शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कॉ. उदारमतवादी

By admin | Updated: January 3, 2016 22:56 IST

कॉ. अर्धेन्दू भूषण बर्धन यांच्या निधनाने देशातील श्रमिकांच्या हितासाठी लढणारा व देशाच्या सर्वस्पर्शी कल्याणाचा कायम विचार करणारा एक अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचा आणि डाव्या विचारांचा

कॉ. अर्धेन्दू भूषण बर्धन यांच्या निधनाने देशातील श्रमिकांच्या हितासाठी लढणारा व देशाच्या सर्वस्पर्शी कल्याणाचा कायम विचार करणारा एक अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचा आणि डाव्या विचारांचा पाईक असलेला कमालीचा लोकप्रिय नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ९४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य केवळ अध्ययन, परिश्रम, श्रमप्रतिष्ठेची चळवळ आणि सामान्य माणसांच्या कल्याणाच्या कार्याने सर्वतोपरी भरून काढणारा हा नेता अमोघ वक्तृत्वाचा धनी होता. जन्माने बंगाली असूनही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील त्यांची भाषणे अजोड होती आणि ती श्रोत्यांच्या जिवाचा ठाव घेण्याएवढी खरी आणि प्रामाणिक होती. राजकीय विचार कोणताही असला, तरी माणसांचे संबंध मात्र सार्वत्रिक व साऱ्यांना कवेत घेणारे असावे अशी वृत्ती असलेल्या बर्धन यांचे काँग्रेस व भाजपापासून देशातील सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मध्यप्रांत आणि वऱ्हाडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहणारे कै. रविशंकरजी शुक्ल यांचे ज्येष्ठ चिरंजीव व पुढे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले श्यामाचरण शुक्ल यांचा नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभव करून ऐन तारुण्यात विद्यार्थी व शिक्षणक्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या बर्धन यांनी आरंभापासून आपले राजकारण ताठ मानेने व स्वतंत्र बाण्याने केले. नागपुरातील वीज कामगारांचे नेतृत्व असो वा विणकरांच्या आंदोलनाचे पुढारपण असोे, ते सर्वांच्या जवळ व संपर्कात राहणारे नेते होते. १९६२ मध्ये कम्युनिस्ट पक्षाची दोन शकले झाली तेव्हा बर्धन त्याच्या उजव्या बाजूशी कायमचे जुळले व अखेरपर्यंत त्याच बाजूची भूमिका त्यांनी नेटाने पुढे नेली. प्रचंड लोकप्रियता आणि धारदार बुद्धिमत्ता असलेला हा माणूस सत्तेच्या पदांपासून नेहमी दूर राहिला. महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी पाच वर्षे अनुभवल्यानंतर ते पुन: कोणत्या पदावर गेले नाहीत. आपल्या सहकाऱ्यांना खासदारकीपासून मंंित्रपदापर्यंतची पदे त्यांनी मिळवून दिली. स्वत:ला मात्र त्यापासून त्यांनी नेहमी दूर ठेवले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कारकिर्दीत प्रकाश करातांच्या नेतृत्वातील कम्युनिस्ट पक्षाने त्या सरकारला जेरीला आणत आपला कार्यक्रम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्याही काळात बर्धन यांची भूमिका शांत, संयमी व मध्यस्थाची राहिली. संसदेत डी. राजा आणि संसदेबाहेर बर्धन या उजव्या पक्षाच्या जोडगोळीने त्यांचा पक्ष, त्याच्या लहानशा अवस्थेत का होईना, पण देशभर कार्यक्षम राखला व त्याचा आवाज राष्ट्रीय पातळीवर उमटत राहील याची काळजी घेतली. बर्धन धनवंत नव्हते, श्रमवंत होते. त्यांच्या पत्नीने शिक्षिकेची नोकरी करून त्यांचा संसार सांभाळला आणि तिच्याविषयीची कृतज्ञता मनात बाळगूनच त्यांनी पक्षाच्या राजकारणाची राष्ट्रीय सूत्रे सांभाळली. सुरुवातीच्या काळातील मित्रांचे सदैव स्मरण राखणारा, त्यांच्यासाठी नेहमी धावून येणारा आणि प्रसंगी साऱ्यांच्या हिताचा विचार करीत आपली बाजू मागे ठेवू शकणारा उदारमतवादी कम्युनिस्ट ही त्यांची कायमची ओळख होती. त्यांचे मित्र साऱ्या जगात होते. रशिया व चीनपासून क्युबापर्यंतच्या कम्युनिस्ट देशात त्यांचा संचार होता. मात्र त्या व्यापक मैत्रीची वा संचाराची मिजास त्यांच्या अंगात नव्हती. कामगारांच्या हिताचा प्रश्न आला की त्यासाठी सर्व पक्षांनी आपापले झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे आणि कामगार हिताहून राजकीय हित मोठे ठरवू नये ही भूमिका त्यांनी सदैव आपली मानली. कुणालाही, केव्हाही सहजपणे भेटता येईल असे आपल्या कामाचे व आयुष्याचे स्वरूप त्यांना राखता आले. त्याच वेळी सर्वांशी त्यांच्या बरोबरीने बोलून त्यांची मते समजावून घेण्याची सहजसाधी हातोटीही त्यांनी साध्य केली होती. मोठाली आंदोलने उभारणे, राष्ट्रीय पातळीवरच्या चळवळी आखणे आणि संसदेपासून सडकेपर्यंतचे लोकनेतृत्व यशस्वी करणे हे सारे जमत असतानाही आपले सहज साधे सभ्यपण त्यांना जपता आले. शिवाय कम्युनिस्ट असूनही ‘संत ज्ञानेश्वरांची बंडखोरी हा आमच्यासाठी आदर्श आहे ‘ असे त्यांना म्हणता येत होते. अतिशय उंची इंग्रजी साहित्याची त्यांना असलेली जाण त्या विषयाच्या अभ्यासकांना लाजविणारी, तर त्या भाषेवरचे त्यांचे लाघवी प्रभुत्व तिच्या जाणकारांना अंतर्मुख करणारे होते. लढे, आंदोलने आणि राजकारण संपले की पुस्तकात व चिंतनात रमणारा तो अभ्यासू जाणकार होता. रवींद्रनाथांचे साहित्य आणि रवींद्र संगीत यांची त्यांना सखोल जाण होती. राजकारणातल्या प्रत्येकच नेत्याविषयीचे त्यांचे आकलन अचूक होते आणि साध्य माणसांच्या गरजा हा त्यांच्या जाणिवेचा विषय होता. कोणतीही टोकाची भूमिका मान्य नसलेल्या बर्धन यांना नक्षल्यांची हिंसा अमान्य होती, करातांचे एकारलेपण मान्य नव्हते आणि साऱ्या समाजासोबत राहूनच श्रमिकांच्या वर्गाला प्रगतीचे पाऊल पुढे टाकता येते यावर त्यांची कृतिशील श्रद्धा होती. बर्धन यांचे जाणे हे केवळ कम्युनिस्ट पक्षाचे वा डाव्या चळवळीचे दुर्दैव नाही, ती फार मोठी राष्ट्रीय व सामाजिक हानी आहे. सामान्यातून असामान्य होता येणे ही बाबही बर्धन यांनी स्वत:च्या उदाहरणाने साऱ्यांना शिकविली आहे.