शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हे सूडसत्र सरकारच्या अंगलट येऊ शकते...

By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आपल्या विरुद्ध गेलेला निकाल उलटविण्यासाठी इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये देशावर

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आपल्या विरुद्ध गेलेला निकाल उलटविण्यासाठी इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. त्यापायी देशातील हजारो राजकीय कार्यकर्त्यांना व त्याच्या आदरणीय नेत्यांना तुरुंगात डांबले. या प्रकारावर संतापलेल्या नागरिकांनी आणीबाणी उठताच १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा तोवर कधी झाला नाही एवढा दारुण पराभव केला. त्यात त्यांनी इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना पराजयाची चव चाखायला लावली. राजकारणातले शत्रुत्व आणि दुरावा साऱ्यांना चालतो. किंबहुना लोकशाहीची ती गरजही आहे. मात्र तेव्हा जनतेला न आवडलेली बाब राजकारणात शिरलेल्या सूड भावनेची होती. जयप्रकाश नारायणांसारख्या देशभक्ताला देशातील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह ज्या तऱ्हेने त्या काळात वागविले गेले तो प्रकार जनतेला सहन न होणारा होता. जनतेला राजकीय शत्रुत्व चालते, राजकारणातला सूड चालत नाही. जी चूक इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये केली तीच नंतर सत्तेवर आलेल्या मोरारजीभाई देसाई यांच्या जनता सरकारनेही केली. सत्तेवर येताच त्या सरकारने इंदिरा गांधींविरुद्ध एक डझनाहून अधिक चौकशी आयोग लावले. त्या आयोगांनी इंदिरा गांधींवर चालविलेले चौकशीवजा खटले जनतेला सूडासारखेच वाटले. त्या सूडसत्रावरचा कळस तेव्हाचे गृहमंत्री चौधरी चरणसिह यांनी इंदिरा गांधींना तिहारच्या तुरुंगात टाकून चढविला. जेवढे दिवस त्या तुरुंगवासात होत्या तेवढे दिवस साऱ्या देशात जनतेने त्यांच्या सुटकेसाठी जे विराट आंदोलन उभारले त्यात मोरारजींचे सरकार तुटले, कोलमडले आणि संपून इतिहासजमा झाले. त्यासोबतच जयप्रकाशांनी दाखविलेला सप्तक्रांतीच्या प्रकाशाचा मार्गही अंधारल्यागत झाला. त्यावेळी १९७९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने इंदिरा गांधींना दोन तृतीयांशाहून जास्तीचे बहुमत देऊन पंतप्रधानपदावर पुन्हा विराजमान केले. या दोन्ही सूडसत्रात देश होरपळला आणि त्याचे राजकारण त्याच्या विकासासह अनेक वर्षे मागे गेले. जनतेला सूड चालत नाही ही बाब त्यावेळी दुसऱ्यांदा स्पष्ट झाली. मात्र अशा इतिहासातून काहीएक न शिकण्याचा वसाच आपल्या राजकारणाने घेतला असावा असे सध्याचे देशाच्या राजकारणाचे स्वरुप आहे. जे सूडसत्र मोरारजी-चरणसिंहांच्या सरकारने इंदिरा गांधींविरुद्ध १९७७ ते ७९ या काळात वापरले नेमके तेच आजचे नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध वापरत आहेत. त्यासाठी त्याने सुब्रह्मण्यम स्वामी या कोणताही जनाधार नसलेल्या व कायम वादग्रस्त राहिलेल्या इसमाला हाताशी धरले आहे. त्यांच्यामार्फत इंडियन हेरॉल्ड या पं. नेहरूंनी कधीकाळी स्थापन केलेल्या वृत्तपत्राची जमीन त्या हडप करू इच्छितात असा आरोप लावला गेला आणि त्याला उत्तर देण्यासाठी त्या दोघांनी न्यायालयात हजर राहिले पाहिजे असा आदेश आता बजावण्यात आला. येत्या १९ तारखेला आपण कोर्टात हजर राहू हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी न्यायालयाचा आदर म्हणून मान्य केले आहे. मात्र त्याचवेळी ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. तो त्यांनी केला नसता तरी ही कारवाई हा मोदी सरकारच्या सूडसत्राचाच एक भाग आहे हे जनतेला कळलेच असते. परवाच्या मंगळवारी दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी या सूडसत्राचा निषेध करण्यासाठी जे विराट आंदोलन उभे केले तो जनतेत असलेल्या या जाणिवेचाच परिणाम आहे. मोदींचे सरकार व त्यांच्या पक्षाच्या परिवारातील इतर संघटना सोनिया गांधींना जेवढे बदनाम करता येईल तेवढे करण्याच्या मागे लागल्या आहेत. त्यांना विदेशी म्हणून झाले, मोदी सत्तेवर येताच त्या इटलीला निघून जातील हे सांगून झाले आणि यापुढे देश काँग्रेसमुक्त होणार असल्याचेही भाकीत वर्तवून झाले. मात्र सोनिया गांधी स्वदेशीच राहिल्या आणि काँग्रेस पक्षही इतिहासजमा झाला नाही. उलट जे सरकार आता दीर्घकाळपर्यंत देशावर सत्ता गाजवील असा गाजावाजा केला गेला ते मोदींचे सरकारच प्रथम देशाच्या राजधानीत, मग बिहारमध्ये आणि आता बंगालपासून गुजरातपर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सर्वत्र पराभूत झालेले दिसले. प्रथम रॉबर्ट वडेरा हे सोनिया गांधींचे जावई बदनाम करून झाले, नंतर प्रियंका गांधींना जमेल तेवढी नावे ठेवून झाली, राहुल गांधी अपरिपक्व असल्याच्या जाहिराती करून झाल्या आणि २००४ ते २०१४ या काळात देशाचे राजकारण त्याच्या सत्ताकारणासह करणाऱ्या सोनिया गांधींनाही साऱ्या बाजूंनी घेरण्याचे प्रयत्न झाले. परिणामी दीड वर्षात मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि काँग्रेस पक्षात नव्याने चैतन्य आल्याचे दिसले. सरळसरळ आरोप करता येत नाहीत म्हणून स्वामींसारख्या माणसाला हाताशी धरण्याचे राजकारण भाजपा व मोदींचे सरकार यांच्याच अंगलट येऊ लागले असल्याचे चित्र आता देशात उभे होत आहे. सूडाच्या बळावर दुबळी माणसे नमवता येतात, मात्र ज्यांच्या मागे शतकाएवढा संघटनात्मक व संघर्षाचा इतिहास उभा असतो ती माणसे त्यातून आणखी सामर्थ्यवान होतात हेच येथे लक्षात घ्यायचे.