कृषिक्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे क्रांती होत आहे. अनेक संशोधक यासाठी परिश्रम घेत असतात. मात्र काही वेळा गैरसमजामुळे अथवा अन्य कारणांमुळे तंत्रज्ञान अथवा साधनांचा पुरेसा वापर केला जात नाही. परिणामी एखादी सरकारी योजनाही अपेक्षित यश मिळवू शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी याबाबतचे तंत्र जाणून घेत शेतीसाठी त्याचा वापर केला पाहिजे.
महावितरणकडे दरवर्षी सुमारे दीड लाख कृषिपंप जोडणीसाठी अर्ज येतात. या अर्जांची पूर्ती करायला गेल्या तीन वर्षांत (२0१६-२0१९) शासनाकडून काही नवीन योजना राबविण्यात आल्या. सन २0१६ मध्ये सौरऊर्जायुक्त पंप योजनेच्या अंतर्गत ३ ते ७ लाख रुपयांच्या किमतीचे सौर पंप १५ ते ७0 हजार रुपये भरून शेतकऱ्यांना घेता येत होते. परंतु त्यानंतर दहा वर्षांसाठी वीज पंपाच्या जोडणीसाठी अर्ज करायला मनाई करण्यात आली होती. या कारणास्तव: तसेच शेतातील सुरक्षिततेची जोखीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने चालणाºया या पंपात बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी जाणकार तंत्रज्ञ मिळण्याची अनिश्चितता यामुळे शेतकºयांमध्ये ही योजना मूळ धरू शकली नाही.
कॅपॅसिटर वापरण्याने पंपांची क्षमता कमी न होता विद्युतप्रवाह घटतो. विद्युतप्रवाह घटायचे अनेक फायदे आहेत. यामुळे ट्रान्सफॉर्मरमधे बिघाड होण्याचे प्रमाण कमी होते व वीजजाळ्याच्या उपलब्धतेत वाढ होते व शाश्वत वीजदाब मिळाल्याने पंपांमध्ये बिघाडाचे प्रमाण कमी होऊन ऊर्जेची थोडीफार बचत होते. वाढलेल्या क्षमतेमुळे १0-२0 टक्के अधिक पंपांची जोडणी होऊ शकते.एच.पी.प्रमाणे एका पंपासाठी १५0 ते ४५0 रुपयांपर्यंतचा कॅपॅसिटर पुरेसा आहे. दर्जेदार ब्रॅण्डचा कॅपॅसिटर वापरला तर तो सुमारे दहा वर्षे टिकतो. कॅपॅसिटरचा वापर शेतकरी आणि महावितरण या दोघांसाठीही फायदेशीर असला तरी शेतकºयांमध्ये कॅपॅसिटर वापरासाठी उत्सुकता वा तयारी दिसून येत नाही. असे का, असा प्रश्न पडतो. यासंबंधी थोडे सर्वेक्षण केले असता, शेतकरी, पंप मॅकॅनिक, लाइनमन, वायरमन या साºयांमधील कॅपॅसिटर वापराविषयीचे अज्ञान व विविध गैरसमज याला कारणीभूत असल्याचे आढळून आले. कॅपॅसिटरची एक महत्त्वाची गुणवत्ता आहे. ट्रान्सफॉर्मरला जोडलेले १५ ते २५ जितकेही पंप असतील, त्यातल्या जास्तीत जास्त पंपांवर कॅपॅसिटर बसवला, तर त्याचा फायदा सगळ्यांना मिळतो. पाण्याच्या माठात जसा एक एक खडा टाकून पाण्याची पातळी थोडी वाढते. पण जास्त खडे टाकल्यास लक्षणीय वाढ होते, तसेच एक एक पंपावरील कॅपॅसिटरमुळे, ट्रान्सफॉर्मरच्या पूर्ण वीजजाळ्यात अधिक सुधार येतो. आयआयटीच्या ग्रामीण क्षेत्र वैकल्पिक प्रोद्यौगिकी केंद्राने सांगली, सोलापूर, नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांत कृषिपंपावर कॅपॅसिटरचा वापर करण्यासाठी एक वर्षाचा प्रकल्प कार्यान्वित केला. या अंतर्गत सुमारे ६0 ते ८0 शेतकºयांच्या पंपांवर कॅपॅसिटर बसविले. एका वर्षानंतर या प्रकल्पात सहभागी झालेले शेतकरी बहुतांशी संतुष्ट आढळले.