेवटी निर्णय काय झाला?या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे दोन डोसमधील अंतर ४ आठवडे (२८ दिवस) असतानाचे परिणाम डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. तेव्हा दुसरा डोस ८ ते १२ आठवड्यांमध्ये दिल्यानंतरचे परिणाम आले नव्हते. त्यावेळी लसीची परिणामकारकता ही ७० टक्के एवढी सांगितली  गेली. त्यानंतर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका कंपनीने ८ ते १२ आठवड्यातील लसीच्या परिणामकारकतेची माहिती ब्रिटिश सरकारला दिली. त्यावरून असे दिसून आले की लसीच्या दोन डोसमधील अंतर जसजसे वाढत गेले तशी लसीची परिणामकारकता पण वाढत गेली. चौथ्या आठवड्यांनंतर दुसरा डोस दिल्यावर परिणामकारकता ७० टक्के होती तीच १२ आठवड्यांनंतर दुसरा डोस दिल्यावर ९० टक्केपर्यंत वाढली आणि म्हणूनच ब्रिटन सरकारने ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवले.        

भारतामध्ये नक्की काय प्रकार घडला?ब्रिटन सरकारने ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका लसीला मान्यता दिल्यावर लगेचच भारत सरकारनेही याच लसीला (भारतात कोविशिल्ड )मान्यता दिली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून भारतात या लसीचे लसीकरण सुरू झाले, तेव्हा दोन डोसमधील अंतर मात्र ४ आठवडे ठेवले आणि लगेचच काही दिवसात ते अंतर १२ आठवडे केले, त्यावेळी सरकारी यंत्रणांनी सांगितले की, याच लसीचे ब्रिटनमध्ये अंतर १२ आठवडे आहे, म्हणून भारतामध्ये पण तेवढेच केले आहे. अगदी आत्ता पुन्हा भारतामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवून ते १६ आठवडे केले आहे, यासाठी कोणतेही ठोस शास्त्रीय कारण दिले नाही. ब्रिटन तसेच यूरोपियन राष्ट्रांनीसुद्धा हे अंतर वाढवलेले नाही. 

अंतर वाढवल्याने परिणाम काय होईल?ब्रिटनमधील गेल्या पाच महिन्यातील लसीकरणाचा विचार केला तर असे दिसून आले की, लसीकरणामुळे कोविड-१९ रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण तब्बल ९५टक्क्यांनी  कमी झाले.  ब्रिटनमध्ये सध्या चार लसी लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत ( ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका, फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन). या सर्व लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर हे १२ आठवडे आहे. भारतामध्ये अंतर वाढवल्याने लसीची परिणामकारकता वाढेल की कमी होईल, हे लगेच सांगता येणार नाही; पण ब्रिटनमधील शास्त्रीय अभ्यासामध्ये दिसून आले की, १२ आठवडे हा योग्य कालावधी होता.

मग ज्या लोकांनी ४ आठवड्यात दुसरा डोस घेतला त्यांचे काय?भारतामध्ये सरासरी ९० टक्के लोकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ४ ते १२ आठवड्यादरम्यान दिला आहे. फारच कमी लोकांना दुसरा डोस ४ आठवड्यांत मिळाला. या लोकांनी घाबरून जायची किंवा पुन्हा तिसरा डोस घेण्याची सध्या तरी गरज नाही. या सर्व लोकांच्यात पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील, तसेच त्यांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेकडे कोरोना व्हायरसबद्दलची मेमरीसुद्धा तयार झालेली असेल त्यामुळे त्यांना कोविड-१९ विरुद्ध लढण्याची चांगली प्रतिकारशक्ती आलेली असणार आहे.  सध्या भारतात आणि संपूर्ण जगभरात लसीचा तुटवडा आहे. संसर्ग वाढत असल्याने  दोन डोसमधील अंतर वाढवून जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस देण्याचे, त्यांना सुरक्षित करण्याचे नियोजन केले जाणे स्वाभाविक आहे. ब्रिटन सरकारने सुरुवातीला हाच विचार करून लसीकरण केले होते; मात्र गेल्या काही दिवसात ब्रिटनमध्ये कोरोनाचा  B.1.617.२ हा स्ट्रेन वेगाने पसरत असल्यामुळे ब्रिटिश सरकारने लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करून लसीकरणाचा वेग २५टक्क्याने वाढवला. कोविड-१९ विरुद्धची चांगली प्रतिकारशक्ती  दोन डोस दिल्यावरच निर्माण होते, हे सुद्धा सिद्ध झाले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करून लोकांचे लसीकरण करणे हाच सध्याचा उपाय आहे. काही आठवड्यांच्या फरकाने आभाळ कोसळणार नाही, त्यामुळे लोकांनी अकारण शंकांना बळी पडणे थांबवले पाहिजे.

(लेखक मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ, मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड आहेत)nanasaheb.thorat@wrh.ox.ac.uk

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस