शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

संकुचित राष्ट्रवादातून झालेला खून

By admin | Updated: February 27, 2017 23:57 IST

अमेरिकेतील कन्सास शहरात नौदलातील एका निवृत्त अधिकाऱ्याने ‘गेट आउट आॅफ माय कंट्री’ असे म्हणत गोळ्या झाडून ठार मारले.

श्रीनिवास कुचिभोतला या तरुण भारतीय अभियंत्याला अमेरिकेतील कन्सास शहरात नौदलातील एका निवृत्त अधिकाऱ्याने ‘गेट आउट आॅफ माय कंट्री’ असे म्हणत गोळ्या झाडून ठार मारले. तर आलोक या त्याच्या मित्राच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी केले. आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा योग्य तो सन्मान होईल या भावनेने हे तरुण भारत सोडून अमेरिकेत गेले होते. श्रीनिवासच्या हत्त्येनंतर त्याच्या वडिलांनी ‘आता या देशात रहायचे कशाला’ असे हताश उद््गार काढले तर त्याच्या पत्नीने ‘त्याला अमेरिकीविषयी वाटणाऱ्या आदरापायीच तो येथे राहायला आला होता’, असे एका श्रद्धांजली सभेत बोलताना सांगितले. विदेशातून येणारे अभियंते, संशोधक, डॉक्टर वा अन्य व्यावसायिक अमेरिकेत आपले नशीब आजमावयला व जमेल तेवढा पैसा मिळवायला येतात. त्यांचे तेथे जाणे हा त्यांच्यातील काहींच्या स्वेच्छेचा तर काहींच्या नाइलाजाचा भाग असतो. अमेरिका ही प्रगत लोकशाही आहे आणि तेथे गुणवत्तेची कदर होते. जातिपातीच्या वा वर्णधर्माच्या नावावर तेथे माणसामाणसांत भेदभाव केला जात नाही. तेथे आरक्षण नाही आणि वशीलाही चालत नाही. त्यामुळे आपल्या गुणवत्तेचा त्या देशात योग्य तो सन्मान होईल ही स्वेच्छेने जाणाऱ्यांची धारणा तर आपल्या देशात गुणवत्तेची कदर नाही, जातिपंथाच्या व वर्णधर्माच्या मोजपट्ट्यांनी माणसे येथे मोजली जातात परिणामी आपली गुणवत्ता वाया जाते या जाणिवेने ग्रासलेल्यांचा वर्ग नाइलाजाने तेथे जातो. अशा गेलेल्या विदेशी तरुणांनी अमेरिकेतील बड्या नोकऱ्या व पदे त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर व्यापली असतील आणि त्यामुळे तेथील स्थानिकांना चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित व्हावे लागले असेल तर त्यांच्या मनात या विदेशी लोकांविषयीचा राग व तिरस्कार निर्माण होणे स्वाभाविक व समजण्याजोगे आहे. तशात अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आलेले ट्रम्प हे पुढारी सातत्याने ‘अमेरिका फर्स्ट’ असे म्हणत विदेशातून आलेल्या लोकांनी आम्हाला ओरबाडले असे म्हणून त्यांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवीत असतील तर स्थानिकांच्या मनातील त्या संतापाला आणखी धार येते. त्यातून नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला श्रीनिवासची हत्त्या करायला प्रोत्साहन मिळत असते. ‘या हत्त्येचा सरकारी धोरणाशी काहीही संबंध नाही’ असे ट्रम्प यांच्या प्रशासनाने कितीदाही सांगितले तरी ते खरे मानायचे मात्र कारण नाही. उत्तर प्रदेशातले दादरीचे हत्त्याकांड, दिल्लीतील शिखांचे शिरकाण आणि गुजरातमधील मुसलमानांची कत्तल यांचा सरकारशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी सरकारचे धोरण व सरकारकडून मिळणारा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा त्यातल्या हल्लेखोरांचे बळ वाढवणारा व मरणाऱ्यांचे निराधारपण आणखी जीवघेणे बनविणारा ठरतो. त्यामुळे श्रीनिवासची हत्त्या एका व्यक्तीने केली असली तरी तिच्यामागची प्रवृत्ती राजकीय व सत्ताकारणीच आहे हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. एका व्यापक संदर्भात वाढत्या जागतिकीकरणावर संकुचित राष्ट्रवादाने केलेला तो हल्लाही आहे. मात्र त्याच वेळी आपली मुले अमेरिकेसारख्या देशात जायला ज्या गोष्टी कारणीभूत होतात त्यांचाही विचार कधीतरी गंभीरपणे आता करावा लागेल. तशी वेळ आता आलीही आहे. जातिधर्माच्या नावावर आणि आरक्षणासारख्या व्यवस्थांखातर चांगल्या, होतकरू व गुणवंत तरुणांना नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर त्यांनी दुसरे करायचे काय असते? आपल्याच देशात ही मुले मग परकी होत असतात. त्यांना अन्यत्र चांगली संधी मिळाली तर त्यांनी तिचा वापर करायचा की नाही? गुणवत्ता व सामाजिक समता यांच्यातील तारतम्य तपासण्याची व गुणवत्तेला आणि बुद्धिमत्तेला समतेच्या संदर्भात योग्य तो न्याय देण्याची वेळ आता आली आहे. सरसकट आरक्षण किंवा सरसकट नकार यातील अन्याय राजकारणाएवढाच समाजकारणानेही आता समजून घेतला पाहिजे. आपली मुले विदेशात पैसा मिळवीत आहेत याचा अभिमान बाळगणाऱ्यांनाही त्यांच्यावर तेथे जाण्याची पाळी का आली याचा विचार यापुढे करावा लागेल. झालेच तर त्यांच्या तेथे जाण्याने आपल्या वाट्याला आलेले एकाकीपणही अशावेळी ध्यानात घ्यावे लागेल. विदेशात गेलेल्या आपल्या तरुणांचा एक दोषही येथे नोंदविण्याजोगा आहे. या मुलांनी तेथेही आपल्या जातिपातींचे भेद आणि धर्मवंशाचे खोटे अभिमान तथाकथित संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली जपत आपले वेगळेपण राखले आहे. ‘आमची मुले तेथेही सत्यनारायण करतात’ हे अभिमानाने सांगणारे आपल्यातले लोक अशावेळी आठवायचे. श्रीनिवास हा अमेरिकेतील आंध्र असोसिएशनचा पदाधिकारी होता. याचा अर्थ तेथेही तो प्रांतिकच राहिला. त्याला भारतीय होणे जमले नाही आणि अमेरिकेच्या जवळही जाता आले नाही. यामुळे त्याच्या वा आणखी कोणाच्या हत्त्येचे समर्थन होत नाही. ती निंद्य व निषेधार्हच आहे. ट्रम्प यांच्या राजवटीत हे प्रकार यापुढे वाढणार आहेत हे लक्षात घेऊन आपल्याही देशाने उद्याच्या पिढ्यांचा चांगला व विधायक विचार करणे आता आवश्यक झाले आहे. नितीश कुमारांनी बिहारी माणसांची मुंबईतील आवक मोठ्या प्रमाणावर कशी थांबविली याचा अभ्यास यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे.