इस्लामिक स्टेट आॅफ सिरिया अॅन्ड इराक (इसीस) या मध्य आशियातील अतिरेकी संघटनेने चालविलेल्या हिंस्र कारवाया इस्लामविरोधी असल्याचे निषेध पत्रक भारतातील १०५० मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन काढावे ही गोष्ट जेवढी स्वागतार्ह तेवढीच इतरांसाठी अनुकरणीय आहे. या विचारवंतांपाठोपाठ लखनौच्या फिरंगी महल या इस्लामी पीठानेही इसीसचा निषेध करणारा व ती संघटना इस्लाम आणि अल्ला यांना विरोध करणारी असल्याचा फतवा जारी केला आहे. फिरंगी महल या पीठाला चार दशकांचा इतिहास असून गेल्या २०० वर्षांत त्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आवाहन या देशाला वारंवार केले आहे. प्रत्यक्ष म. गांधी या पीठात मुक्कामाला राहिले तर सरदार पटेल आणि पं. नेहरू यांनीही या पीठाला भेट देऊन त्याच्या कार्याची प्रशंसा केली. अगदी अलीकडे कांचीकामकोटी पीठाच्या शंकराचार्यांनीही या पीठात जाऊन त्याच्या प्रमुखांशी धार्मिक सलोख्याबाबत चर्चा केली आहे. मध्यपूर्वेत हजारो निरपराध लोकांची कत्तल करणाऱ्या इसीसला दायेश या नावानेही ओळखले जाते. तिची क्रूरता व अमानुषपणा साऱ्या जगासाठी भयावह ठरला असून तो दहशतवादाचा सर्वात जुलमी चेहराही आहे. फिरंगी महलचे संचालक मौ. खालिद रशीद फिरंगी महली यांनी इसीसपासून सौदी अरेबिया आणि भारतालाही धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले आहे. प्रत्यक्ष पैगंबराने ‘जमिनीवर राहणाऱ्यांवर दया दाखवाल तर अल्लाह तुमच्यावर दया करील’ असे म्हटल्याचे त्यांनी आपल्या पत्रकात सांगितले असून इस्लामच्या नावावर अत्त्याचार, हिंसा आणि क्रूरतेचे प्रदर्शन करीत असणाऱ्यांची इस्लामला गरज नाही असेही सांगून टाकले आहे. लखनौचे एक नागरिक साजिद उमर जिलानी यांनी इसीसच्या कारवायांकडे या पीठाचे लक्ष वेधले असता त्याने आपली ही भूमिका जाहीर केली आहे. कोणत्याही मनुष्याची अकारण हत्त्या करणे हे मानवताविरोधी कृत्य आहे असे पवित्र कुराणात म्हटले असल्याचेही या पीठाने स्पष्ट केले आहे. फिरंगी महल हे पीठ उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि देवबंद या पीठांएवढेच महत्त्वाचे व पवित्र मानले जाते. त्याच्या आज्ञा मुसलमान समाजात मोठ्या आदराने ऐकल्या जातात. फिरंगी महलचा इतिहास हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पाठपुरावा करणारा असल्याने त्याच्या आताच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. या भूमिकेचे स्वागत करताना दोन गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. ज्या कारणासाठी फिरंगी महलने इसीसचा निषेध केला त्याच कारणांसाठी त्याने भारतात कार्यरत असलेल्या मुसलमानांच्या अतिरेकी व दहशतवादी संघटनांचाही निषेध केला पाहिजे. हा वर्ग संख्येने मोठा नाही, मात्र त्याच्या कारवायांचा परिणाम देशव्यापी व साऱ्या समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे. या संघटनांपासून आपण केवळ दूरच नाही तर त्यांच्या त्या कारवायांचा निषेध करणाऱ्यांपैकी एक आहोत हेही याचवेळी या पीठाने जाहीर करणे गरजेचे आहे. त्याचवेळी इसीस व अन्य दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यासाठी अलीगढ व देवबंद या पीठातील धर्माचार्यांनी समोर आले पाहिजे. उत्तर प्रदेशात मुसलमानांची संख्या १४ टक्क्यांएवढी आहे आणि त्याच प्रदेशात या धर्माची पीठेही अधिक आहेत. त्याचवेळी या राज्यात हिंदूंची देवदैवतेही मोठ्या प्रमाणावर विराजमान आहेत. या दोन धर्मातील लोकात असणारी तेढ हाच त्या राज्यातील राजकारणाचा खरा आधार आहे. तो संपल्याने त्या राज्यातच नव्हे तर साऱ्या देशात धार्मिक तेढ कमी होण्याची व त्यात सामाजिक सलोखा वाढण्याची अपेक्षा मोठी आहे. फिरंगी महल आणि इतर मुस्लीम संघटनांना हे सांगत असतानाच देशातील हिंदूंमधील अतिरेक्यांच्या संघटनांना व त्यांच्या बलिष्ठ पाठीराख्यांनाही हे बजावणे गरजेचे आहे. फिरंगी महलने इसीसचा निषेध करणे व त्याचवेळी इतर मुस्लीम धर्मपीठांनी इसीससह भारतातील मुस्लीम दहशतवाद्यांच्या संघटनांचा निषेध करावा अशी अपेक्षा करणेही याच पार्श्वभूमीवर शक्य व परिणामकारक होणार आहे. मालेगाव, हैदराबाद, बंगलोर आणि समझोता एक्सप्रेस येथे झालेल्या हिंदू अतिरेक्यांच्या दहशती कारवायांबाबतही अशा निषेधाची पत्रके आता निघणे गरजेचे आहे. केवळ इस्लामी दहशतवादाची वा इसीसची निंदा करणे हिंसाचार व दहशतवाद यांना आळा घालायला पुरेसे नाही. त्यासाठी आम्ही सगळ््यांच्याच हिंसाचाराविरुद्ध एकत्र आहोत हे देशातील बहुसंख्य व अल्पसंख्य अशा साऱ्यांनीच एकत्र येऊन या अत्त्याचारी प्रवृत्तींना बजावले पाहिजे. फिरंग महलच्या ताज्या भूमिकेच्या काळातच केरळमधील आठ हजार सुन्नी मशिदींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महल्लू फेडरेशनने मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा आवाज कमी करण्याचे आवाहन आपल्या सभासदांना केले आहे. या भोंग्यांचा वापर केवळ अजानपुरता व मर्यादित घोषणांसाठी केला पाहिजे असे तिने म्हटले आहे. सांप्रदायिक सलोखा बिघडविणारी कोणतीही कृती करण्यापासून आपण दूर राहिले पाहिजे असे या फेडरेशनचे सरचिटणीस पनाक्कड हेैदरअली शिहाब थंगल यांनी म्हटले आहे. उपरोक्त पत्रके मुस्लीम पीठांनी व त्यांच्या धर्म संघटनांनी काढली असली तरी ती देशातील सर्वच धर्मबांधवांना मार्गदर्शक ठरावी अशी आहेत.
फिरंगी महलची सौहार्दाची हाक
By admin | Updated: September 15, 2015 04:10 IST