शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

संघर्षाकडून संघर्षाकडे..!

By admin | Updated: August 14, 2016 03:01 IST

‘आयर्न लेडी’ म्हणून जिचा जगभर उल्लेख केला जातो, त्या इरोम चानू शर्मिला या सामाजिक कार्यकर्तीने पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल १६ वर्षांचे उपोषण संपविण्याचा

- विनायक पात्रुडकर‘आयर्न लेडी’ म्हणून जिचा जगभर उल्लेख केला जातो, त्या इरोम चानू शर्मिला या सामाजिक कार्यकर्तीने पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल १६ वर्षांचे उपोषण संपविण्याचा निर्णय घेतला, पण संघर्ष मात्र तसा सुरू आहे.कोणत्या क्षणी घेतलेला निर्णय नेमका आणि योग्य ठरतो, हे त्यावर होणाऱ्या परिणामांवर अवलंबून असते. तब्बल १६ वर्षे उपोषण करून मणिपूरचे नाव जगाच्या पटलावर आणणाऱ्या इरोम शर्मिलाबाबत नेमके हेच घडत आहे. १६ वर्षांनंतर उपोषण थांबविण्याचा निर्णय घेतला. इरोमने त्यानंतर राजकारणात उतरून मुख्यमंत्री बनण्याची इच्छाही प्रकट केली. लष्कराच्या विशेषाधिकार (अस्फा) असलेल्या कायद्याविरोधात लढा सुरू ठेवण्याची मनीषाही प्रकट केली. तरीही ज्या मणिपुरी जनतेसाठी तिने हे सर्व केले, त्यांनीच या निर्णयाविरोधात, इरोमविरोधात पाऊल उचलले. अक्षरश: इरोमला एकटे पाडले. ज्या रुग्णालयात ती उपोषण काळात होती, पुन्हा तिथेच तिला जाण्याची दुर्दैवी वेळ आली. यात कुणाचे काय नेमके चुकले? सामाजिक हक्कासाठी, मानवतेसाठी लढणारी इरोम एका रात्रीत ‘हीरो’ची ‘व्हीलन’ कशी बनली? ज्या मणिपूरच्या जनतेसाठी तिने खस्ता खाल्ल्या, त्या जनतेच्या मनातून ती इतकी उतरली की, तिला राहायला कुणी घरही दिले नाही. इरोमने अहिंसेचा, सत्याग्रहाचा मार्ग अंगीकारला, पण दिशा चुकली की काय, असे वाटण्याची स्थिती निर्माण झाली. २००० साली इम्फाळजवळच्या मलोममध्ये लष्कराने दहा जणांना गोळ्या घालून ठार केले होते. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या या निरपराध लोकांना आसाम रायफल्सच्या जवानांनी ठार मारल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मृतांमध्ये ‘नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड’ मिळविण्याचा सीमन चंद्रमणीचाही समावेश होता. इरोमने या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले. ‘अस्फा’ कायद्याविरोधात मणिपुरात लाट उठली, आंदोलने झाली. इरोमने ५ नोव्हेंबर २००० पासून उपोषण सुरू केले. जोपर्यंत ‘अस्फा’ कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जेवण, पाणी वर्ज्य करण्याचा निर्धार केला. अगदी केसही विंचरणार नाही, अशी घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून तिला रुग्णालयातून जबरदस्तीने नलिकेतून अन्न पुरविण्यात आले. तेव्हापासून नाकात नळी असलेली, विस्कटलेल्या केसांची इरोमची छायाचित्रेही प्रसिद्ध होऊ लागली. दरवर्षी अटक आणि सुटका हे चक्र सुरू राहिले. २००५ साली सुटका झाल्यानंतर, तिने राजघाटावर येऊन महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर, जंतरमंतरवर जाऊन मानवी हक्कासाठी आंदोलनही केले. त्या वेळी ‘अस्फा’च्या विरोधातील आंदोलनाने जोर धरला होता. इम्फाळमध्ये जवळपास ३० महिला चक्क नग्न होऊन रस्त्यावर आल्या आणि ‘इंडियन आर्मी रेप अस’ असे फलक झळकले. जगभरातील माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. लष्कराची नाचक्की झाली. नंतर या महिलांना तीन महिने तुरुंगवासही झाला, पण ‘अस्फा’चा विषय मात्र तसाच चिघळत राहिला. इरोमला पुन्हा अटक झाली. नवी दिल्लीत असल्याने इरोम पुन्हा चर्चेच्या अग्रस्थानी राहिली. या काळात तिने पंतप्रधान, गृहमंत्री, तसेच राष्ट्रपतींना विनंतीपत्रे पाठवून ‘अस्फा’ रद्द करण्याविषयी सांगितले, तसेच नोबेल विजेत्या शिरीन अबादी यांच्या पुढेही मानवी हक्काचा प्रश्न मांडला. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत प्रश्न नेऊ, असे वचनही दिले. २०११ -१२ मध्ये इरोम शर्मिलाच्या पाठिंब्यासाठी देशभर मानवी हक्क आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी धरणे धरले. इरोमच्या या अभिनव लढ्याची, मानवी हक्कासाठी लढणाऱ्या शेकडो संस्थांनी दखल घेतली. त्यासाठी तिला विविध पुरस्कारांनी गौरविण्यातही आले. इरोमच्या चळवळीने जोर धरला. इरोम ही युवावर्गातील आदर्श प्रतिमा बनून राहिली. तिच्या लढ्याच्या जवळपास दंतकथा बनल्या गेल्या. इरोम शर्मिलाही तितकीच तत्त्वनिष्ठ असल्याने, तिच्या लढ्याला मणिपुरी महिलांनी मोठी साथ दिली. हे सारे सुरू असताना परवा, म्हणजे ९ आॅगस्ट २०१६ ला इरोमने उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर, तिने राजकारणात पाऊल टाकण्याची मनीषा व्यक्त केली. मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे मतही प्रदर्शित केले. इरोमच्या आयुष्याला एक गोड किनारही आहे. मूळचा भारतीय वंशाचा तिचा एक अमेरिकन मित्र आहे. त्याच्याबरोबर लग्नही करण्याची तिने तयारी दर्शविली. याचा नेमका उलटा परिणाम मणिपुरी जनतेवर झाला. तिच्या अमेरिकन मित्रावर मणिपुरी जनतेचा संशय आहे. त्यामुळे इरोमला उपोषण सोडण्याच्या निर्णयाला धक्का बसला. इरोमने ‘अस्फा’ रद्द होण्यासाठी राजकीय मार्ग पत्करू नये, असे मणिपुरी जनतेला वाटते. तिने सरळ त्या मित्राशी लग्न करून सुखाने संसार करावा, असे मत तिथल्या महिला वर्गाने व्यक्त केले आहे. ‘अस्पा’ रद्द करण्यासाठी राजकीय मार्ग हा उपाय नव्हे, असे तिथल्या जनतेला वाटते. इरोम आपल्यात राहिल्यास तिच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. तिच्यामुळे आपणही असुरक्षित होऊ, अशी भीती तिथल्या जनतेला वाटते. त्यामुळे तिला राहायला कुणी घरही द्यायला तयार नाही. त्यामुळे उपोषण सोडून इरोम पुन्हा निराश्रित झाली. अखेर रेड क्रॉस संघटनेने तिला सांभाळण्याची तयारी दर्शविली. मणिपुरी जनतेचा गैरसमज झाल्याची कबुली इरोमने दिली आहे. इतकी वर्षे सामाजिक आंदोलनाने नेतृत्व उभे केलेल्या इरोमवर इतकी दुर्दैवी वेळ येणे केव्हाही वाईटच, पण नेमके कुठे चुकते, हे इरोमनेही तपासून घ्यायला हवे. इरोम ही कुणी व्यक्ती नव्हती, तर ती एक प्रेरणा होती. तिचा असा अस्त होऊ देणे कुणाही सुदृढ समाजाला परवडणारे नाही. देवपण घेताना टाकीचे घाव सोसावे लागतातच, पण देवत्व प्राप्त झाल्यावरही हे घाव सुरूच राहिले आहेत. इरोमचा प्रवास त्यामुळे संघर्षातून पुन्हा एकदा संघर्षाकडे असा चालला आहे. इरोमचा उपोषण मागे घेण्याचा निर्णय जनतेला रुचला नसला, तरी इरोमची मानवी हक्कासाठी झालेल्या लढ्याची कामगिरी विसरता येणारी नाही. तिचा सत्याग्रही मार्ग अनेकांना निश्चित प्रेरणादायी असाच होतो. इरोमच्या आंदोलनाच्या उत्तरार्धाची दिशा अद्याप अस्पष्ट आहे, परंतु इरोमचे पूर्वायुष्य पाहता, ती पुन्हा बिजीगीसू वृत्तीने लढ्याला पुढे येईल, असे नक्की वाटते. तिच्या नेतृत्वगुणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, पण तिच्या प्रदीर्घ लढ्याविषयी कोणाच्याच मनात शंका असल्याचे कारण नाही. इरोमच्या वाट्याला संघर्ष आणि केवळ संघर्ष आहे, हे नक्की. हा संघर्ष कधी सत्ताधाऱ्या राजकीय पक्षाविरोधात, तर कधी स्वकियांविरोधात. तिच्या कपाळी संघर्षाची रेघ कधी मिटणार, हा प्रश्न मात्र बाकी आहे. आपल्याकडे अनेक लोकोत्तर नेत्यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे, पण स्वत:च्या शरीरावर इतके अत्याचार करणाऱ्या इरोमच्या मनात आपण हे सारे कुणासाठी केले, असा स्वाभाविक प्रश्न निर्माण झाल्यास, ही चूक इथल्या व्यवस्थेचीच म्हणावी लागेल. आता व्यवस्था बदलायची की आंदोलनाच्या विचारांची दिशा बदलायची हे ठरवायला हवे.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)