शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बी’चे निरंतर वाढते मोठेपण

By admin | Updated: February 9, 2015 01:22 IST

बॉलिवूडचे चित्रपट नेहमीच प्रत्यक्ष जीवनाहून अधिक जिवंत असतात व त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणामही त्याच वाढीव प्रमाणात होतो

विजय दर्डा, लोकमत पत्र समूहाचे चेअरमन(lokmatedit@gmail.com) - बॉलिवूडचे चित्रपट नेहमीच प्रत्यक्ष जीवनाहून अधिक जिवंत असतात व त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणामही त्याच वाढीव प्रमाणात होतो. हे चित्रपट रुपेरी पडद्यावरून गेले तरीही त्यांची आपल्या दैनंदिन जीवनाशी जुळलेली नाळ तुटत नाही. उदाहरणार्थ, सद्यस्थितीचे वर्णन करताना आपल्या तोंडी चित्रपटांतील एखाद्या गाजलेल्या गाण्याच्या ओळी येतात. बिहारमध्ये संयुक्त जनता दलात मुख्यमंत्रीपदावरून नितीश कुमार आणि जीतन राम मांझी यांच्यातील सुंदोपसुंदीविषयी बोलताना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही असाच चित्रपट गीताचा आधार घेत ‘मांझी जब नाव डुबोये, तो उसे कौन बचाये’ असे मार्मिक भाष्य केले. राजेश खन्नाच्या ‘अमरप्रेम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए..’ या गाण्याचा त्यास संदर्भ होता. जनमानसावरील चित्रपटांचा प्रभाव किती दीर्घकाळ टिकतो याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. ‘अमरप्रेम’ ४३ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७२ मधील चित्रपट. दुर्दैवाने हे गाणे गाणारे किशोर कुमार आणि ते रुपेरी पडद्यावर साकारणारा सुपरस्टार राजेश खन्ना हे दोघेही आज हयात नाहीत. तसेच या गाण्याला सुंदर स्वरसाज चढविणारे राहुल देव बर्मन ‘पंचमदा’ आणि अर्थवाही गीतरचना करणारे आनंद बक्षी हेही आज आपल्यात नाहीत. जेटलींना एवढ्या जुन्या चित्रपटगीताचे स्मरण व्हावे ही सार्वजनिक जीवनातील घटना. पण खासगी आणि कौटुंबिक जीवनातही आपण असाच अनुभव अनेकदा घेतो. यावरून आपल्या जीवनाशी बॉलिवूड किती समरस झाले आहे हेच दिसते. याच बॉलिवूडमधील ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन ही एक आख्यायिका. प्रत्येक नव्या चित्रपटाने किंवा अन्य क्षेत्रातील सर्जनशील योगदानाने ‘बिग बी’ या आख्यायिकेचे वलय दिवसेंदिवस तेजस्वी होत आहे. याच आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये झळकलेला ‘शमिताभ’ हा चित्रपट, लक्षावधी सिनेरसिकांवर आजही ‘बिग बी’चे गारुड कायम असल्याची पोचपावती म्हणावी लागेल. ‘शमिताभ’च्या योगाने एक योग जुळून आला आहे. या चित्रपटातील तरुण अभिनेता मुका आहे आणि त्यास अमिताभचा आवाज लाभला आहे. ख्यातनाम दिग्दर्शक मृणाल सेन यांच्यासाठी केलेल्या ‘भुवन शोम’ या पहिल्याच चित्रपटातही अमिताभने निवेदन केले होते. थोडक्यात, अमिताभचा भारदस्त आवाज आजही रुपेरी पडद्यावर राज्य करीत आहे.‘बिग बी’च्या चित्रपट कारकिर्दीचे अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येकाचे अनेक वर्षे विविधांगी विश्लेषण होत राहील, हे नक्की. पण या सर्वांमध्ये अमिताभमधील माणुसपण अधिक प्रकर्षाने जाणवते. अमिताभने आपल्या जन्मदात्यांना जेवढे गौरवान्वित केले तेवढे फारच थोड्यांनी केले असेल. ज्यांना तो ‘बाबुजी’ म्हणतो ते त्याचे वडील हरिवंशराय बच्चन स्वत: लोकप्रिय कवी होते आणि आई तेजी बच्चन ही देखील रंगभूमीवर नामांकित होती. अमिताभचा या दोघांविषयीचा श्रद्धाभाव आजकाल भरगच्च ‘शेड्युल’मुळे आई-वडिलांकडे लक्ष देण्यास वेळ नसण्याची सबब सांगणाऱ्या व्यावसायिकांसाठी आदर्श ठरावा, असाच आहे. परदेशात असला तरी ‘विक एन्ड’ आई-वडिलांसोबत घालविण्यासाठी अमिताभ मुद्दाम परत यायचा हे सर्वश्रुत आहे. अमिताभ आपल्या वडिलांच्या कवितांचे जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या जणू जिवंत होतात. अमिताभच्या आयुष्यात कसोटीचे अनेक क्षण आले. दुसरा एखादा सामान्य माणूस उन्मळून पडला असता. अमिताभला हे सर्व सोसावे लागले व त्यातून तो ताठ मानेने बाहेर आला. चेन्नईत भर उन्हात चित्रपटाच्या सेटवर घडलेला एक प्रसंग सांगितला जातो. त्या चित्रपटात एक मोठा अभिनेता अमिताभसोबत काम करीत होता. ऊन असह्य झाल्यावर त्याने काम करणे अशक्य असल्याची कुरकूर सुरु केली. पण अमिताभ मात्र संवाद वाचण्यात शांतपणे गढून गेला होता! हा दुसरा नट संतापून सेटवरून निघून जात असताना त्याला कोपऱ्यात ‘बिग बी’ दिसला. ‘येथील गर्मी तुम्हाला असह्य नाही वाटत?, असे विचारल्यावर अमिताभ शांतपणे उत्तरला, ‘मला गर्मी जाणवली नाही, मी माझे संवाद वाचत होतो!’. तो नखरेल अभिनेता जे काही समजायचे ते समजला आणि गुपचूप जाऊन चित्रिकरणासाठी उभा राहिला! सिनेक्षेत्रातील चढउतार अमिताभने निखळ व्यावसायिक वृत्तीने पार केले तर इतर आव्हानांवर त्याच्या संयमी व्यक्तिमत्वाने मात केली. स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यात कोणताही प्रसंग आलेला असो, ‘लोकमत’मधील आम्हा सर्वांना आणि व्यक्तिश: मला अमिताभकडून नेहमीच प्रेम आणि ममत्वच मिळाले. ‘बिग बी’शी अगदी अचानक होणारी भेटही आनंददायी आणि इतरांशी कसे वागावे याचा वस्तुपाठ घालून देणारी असते. अलिकडेच भाजपाचा नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, दक्षिणी सुपरस्टार रजनीकांत आणि ‘बिग बी’ या तिघांशी एकत्रित संभाषण झाले तेव्हा याचीच प्रचिती आली. गप्पाचा विषय राजकारणाकडे वळला तेव्हा ‘या विषयावर ज्याने बोलू नये असा मीच आहे,’ असे विनयाने म्हणत अमिताभने अंग काढून घेतले. रजनीकांतने ‘मला अजून यातलं बरंच काही शिकायचं आहे’, असे म्हटले आणि ‘शॉटगन’साठी मैदान मोकळे केले! अर्थात, यावर आम्ही तिघेही मनमुराद हसलो. आपल्या नावाला जागणारे जगात थोडेच लोक असतात. पण अमिताभ, एक चिरंतन ज्योत आणि एक बालकासारखी निरागस व्यक्ती या दोन्ही रुपांनी, नावाला जागत आला आहे. यामुळेच तर तो टिष्ट्वटर आणि सेल्फी यासारख्या साधनांशी जुळवून घेऊ शकतो. अमिताभ टिष्ट्वटना अनुक्रमांक देत असतो. १७६३ क्रमांकाचे टिष्ट्वट त्याचे खरे व्यक्तिमत्व प्रकट करणारे आहे... ‘झाले गेले विसरून जा, जे हाती आहे त्याचा आनंद घ्या आणि जे भविष्यात मिळणार आहे त्याची इच्छा धरा...’ एखादा अभिनेता आणि त्याचा अभिनय महान कशामुळे ठरतो याविषयी मतमतांतरे आहेत. पण एका बाबतीत एकमत आहे आणि ते हे की सर्वच महान अभिनेते आत्म्याशी प्रामाणिक असतात व बाहेर येण्यासाठी धडपडतेय असे त्यांच्यात काही तरी दडलेले असते. ही आत्मिक ऊर्जा व कौशल्य यांचा संगम पडद्यावर अत्युत्तम कलाकृती म्हणून प्रकट होतो. असे कलाविष्कार अविस्मरणीय ठरतात. जसे ‘बिग बी’ ‘शमिताभ’मध्ये म्हणतो,‘तुम्हाला धुंद करण्यासाठी व्हिस्कीच्या बाटलीत पाणी नाही घातले तरी चालते. व्हिस्कीच्या बाटलीत ४३ टक्के व्हिस्की आणि ५७ टक्के पाणी असले तरी पाण्यात मात्र व्हिस्की घालावीच लागते.’ ‘बिग बी’च्या व्यक्तिमत्वात अशी व्हिस्कीची प्रेरणा आहे व ती त्याला वरच्या पातळीवर नेत असते.हे लिखाण संपविण्यापूर्वी...दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आणि आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येण्याचे भाकित ‘एक्झिट पोल’ने केले आहे. तसे झाले तर देशाच्या निवडणुकीच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरु होऊ शकेल. जेमतेम दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान द्यावे आणि चितपट करावे यावरून सुशासनाला पर्याय नाही, हाच संदेश मिळतो. बोलघेवडेपणा खूप झाला, आता लोकांना प्रत्यक्ष कृती हवी आहे.